स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर! ड्रोन वापरावर येणार बंदी!
21 Jul 2023 17:15:22
मुंबई : येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क असून मुंबईत ड्रोन वापरावर लवकरच बंदी घालण्यात येणार आहे. मुंबई पोलीसांनी स्वातंत्र्य दिनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार, राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना १६ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, तसेच, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरिता हे आदेश लागू करण्यात आल्याचे मुंबई पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल, अन्यथा या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही मुंबई पोलीसांनी स्पष्ट केले.