महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते देवेंद्रजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना उत्तम आणि सुदीर्घ आयुष्य लाभावे, हीच आई मुंबादेवीच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो.
२०१४ साली देशात आणि महाराष्ट्रात क्रांती झाली. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाले. महाराष्ट्रातदेखील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाले आणि या सरकारची धुरा देवेंद्रजी यांच्या समर्थ खांद्यांवर सोपविण्यात आली. त्यानंतर मागील नऊ वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीयसह सर्वच स्तरांवर एकच नाव कायमस्वरूपी विस्तारत आहे, ते म्हणजे ‘देवेंद्र गंगाधरराव फडणवीस!’ आजच्या घडीला देवेंद्र यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आणि देवेंद्र यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली मागील एका वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर विचारांशी कुठलीही तडजोड न करता, जनहिताची कामे करता येतात, हे देवेंद्र यांनी दाखवून दिले.
देवेंद्रजींनी या काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरदेखील आपला एक ठसा उमटवला आहे. विकासाच्या या अश्वमेधात त्यांनी आपल्या अनेक निर्णयांच्या माध्यमातून, महाराष्ट्र हितालाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्यामुळेच महाराष्ट्राला आर्थिक व सामाजिक स्तरावर सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेली दृष्टी आणि त्यांची कार्यक्षमता जनतेने ओळखली व त्यांच्यावर दृढ विश्वास दाखवला. हा जनतेचा विश्वास सार्थ करत देवेंद्रजींनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. ‘राष्ट्र प्रथम’ची संकल्पना, त्यासाठी केलेल्या राजकीय हालचाली आणि बदलती समीकरणे, त्याचप्रमाणे वेळ प्रसंगी दोन पाऊले मागे येऊन, पुढे जाण्याची तयारी, हीच खरी देवेंद्र यांच्या नेतृत्व कौशल्याची जमेची बाजू ठरली आणि याच माध्यमातून जनतेने दिलेले ‘लोकनेते’ हे बिरूद त्यांच्या पाठीशी उभे आहे.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासाचे राजकारण, शाश्वत विकासासाठीचे प्रयत्न आणि त्यासाठी सातत्य, जिद्द व चिकाटी या माध्यमातून मागील नऊ वर्षे ते महाराष्ट्राची सेवा करत आहेत. ‘महाराष्ट्र सेवक’ म्हणून कार्यरत आहेत. कधी मुख्यमंत्री म्हणून, कधी विरोधी पक्ष नेता म्हणून, तर कधी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. या काळात महाराष्ट्रावर अनेक सामाजिक, नैसर्गिक अथवा राजकीय आघात झाले. परंतु, या सर्व आघातांना पुरून उरण्याचे राजकीय-सामाजिक कसब देवेंद्र यांनी दाखवून दिले. ‘हम किसी को छेडते नहीं, छेडा तो छोडते नहीं,’ असे देवेंद्रजी म्हणतात आणि ते जे म्हणतात ते नेहमी करून दाखवतात. त्यामुळेच महाराष्ट्र भाजपमधील प्रत्येक नेता, पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा पार्टीचा सच्चा आणि आश्वासक कार्यकर्ता म्हणून समर्पित भावनेने कार्य करतो आणि यामुळेच देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सलग दोन वेळा, भाजपचे १०० पेक्षा जास्त आमदार निवडून येऊ शकले आहेत.यामागे देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड मेहनतदेखील आहे.
राज्याच्या विकासाच्या योजनांच्या केंद्रस्थानी शेतकर्यांना ठेवलं आणि ’जलयुक्त शिवार’, ‘मागेल त्याला शेततळे’, ‘एक रुपयात पीक विमा’, ‘शेतकरी सन्मान निधी’त राज्याचा सहा हजारांचा वाटा, ’सेवा हमी कायदा’ यांसारखे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. २०१४ ते २०१९ दरम्यान ‘जलयुक्त शिवार योजने’अंतर्गत २० हजार गावांत जलसंधारणाची कामे झाली आणि ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. आता ‘जलयुक्त शिवार’चा दुसरा टप्पा सुरू झाला असून, या दुसर्या टप्प्यात पाच हजार गावांमध्ये काम हाती घेण्यात आले आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी पायाभूत विकास प्रकल्प उभे करण्याचे ध्येय समोर ठेवले. ज्यामध्ये समृद्धी महामार्ग, मुंबईतील विकासकामे, मेट्रो, बुलेट ट्रेन, उद्योगामधील सुधारणा यांसारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या समोर ठेवण्यात आले आणि महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला.
त्याचबरोबर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी देवेंद्रजींनी हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो. परंतु, मागील काळात आरे येथे मेट्रो कारशेड व्हावा, यासाठी देवेंद्रजींनी शर्थीचे प्रयत्न केले. या ठिकाणी कारशेड होण्याचा मार्ग सुकर करून मुंबईकरांचे करोडो रुपये वाचवले. मुंबईत मेट्रोचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी याकाळात युद्धपातळीवर काम झाले. मुंबईतील उद्याने, भाजी मंडईचा विकास, जलवाहिनी दुरूस्ती, नवीन जलस्रोत निर्मिती, उपनगरात नवीन दवाखाने, रुग्णालयांची विकासकामे, मुंबईतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, लखनौच्या धर्तीवर एअर प्युरिफायर टॉवर बसवणे, मिठी, पोयसर, दहिसर आदी नद्यांची पाहणी, जलविद्युत निर्मिती हे प्रकल्प मुंबई महापालिका तत्परतेने पूर्ण करत आहे. ‘अंत्योदया’ची संकल्पना महाराष्ट्रात रुजवण्यासाठी देवेंद्रजी कार्य करत आहेत.
समाजात प्रत्येक घटकाचा विकास व्हावा आणि प्रत्येकाला समान हक्क मिळावे, या उद्देशाने महायुती सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रासाठी पंचामृत अर्थसंकल्प देणारे अर्थमंत्री, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवणारे सक्षम गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी राज्याला ज्ञात आहेत. यापुढील काळातदेखील त्यांच्या सक्षम हातांनी राज्याची अविरत सेवा घडत राहावी, याच सदिच्छा आज व्यक्त करतो.राजकीय वादविवाद, आरोप-प्रत्यारोप यामुळे कुठेही डगमगून न जाता अतिशय हुशारीने, निष्ठेने आणि अविरतपणे देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राच्या विकासात योगदान देत आहेत. महाराष्ट्र राज्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्थैर्य देण्याचे काम केवळ देवेंद्र फडणवीसच करू शकतात, याची खात्री महाराष्ट्रातील जनतेलादेखील आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील अवघी जनता, सारे लोकप्रतिनिधी देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आज देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्यासारखा दूरदृष्टी लाभलेला प्रखर हिंदुत्ववादी नेता आपल्या राज्याला नेतृत्व म्हणून लाभला आहे, याचा सार्थ अभिमान आहे.
देवेंद्रजी,
दीर्घायुरारोग्यमस्तु, सुयशः भवतु, विजयः भवतु, जन्मदिन शुभेच्छाः।
त्वं जीव शतं वर्धमान:।