नवी दिल्ली : इराकमध्ये शेकडो आंदोलकांनी गुरुवारी (दि. २०) रोजी बगदादमधील स्वीडनच्या दूतावासात घुसून आग लावली होती. ते स्वीडनमध्ये कुराण जाळल्याच्या विरोधात निदर्शने करत होते. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, या घटनेत स्वीडिश दूतावासातील कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
ते म्हणाले कि, सरकारने सुरक्षा दलांना दूतावासाचे संरक्षण आणि आंदोलनाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. शिया धर्मगुरू मुक्तदा सदर यांच्या समर्थकांनी गुरुवारी (दि. २०) आंदोलनाची घोषणा केली होती. स्वीडनमध्ये काही आठवड्यांत दुसऱ्यांदा कुराण जाळण्याच्या कटाला ते विरोध करत होते.
स्वीडनच्या मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी पोलिसांनी स्टॉकहोममधील इराकच्या दूतावासाबाहेर निदर्शनास परवानगी दिली. दूतावासाबाहेर दोन आंदोलक कुराण आणि इराकचा ध्वज जाळणार असल्याचे अर्जात सांगण्यात आले. या लोकांपैकी एक तोच होता ज्याने जून महिन्यात मशिदीबाहेर कुराण जाळले होते. निदर्शन आणि त्यानंतर दूतावासाला आग लावण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टेलीग्राम चॅनल वन बगदादच्या वृत्तानुसार, बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास आंदोलक दूतावासासमोर जमू लागले. यानंतर धर्मगुरू सदर आणि कुराणच्या समर्थनार्थ घोषणा देतात. यानंतर त्यांनी दूतावासाला आग लावली होती.