यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात पुन्हा तिसरी घंटा वाजणार

19 Jul 2023 11:45:24

yashwantrao chavan natyasankul




 
मुंबई : नाट्यकर्मीं आणि प्रेक्षकांमधील दुवा म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल. ‘यशवंतराव नाट्य संकुल’ या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. ज्येष्ठ कलाकार, लेखरक दिग्दर्शक यांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेले काही वर्ष ही वास्तू बंद होती. आणि त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर नव्याने निवडून आलेले अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस या वास्तुचे नुतनीकरण सुरु होते. आता हे नाट्यसंकुल कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज झाली आहे. बहुप्रतीक्षित असलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल’ १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी खुले होणार आहे.
 
काही दिवसांपुर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीकडून लवकरच हे संकुल खुले होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्याप्रमाणे आता हे संकुल नाट्यकर्मींसाठी सुरु होत असून संस्थांनी प्रयोग करण्यासाठी नाट्य संकुल व्यवस्थापकांकडे रीतसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.आधुनिक, अद्ययावत अशा या नाट्य संकुलात सुरेख अंतर्गत सजावट, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वछतागृह आदि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबत या नव्या वास्तूत पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
 
नव्याने दिमाखात सुरु झालेलं हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच, रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिलं आहे. ३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरु झाले होते. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रशांत दामले, नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं ह्यासाठी प्रयत्न केले. याच प्रयत्नांमुळे येत्या १ ऑगस्ट पासून हे नाट्य संकुल सज्ज होत आहे.
Powered By Sangraha 9.0