कुठे आहे जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत? जाणून घ्या सविस्तर

19 Jul 2023 13:18:46
world largest office in india

सुरत : आतापर्यंत जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारती म्हणून अमेरिकेतील पेंटागॉन हे होते. पण आता जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत भारतात बांधली जात आहे. गुजरातमधील सुरतमध्ये ही इमारत बांधली जात आहे. सुरत हे हिरे व्यापाराचे केंद्र मानले जाते. या इमारतीचा वापर हिरे व्यापार केंद्र म्हणूनही केला जाणार आहे. ही इमारत पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागली आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जगातील ९० टक्के हिरे सुरतमध्ये तयार होतात. दुसरीकडे, जर आपण अमेरिकेच्या पेंटागॉनबद्दल बोललो, तर गेल्या ८० वर्षांपासून जगातील सर्वात मोठे कार्यालय होण्याचा मुकुट त्याच्याकडे होता, परंतु आता हे शीर्षक सूरत डायमंड बोर्सकडे जाणार आहे.
 
सूरत डायमंड बोर्स म्हणजे काय?

या भव्य इमारतीला सुरत डायमंड बोर्स असे नाव देण्यात आले आहे. जगाची रत्नांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेली सुरतची ही इमारत 'वन स्टॉप डेस्टिनेशन' म्हणून बांधण्यात आली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ही इमारत एकूण १५ मजल्याची आहे. जी ३५ एकरमध्ये पसरलेली आहे. यामध्ये पॉलिशर्स, कटर आणि हिरे व्यापाराशी निगडित सर्व व्यापाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही इमारत नऊ आयताकृती रचनांच्या स्वरूपात बनविली गेली आहे आणि ती सर्व सेंट्रल स्पाइनच्या स्वरूपात एकमेकांशी जोडलेली आहेत. ही इमारत बनवणार्‍या कंपनीने दावा केला आहे की त्यांच्याकडे एकूण ७. १ दशलक्ष चौरस फुटांपैक्षा जास्त जमीन आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ही भव्य इमारत बांधण्यासाठी चार वर्षे लागली.

अनेक व्यापार्‍यांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल-

SBD च्या वेबसाइटनुसार, एकूण २० लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये मनोरंजन आणि पार्किंग क्षेत्र आहे. SDB Diamond Bourse ही कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत नसलेली संस्था आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश गढवी यांनी सांगितले की, नवीन इमारत संकुल हजारो हिरे व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार असून रेल्वेच्या रोजच्या प्रवासातूनही सुटका होणार आहे.

कंपन्यांनी कार्यालये विकत घेतली आहेत

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेनंतर सुरत डायमंड बोर्सचे डिझाइन भारतीय फर्म मॉर्फोजेनेसिसने तयार केले आहे. या संदर्भात माहिती देताना महेश गढवी म्हणाले की, ही इमारत बनवताना आपण अमेरिकेच्या पेंटागॉनला मागे टाकू, असा विचारही केला नव्हता. आम्ही ते केवळ व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बनवले आहे. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, हिरे व्यापाराच्या या हबमध्ये इमारत बांधण्यापूर्वीच हिरे उत्पादक कंपन्यांनी त्यांची कार्यालये विकत घेतली आहेत.




 
Powered By Sangraha 9.0