ओटीटी माध्यमांवरील आशयांना आता लगाम बसणार – अनुराग ठाकूर

19 Jul 2023 12:29:54

anurag thakur 
 


नवी दिल्ली :
करोना काळानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा ओटीटी माध्यमाला अधिक पसंती दिल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी अनेक नवोदित आणि दिग्गज कलाकारांनी आपला मोर्चा ओटीटी माध्यमाकडे वळवला. मात्र, ओटीटी वाहिनीवर दाखवले जाणारे आशय हे आक्षेपार्ह असल्याची तक्रार करत काही कलाकारांनी ओटीटी वाहिनीकडे पाठही फिरवली. लहान मुलांवर त्याचा चुकीचा परिणाम होतो, तसेच. गुन्हेगारांवरही ओटीटी वाहिनीवरील काही वेब मालिका अथवा चित्रपटांचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा दुष्परिणाम होत असल्याचेही दिसून आले. याच विषयासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींबरोबर महत्त्वाची बैठक घेतली.
 
सद्यस्थिती पाहता ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वेब मालिकांवर बंधने घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले. अनुराग ठाकूर म्हणाले, “ओटीटी माध्यमांना सर्वप्रथम हे कळाले पाहिजे की, त्यांच्या सीरिज प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक पाहतात. त्यामुळे याठिकाणी प्रसारित होणाऱ्या प्रत्येक सीरिजबाबत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.”
 
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, “फक्त कंटेटच्या नावाखाली सरकार केव्हाच भारतीय संस्कृती आणि समाजाचा अपमान होऊ देणार नाही. ओटीटी माध्यमांनी त्यांची प्राथमिक जबाबदारी समजून घेऊन समाजात कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घ्यावी. ओटीटीला कल्पकतेचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अश्लीलता, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्याचे नाही.” तसेच, अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’ या नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. हा पुरस्कार ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्याही भारतीय भाषेत प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट वेब मालिकेला देण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0