चर्चसंस्थेचे असेही 'मिरॅकल'

19 Jul 2023 21:26:32
Gilbert Deya Kenyan miracle babies pastor acquitted of child trafficking

१९९९ ते २००४ दरम्यान पाच बालकांचे अपहरण म्हणण्यापेक्षा, त्या बालकांची चोरी झाली. म्हणून पाद्री गिल्बर्ट डेयावर २००६ साली केनिया देशातील नैरोबी येथे गुन्हा दाखल झाला. त्यासाठी त्याला लंडन येथे २००७ साली अटक झाली. दि. १६ जुलै रोजी नैरोबी, केनिया न्यायालयात मजिस्ट्रेट रॉबिसन ओन्डिएकी यांनी म्हटले की, “पादरी गिल्बर्ट डेया यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा प्राप्त झाला नाही, त्यामुळे त्यांचा गुन्हा सिद्ध होत नाही. निर्दोष म्हणून त्यांची मुक्तता केली जात आहे.” पण खरेच हा पाद्री गिल्बर्ट निर्दोष आहे का?

१९३७ साली जन्मलेला गिल्बर्ट हा मूळचा केनियाचा. त्याच्या आईवडिलांना एकूण १५ मुले. त्यापैकी गिल्बर्टचा क्रमांक ११वा. २१ वर्षांचा असताना त्याने १४ वर्षांच्या एडाहशी विवाह केला. या दोघांनाही १५ मुले. (बच्चे अल्ला की देन हैं!) म्हणणार्‍यांच्या सोबतच गर्भपात येशूला मान्य नाही. त्यामुळे गर्भधारणा झालेल्या प्रत्येक मातेने कोणत्याही परिस्थितीमध्ये मूल जन्माला घातलेच पाहिजे, असे म्हणणारेही जगात आहेत.

पुढे गिल्बर्टलंडनला आला. इथेही त्याने चर्च उघडले. लंडनमध्ये पाद्री गिल्बर्ट जाहीर आवाहन करू लागले की,”कधीही मातृत्व प्राप्त न करू शकणार्‍या महिला इतकेच काय, रजोनिवृत्ती झालेल्या महिलासुद्धा कुणाही पुरुषाशी लैंगिक संबंध न ठेवता प्रार्थनेच्या जादूने आणि येशूच्या कृपेने बालकांना जन्म देऊ शकतात.” त्यामुळे गिल्बर्टच्या लंडनमधील चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी अपत्यहीन मातांची गर्दी वाढू लागली. त्यांची इच्छा पूर्णही व्हायची. मात्र, मुलांना जन्म देण्यासाठी त्यांना नैरोबीला जावे लागे. ही मुले येशूच्या कृपेने आणि प्रार्थनेच्या जादूने होत. त्यामुळे या मुलांना ‘मिरॅकल बेबी’ म्हणायचे, असे पाद्री गिल्बर्ट सांगे. याच ‘मिरॅकल’च्या माध्यमातून लंडनच्या एका महिलेने एका वर्षात तीन ‘मिरॅकल बेबीं’ना जन्म दिला. एका वर्षात एका स्त्रीने काही महिन्यांच्या अवधीत तीन मुले जन्माला घालण्याचे तंत्र अजून तरी कुठेही विकसित झाले नाही. मग गिल्बर्टच्या प्रार्थनेची जादू आणि येशूच्या कृपेने हे साध्य झाले होते का?

तर २००४ साली नैरोबी येथून पाद्री गिल्बर्ट डेयाची पत्नी एडाह हिला बालक चोरीच्या गुन्ह्यासाठी अटक झाली. तिने सांगितले की, ते बाळ तिचे आहे. मात्र, ‘डीएनए’ तपासणीत सिद्ध झाले की, ते बाळ तिचे नव्हते. याच संदर्भात डेया कुटुंबाच्या घरी दहा नवजात बालके सापडली. ती बालके डेया कुटुंबातली नव्हती. तसेच, बालकांच्या माता म्हणून ज्यांना सांगितले गेले होते, त्या मातांची आणि बालकांची ‘डीएनए’ तपासणी केली असता. ती बालके त्या मातांची नाहीत हे सिद्ध झाले. दुसरीकडे २० बालकेही सापडली. डेया कुटुंबाने सांगितले की, ‘ही बालके अनाथ आहेत. तसेच, काही बालकांचे वा पालक गरीब आहेत. म्हणून आम्ही त्यांचा सांभाळ करत आहोत.’ प्रत्यक्षदर्शी ठिकाणी एडाह पुराव्यासकट गुन्हेगार म्हणून सापडली, तिच्यावर खटला दाखल झाला आणि तिला शिक्षाही झाली. बालक चोरीचा आणि पाद्री गिल्बर्टचा अर्थोअर्थी काही संबंध नक्कीच असणार, असे लोकांचे म्हणणे आहे.

कारण, पादरी गिल्बर्टकडे येणार्‍या महिलांना अपत्य जन्मासाठी केनियाला नेले जायचे. नेमके तिथेच पादरी गिल्बर्टच्या पत्नीवर, एडाहवर बालक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. ‘मिरॅकल बेबी’ वगैरे काही नसून, ती चोरलेली बालके होती, असेही लोकांचे म्हणणे होते. याआधीही २००४ साली पाद्री गिल्बर्टवर लंडन येथे महिलेवर आणि एका बालिकेवरसुद्धा बलात्कार केला. म्हणून गुन्हा दाखल झाला होता. त्या खटल्यातून ते सुखरूप सुटला. आजही तो बालक चोरीच्या गुन्ह्यातून सुटला. मात्र, ‘मिरॅकल बेबी‘ या तद्दन, तर्कहीन आणि खोट्या फसवणुकीसाठी, त्याला न्यायालयाने का दोषी ठरवले नाही?

तर याचे उत्तर आहे केनिया. हा ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य असणारा देश आहे. चार हजारांच्यावर मोठमोठे चर्च असणारा देश. चर्चसंस्थेला ’मिरॅकल’ म्हणजे ‘प्रार्थनेची जादू‘ आणि ‘येशूची कृपायुक्त जादू’ सर्वसामान्य आहे. त्यामुळे केनियाचे न्यायालय ‘मिरॅकल बेबी’च्या नावे गोरगरीब मातांची बालके चोरून धनवान मातांना विकणार्‍या पाद्री गिर्ल्बटला गुन्हेगार ठरवू शकले नाही. चर्चसंस्थेचे, असे ‘हे मिरॅकल’?!
९५९४९६९६३८

Powered By Sangraha 9.0