करण्या रक्षण-आभूषण, टोचावे बाळाचे कान! कर्णवेध संस्कार

19 Jul 2023 22:24:00
Article On Karnvedh Sanskar

कान हे पंचज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय. यालाच ‘श्रोतृ’, ‘कर्ण’ किंवा ‘श्रवणेंद्रिय’ असेही म्हणतात. चेहर्‍याच्या दोन्ही बाजूंची शोभा वाढवणारे दोन कान म्हणजे जणू काही शब्दशक्तींचे दूतच, अशा या कानांच्या खालच्या भागाला विंधणे किंवा छिद्र पाडणे म्हणजेच ‘कर्णवेध संस्कार’ होय. संस्कार श्रृंखलेतील या नवव्या संस्काराला ‘कान टोचणे’ असेही म्हणतात.

ओं भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा
भद्रं पश्येमाक्षभि: यजत्रा:।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभि:
व्यशेमहि देवहितं यदायु:॥
(यजुर्वेद-२५/२१)

अन्वयार्थ

(यजत्रा:) हे संगत करण्यायोग्य, (देवा:) दिव्यगुणयुक्त शक्तींनो, दिव्यजनहो, आम्ही (कर्णेभि:) आम्ही आमच्या कानांनी (भद्रम्) पवित्र व कल्याणकारी विचार (श्रुणुयाम:) ऐकावे, श्रवण करावे. (अक्षभि:) डोळ्यांनी (भद्रम्) शुद्ध व मंगलमय असेच (पश्येम्) पाहावे. (स्थिरै: अङ्गै:) दृढ व स्थिर अशा अंगांनी, अवयवांनी (तुष्टुवांस:) आपली स्तुती करणारे आम्ही (तनूभि:) निरोगी शरीरांनी (देवहितम्) परमेश्वरासाठी अनुकूल व विद्वानांसाठी कल्याणकारक (यद् आयु:) जे काही आयुष्य लाभले आहे, त्यास आम्ही (व्यशेमहि) चांगल्या प्रकारे मिळवोत.

विवेचन

यजुर्वेदातील हा सुपरिचित असा आशयघन मंत्र आहे. यात आम्ही आमच्या कानांनी सत्य, मधुर व मंगलमय शब्द ऐकावेत आणि डोळ्यांनी पवित्र असेच दृश्य पाहावेत. समग्र शरीराने व शरीराच्या सर्व अवयवांनी सर्वांसाठी हितकारक असे सार्थक आयुष्य वेचावे, असा मंगलमय उपदेश मिळतो, जो की नेहमीच्याच जीवनात उपयुक्त ठरणारा आहे. विशेष करून कर्णवेध संस्कार प्रसंगी हा मंत्र म्हटला जातो.

कान हे पंचज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय. यालाच ‘श्रोतृ’, ‘कर्ण’ किंवा ‘श्रवणेंद्रिय’ असेही म्हणतात. चेहर्‍याच्या दोन्ही बाजूंची शोभा वाढवणारे दोन कान म्हणजे जणू काही शब्दशक्तींचे दूतच, अशा या कानांच्या खालच्या भागाला विंधणे किंवा छिद्र पाडणे म्हणजेच ‘कर्णवेध संस्कार’ होय. संस्कार श्रृंखलेतील या नवव्या संस्काराला ‘कान टोचणे’ असेही म्हणतात. इतर संस्कारांच्या तुलनेत हा संस्कार तसा छोटाच आहे. बहुतांश कुटुंबे आपल्या बाळाला सरळ सोनाराकडे घेऊन जातात आणि त्यांच्याकरवी कान टोचून घेतात. कदाचित यावरूनच ‘सोनारानेच कान टोचावे’ अशा आशयाची म्हण रूढ झाली आहे. या म्हणीचा हेतू हाच की, त्या त्या व्यक्तीने ते ते काम करावे. दुसर्‍यांनी इतरांच्या कामात लक्ष घालू नये किंवा ज्यांना जे शक्य आहे, त्यांनीच ते करावे. पण, अशा म्हणी रूढ झाल्या, त्या एक प्रकारे अज्ञानातूनच. वास्तविक पाहता कान सोनाराने नव्हे, तर कुशल अशा वैद्याने वा चिकित्सकाने टोचावेत. याचे प्रमाण सुश्रुत आचार्यांनी दिले आहे-

भिषक् वामहस्तेन आकृष्य
कर्णं दैवकृते छिद्रे ।
आदित्यकरावभासिते
शनै:शनै: ऋजु: विध्येत्॥
भिषक् म्हणजेच प्रवीण अशा वैद्याने आपल्या डाव्या हाताने बाळाच्या कानाला ओढून वा पकडून सूर्याच्या किरणांनी चमकणार्‍या दिव्य अशा छिद्राला सावकाश व सावधपणे वेधावे (टोचावे). कारण, वैद्यांना कानामधील शिरांचे वगैरे पुष्कळ ज्ञान असते. त्यामुळे तेच सुव्यवस्थितपणे हे कर्णवेधाचे कार्य करू शकतात.

हा संस्कार केव्हा करावा, यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. कात्यायन गृह्यसूत्राच्या पारस्कर परिशिष्टात म्हटले आहे - ‘अथ कर्णवेधो वर्षे तृतीये पंचमे वा....!’ म्हणजेच बाळाच्या वयाच्या तिसर्‍या किंवा पाचव्या वर्षी हा संस्कार करावा. पण, सुश्रुत सूत्रस्थानाच्या सोळाव्या अध्यायात वर्णिले आहे - ‘षष्ठे मासि सप्तमे वा शुक्लपक्षे....!’ सहाव्या किंवा सातव्या महिन्याच्या शुक्लपक्षात आपणांस अनुकूल अशा तिथीला हा संस्कार करावा. आजकाल मोठ्या प्रमाणात याच अनुषंगाने बाळाच्या जन्माच्या सहाव्या किंवा सातव्या महिन्यांतच कान टोचण्याचे कार्य उरकले जाते. पण, हा संस्कार मात्र कोणीच करीत नाही. खरे तर कानटोचणी ही बाळाच्या नाजूक अशा अवयवाला त्रासदायक भासणारी ही प्रक्रिया आहे. कारण, जावळ काढताना तितक्याशा वेदना होत नाहीत. पण, कर्णवेध करणे म्हणजे एक प्रकारे शस्त्रक्रियाच नव्हे काय? म्हणूनच प्राचीन ऋषीमुनींनी या प्रक्रियेला १६ संस्कारांपैकी एका संस्काराचे रूप दिले आहे.

हा संस्कार का व कशासाठी करावा? यासंदर्भात सुश्रुताचार्य म्हणतात- ‘रक्षाभूषणनिमित्त बालस्य कर्णौ विध्येत्!’ म्हणजेच बाळाचे शारीरिकदृष्ट्या रक्षण करण्याच्या उद्देशाने व कानांमध्ये आभूषणे धारण करविण्याच्या निमित्ताने हा संस्कार करण्यात येतो. सौंदर्यवाढीच्या दृष्टीने कानात नानाविध दागिने घालण्याचा हेतू असला तरी खर्‍या अर्थाने यामागचा मुख्य उद्देश आहे, तो बाळाचे शारीरिक आरोग्य रक्षण करण्याचा! म्हणूनच याविषयी सुश्रुतकार म्हणतात-
शङ्खोपरि च कर्णान्ते
त्यक्त्वा यत्नेन सेवनीयम्।
व्यत्यासाद् वा सिरां
विध्येत् अन्त्रवृद्धिनिवृत्तये ॥
(चिकित्सा स्थान-१९,२१)आंत्रवृद्धी किंवा आंतगळ हा एक आजार आहे. यालाच आधुनिक भाषेत ‘हर्निया’ असे म्हणतात. या रोगापासून मुक्त होण्याकरिता दोन्ही कान टोचावेत लागतात. वरील श्लोकांचा पूर्ण अर्थ असा आहे- शंख म्हणजेच कानपट्टी. या कानपट्टीच्या वर कानाच्या आतील भागात जे जोड आहे, ते सोडून व्यत्ययाने म्हणजेच नसीला छिद्र पाडल्याने आंत्रवृद्धी (हर्निया)हा आजार नाहीसा होतो. व्यत्यय म्हणजेच उजव्या बाजूकडील आंत्रवृद्धीला नाहीसे करण्याकरिता डाव्या कानाला टोचावे व डाव्या बाजूच्या आंत्रवृद्धीला रोखण्याकरिता उजवीकडील कानाला टोचावे.

ज्या दिवशी हा संस्कार करावयाचा आहे, त्या दिवशी सकाळी बालकाला स्वच्छ स्नान घालावी व नूतन वस्त्रे धारण करवून यज्ञवेदीवर आणावे. नेहमीप्रमाणे पूर्णतः बृहद्यज्ञ संपन्न करावा. यज्ञादी मंगल कार्य झाल्यानंतर शेवटी तज्ज्ञ अशा वैद्यांना बोलावून प्रारंभी निर्दिष्ट केलेल्या ‘भद्रं कर्णेभि श्रुणुयाम देवा.....’ या मंत्राने बाळाच्या उजव्या कानाला विंधावे, छिद्र करावे. हे कार्य करताना नस-नाडीला इजा होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. त्याचबरोबर खालील मंत्राने डाव्या कानाला छेद करावा-
वक्षन्तीवेदा गनीगन्ति कर्णं
प्रियं सखायं परिषस्वजाना।
योषेव शिङ्क्ते वितताधि
धन्वञ्ज्या इयं समने पारयन्ति ॥
(यजुर्वेद-२९/४०)
म्हणजेच संग्रामात धनुष्यावरील ताणलेली ही दोरी (प्रत्यंच्या) युद्धात पूर्णत्वाला प्राप्त करते. ती आपल्या प्रिय वाटणार्‍या कानाला जणू काही आलिंगनच देत आहे आणि कानाजवळ येऊन काहीतरी बोलत आहे, जशी की जणू काही पत्नी आपल्या पतीच्या कानात येऊन काहीतरी कुजबुजतेय.

उपमा अलंकार आलेला आहे. युद्ध मैदानात धनुष्यावर ताणलेली दोरी कानापर्यंत येते. म्हणजेच ती काहीतरी विजयाचा संदेश देत आहे. असा हा संस्कार बाळाच्या कानी आभूषणे धारण करून त्याची शोभा वाढवण्याचे कार्य करतो, तर त्याचबरोबर त्याला आंत्रवृद्धी (हर्निया) सारख्या आजारापासून दूर करण्याचेही कार्य करतो. एकूणच शारीरिक रक्षण आणि सौंदर्य संवर्धन हाच या कर्णवेध संस्काराचा मूलभूत पवित्र उद्देश आहे. (क्रमश:)

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८
Powered By Sangraha 9.0