धर्मवीर शंभू चरित्र मांडणारे निलेश

    19-Jul-2023
Total Views | 102
Article On Hindutvavadi Nilesh Bhise

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी होत असलेली छेडछाड आणि विद्रोही मांडणी याला छेद देत धर्माभिमानी आणि धर्मवीर संभाजी महाराज समाजासमोर मांडणार्‍या निलेश भिसे यांच्याविषयी...

निलेश भिसे हे पुण्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते. अगदी बालवयापासूनच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामुळे ते भारावून गेले. पुढे जाऊन त्यांनी याविषयी अभ्यास सुरू केला. शंभुराजांना विद्रोही ठरविण्याचा केला जात असलेला प्रयत्न पाहून त्यांना अभ्यासपूर्ण उत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या. त्यांनी याविषयी एक नाटक लिहिले आणि ते नाटक प्रत्यक्षात रंगमंचावर साकारही करून दाखविले. आपल्या ओघवत्या वाणीमधून शेकडो व्याख्याने गाजवली. हिंदू धर्म रक्षणाच्या विचाराने प्रेरित झालेले निलेश धर्मवीर शंभुराजांच्या कर्तृत्व आणि कर्तबगारीला जागण्याचे काम करीत आहेत.

निलेश यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. त्यांचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने सातारा येथून पुण्यात आले. निलेश यांचा जन्म पुण्यातच झाला. शालेय आणि बारावीपर्यंतचे शिक्षण मॉडर्न महाविद्यालयामध्ये झाले. त्यानंतर, पुणे विद्यापीठामधून त्यांनी ’बी.कॉम’पर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय जीवनापासूनच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची चरित्रे प्रेरित करीत आली. त्यांच्या बालमनावर या महापराक्रमी पितापुत्रांच्या कर्तृत्वाची आणि शौर्याची छाप पडली. हिंदू धर्म आणि हिंदू रयतेचे रक्षण करून स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरविणार्‍या महापुरुषांविषयीच्या पुस्तकांचे वाचन ते करीत होते. याच काळात १९८९ सालची रुबीया सय्यद हिचे दहशतवाद्यांनी केलेले अपहरण आणि तिच्या सुटकेसाठी चार दहशतवाद्यांना सोडण्यात आल्याची घटना त्यांच्या वाचनात आली.

त्यावेळी त्यांच्या मनात शंभुराजे वयाच्या आठव्या वर्षी मिर्झाराजे जयसिंगांकडे ओलीस राहिल्याची घटना चमकून गेली. दरम्यान, पुण्यात ‘संभाजी ब्रिगेड’कडून ’भांडारकर इन्स्टिट्यूट’वर हल्ला झाला. त्यानंतर आरोपांची राळ उडवित संभाजी महाराजांविषयीची मांडणी वेगळ्या पद्धतीने सुरू झाली. त्यामुळे व्यथित झालेल्या निलेश यांनी संभाजी महाराजांचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. हा अभ्यास करीत असतानाच त्यांनी ’मृत्यूंजय अमावस्या’ हे महानाट्य लिहिले. शंभुराजांचा धर्माभिमान लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच कलाकार म्हणून तयार करण्यात आले. नाटकाची संहिता तयार करून प्रत्यक्षात नाटक रंगमंचावर अवतरले. संभाजी महाराज हे धर्मवीरच होते आणि त्यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचा रोमांच उभा करण्यात आला. या नाटकाचे पुणे आणि जिल्ह्यात भरपूर प्रयोग झाले.

याच काळात ‘शिवसमर्थ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून १५ गणेश मंडळांना एकत्र केले. सर्वांनी मिळून एकच शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला. याच काळात ते विश्व हिंदू परिषदेचे काम करीत होते. नाटकाच्या यशामधून त्यांना शंभुराजांच्या चरित्राविषयी व्याख्यांनासाठी विचारले जाऊ लागले. तेव्हापासून त्यांच्या व्याख्यानांना सुरुवात झाली. त्यांनी आजवर शेकडो व्याख्यानांच्या माध्यमातून हिंदूधर्माभिमानी संभाजी महाराज समाजासमोर मांडले आहेत. राज्यातील विविध भागांत निघणारे हिंदू मोर्चे, आंदोलनांमध्ये ते प्रमुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित असतात. त्यांचे कानावर पडणारे तप्त शब्द पडत असताना लोकांच्या अंगावर रोमांच उठतात. ’लव्ह जिहाद’ विषयावरदेखील त्यांचे काम सुरू आहे. गोरक्षणावरदेखील त्यांनी काम केलेले आहे. ‘संभाजी ब्रिगेड’कडून ‘बुधभूषण’ ग्रंथाचे दाखले देत संभाजी महाराजांची विद्रोही मांडणी सुरू करण्यात आली. या मांडणीला छेद देण्यासाठी त्यांनी ‘बुधभूषण’चा अभ्यास केला. ’ब्रिगेड’च्या विखारी मांडणीला त्यांनी आपल्या अभ्यास आणि व्याख्यानांमधून छेद द्यायला सुरुवात केली.

निलेश यांच्यावर इतिहास काळातील महापुरुषांसोबतच आधुनिक काळातील राष्ट्राभिमानी कार्यकर्त्यांचा मोठा प्रभाव राहिला. बालपणापासून स्वयंसेवक असलेले निलेश संघाच्या मुशीत घडत होते. गोध्रा कांड घडल्यानंतर ते अयोध्येला शीलापूजन कार्यक्रमाला गेले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एका कार्यक्रमात त्यांनी प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. नुकत्याच झालेल्या संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक कार्यक्रमात त्यांनी रायगडाच्या राजसदरेवरून विद्रोही इतिहासकारांना खुले आव्हान दिले. ‘समोरासमोर बसून संभाजी महाराजांच्या चरित्राविषयी चर्चा करा आणि संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, हे सिद्ध करून दाखवा,’ असे त्यांनी आव्हान दिले. त्याउलट निलेश यांनी ‘आपण कोणत्याही कादंबरीच्या आधारावर नाही, तर समकालीन पुराव्यांच्या आधारावर संभाजी महाराज, हे धर्मवीरच होते, हे आपण सिद्ध करू,’ असे ठणकावून सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करून भलताच इतिहास मांडण्याच्या प्रयत्नाला प्रत्त्युतर देण्यासाठी निलेश काम करीत आहेत. नुकतेच त्यांचे ’विद्यार्थ्यांचे शंभुराजे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. इतिहासाचे विकृतीकरण करून वैचारिक द्रोह माजविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना वैचारिक लेखनाद्वारे उत्तर देण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. शंभुचरित्राचा सर्वदूर प्रसार करणे आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि धर्म जागृती करणे, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण लक्ष हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या चरित्र अभ्यास, लेखन आणि वास्तवदर्शी मांडणी यावर केंद्रित केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

लक्ष्मण मोरे 
९९२१११११५५


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121