'केदारनाथ'ला जाणार आहात? मोबाईल फोन, व्हीडिओ शूटींग नियमावली वाचा!

17 Jul 2023 16:09:37
Use of mobile phones, photography banned in Kedarnath

डेहराडून
: केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करू नये , असे फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी एका प्रपोजचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून वाद वाढल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. आता मात्र मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास पुर्णपणे बंदी आहे.

मंदिराच्या आवारात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिरात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. अन्य काही मंडळांमध्ये मंदिर आणि मंदिर परिसरात वस्त्रसंहिता ही लावण्यात आली आहे. तर अन्य एका फलकामध्ये मंदिर परिसरात मंडप किंवा छावणी उभारणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे म्हटले आहे.असे करताना पकडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या फलकांवर स्पष्ट लिहिले आहे.

नुकतेच, गढवाल हिमालयात असलेल्या केदारनाथ मंदिरात बनवलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते, ज्यावर तीर्थक्षेत्राच्या पुजार्‍यांपासून ते सर्वसामान्य भाविक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता आणि धार्मिक स्थळांवरील अशा कृत्यांचा निषेध करण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये एक पुरुष व्लॉगर आपल्या मैत्रिणीला मंदिराच्या आवारात गुडघ्यांवर नाटकीय पद्धतीने प्रपोज करताना दिसत होता, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला मंदिराच्या गर्भगृहात नोटा उडवताना दिसत आहे. याशिवाय केदारनाथ मंदिरातही अनेक लोक रीले बनवताना दिसले.
 
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, धार्मिक स्थळाला प्रतिष्ठा, श्रद्धा आणि परंपरा असतात आणि भाविकांनी त्यानुसार वागले पाहिजे. बद्रीनाथ धाममध्ये अद्याप अशी कोणतीही तक्रार आली नसली तरी लवकरच तेथेही असे फलक लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0