उलट्या, जुलाबाची साथ ही मुख्यत्वेकरून पावसाळ्यात येते. परंतु, याची लागण मुलांना कुठल्याही हंगामात होते. दूषित अन्न व दूषित पाण्याच्या सेवनाने या आजारास सुरुवात होते. उलट्या, जुलाब हा घरगुती आजार आहे. डॉक्टरकडे जाप्याची गरज नाही, अशी बर्याच पालकांची समजूत असते. पण, घरगुती उपचारांनी सौम्य स्वरूपाचा आजार थांबू शकतो. मात्र, जास्त प्रमाणात उलट्या जुलाब होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज करणे आवश्यक असते. त्याविषयी आजच्या लेखातून माहिती करुन घेऊया...
उलट्या-जुलाबाची तीव्रता ही तीन वर्षांखालील मुलांमध्ये अधिक असते व त्यातील काही मुलांना शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. शाळेत जाणार्या मुलांमध्ये उलट्या-जुलाब सुरू झाले, तर व्यवस्थित उपचार केल्यास रुग्णालयात दाखल करण्याची पाळी सहसा येत नाही.
उलट्या-जुलाबाची कारणे
१) दूषित अन्न व पाण्यातून जंतूंचा प्रादुर्भाव : सालमोनेला, शिगेला, कॉलरा, इकोलाय व प्रोटिएज जंतू उलट्या जुलाबास कारणीभूत ठरतात.
२) जीवाणूंचा प्रादुर्भाव : ‘रोटा व्हायरस’ : मुख्यत्वेकरून या जुलाबाची लागण लहान मुलांमध्ये होते.
३) कृमी : अमिबा, जिआरडिया यांसारख्या कृमी व जंताचा प्रादुर्भाव यामुळेदेखील उलट्या जुलाब होऊ शकतात.
४) अन्न विषबाधा : शिळे अन्न, दूषित अन्न यामुळेदेखील उलट्या, जुलाब होऊ शकतात. गेल्यावर्षी एका शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील मुलांना पेढे वाटण्यात आले. हे पेढे खाल्ल्यामुळे कित्येक मुलांना उलट्या, जुलाब होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली. सार्वजनिक समारंभात मुलांना खाऊ वाटताना त्यांच्या ताजेपणाबद्दल खात्री करून घ्यावी आणि मगच असा खाऊ मुलांना वाटावा.
लक्षणे
मुलांना उलट्या, जुलाब होत असताना त्यांच्या शरीरातील पाणी कमी तर झाले नाही ना, यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला उत्तम. परंतु, ते शक्य नसल्यास पालक घरीदेखील शरीरातील पाणी कमी (डिहायड्रेशन) झाल्याचे निदान करू शकतात.
१) कमी प्रमाणातील डिहायड्रेशन: अंग गरम लागणे, नाडी जोराने चालणे, अस्वस्थपणा वाटणे.
२) मध्यम प्रमाणातील डिहायड्रेशन : त्वचेचा लवचीकपणा कमी होऊन त्वचेला सुरकुत्या पडणे.
३) तीव्र प्रमाणातील डिहायड्रेशन : डोळे खोल जाणे, जीभ कोरडी पडणे, लघवी कमी होणे, शुद्ध हरपणे.
याशिवाय फणफणून ताप येणे, आकडी येणे, शौचावेट रक्त जाणे, शुद्ध हरपणे इत्यादी उपद्रवदेखील या आजारात दिसू शकतात. कुपोषण असलेल्या मुलांमध्ये उपद्रव होण्याची शक्यता जास्त असते. अशा मुलांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.
मध्यम व तीव्र प्रमाणात डिहायड्रेशन असलेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात. मात्र, उलट्या, जुलाब सुरू झाल्यावर वेळीच डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार सुरू केल्यास रुग्णालयात दाखल करण्याचे टाळता येते.
उपचार
मुलांमध्ये उलट्या, जुलाबाच्या आजारावर उपचार करताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो.
१. शरीरातील पाणी व क्षार कमी होऊ न देणे
२. जंतूमुळे किंवा कृमीमुळे उलट्या जुलाब होत असल्यास त्यावरील औषधोपचार करणे.
३. अन्न व पोषक द्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा ठेवणे.
१. शरीरातील पाणी व क्षार कमी होऊ न देणे : जास्त प्रमाणात उलट्या व जुलाब होत असल्यास नसेतून सलाईन देऊन डिहायड्रेशन टाळता येते. कमी प्रमाणात उलट्या, जुलाब होत असल्यास मीठ-साखरेचे पाणी जास्त प्रमाणात पाजावे. बाजारात अनेक ‘ओआरपी’ (Oral Rehydration Powder) उपलब्ध आहेत. घरीदेखील ‘ओआरएफ’ (Oral Rehydration Fluid)बनविता येते.
दोन ग्लास पाण्यामध्ये एक मूठ साखर व दोन चिमूट मीठ टाकून ‘ओआरएफ’ बनविता येते. हे पाणी जास्तीत जास्त पाजणे आवश्यक असते. साधारणतः पाच वर्षांच्या मुलाला तीन ते चार ग्लास ‘ओआरएफ’ पाजावे. यामध्ये काटकसर करू नये.
२) औषधोपचार : जंतूमुळे होणार्या उलट्या, जुलाबावर सेप्ट्रान (Septran), ग्रॅमोनेग (Gramoneg) नॉरफ्लॉक्स (Norflox) ही औषधे लागू पडतात. कृमीमुळे होणार्या जुलाबावर मेट्रोजिल (Metrogyl) मेबेक्स (Mebex) ही औषधे लागू पडतात. बर्याच वेळा जुलाब हे जंतूमुळे होतात की कृमीमुळे हे निदान करणे. कठीण जाते अशा वेळेस ही दोन्ही औषधे एकत्र दिली जातात. उदा. ग्रॅमोजील (Gramogyl) नॉरमेट (Normet) ही औषधे मुलांचे वय व वजन यांचा विचार करून दिली जातात त्यामुळे ती फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
३) अन्न व पोषक द्रव्यांचा पुरवठा : उलट्या, जुलाब होत असल्यास अन्न वर्ज्य करावे हा एक गैरसमज आहे. उलट्या थांबल्यावर ‘ओआरएफ’ भाताची किंवा आरारूटची पेज, पातळ ताक, नरम केळी असा आहार घ्यावा. सफरचंदाचा व डाळिंबाचा रसदेखील उपयोगी ठरू शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्यात पाणी दूषित असते . तसेच सर्वत्र माश्यांचे थैमान असते. यामुळे साथ लवकर फैलावते. पावसाळ्यात पाणी गाळून व उकळून प्यावे. हे जरा त्रासाचे असले तरी आरोग्यदायी आहे. Zero B, Aqua Guard यानेदेखील पाणी शुद्ध राखता येते. प्रवासात शक्य असल्यास ‘मिनरल वॉटर’ पिणे. शिळे अन्न, हॉटेलमधील व फेरीवाल्यांकडील पदार्थ सहसा खाऊ नये. श्रावण महिन्यात आपण मांसाहार बंद करतो. त्याप्रमाणे पावसाळ्यात बाहेरील पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. शाळेच्या बाजूस अन्नपदार्थ विकणारे फेरीवाले असल्यास त्यांना निदान पावसाळ्यापुरते तरी दूर करावे. हे सर्व तुम्ही आम्ही करण्याचे उपाय. आपल्या मायबाप सरकारकडून व लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा कराव्या? शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठ्याचे वचन प्रत्येक पक्ष व सरकार देते. या भुलथापांना भुरळून आपण त्यांना निवडून देतो. त्यांच्याकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पुढीलप्रमाणे आहेत.
१) पिण्याच्या पाण्याचा पाईप व सांडपाण्याचा पाईप यामध्ये अंतर असावे.
२) पिण्याचा पाण्याची टाकी व सांडपाण्याची टाकी यामध्ये अंतर असावे. अनधिकृत बांधकामांमध्ये बिल्डर, समाजसेवक व सरकारी अधिकारी गब्बर होतात. पण, सार्वजनिक आरोग्याची वाट लागते. असल्या लोकांचा जाहीर निषेध करण्यासाठी सामान्य नागरिकांनी एकत्र यावे. दुर्दैवाने असे होत नाही. उलट असल्या समाजसेवकांचा आपण सत्कार घडवून आणतो.
३) पावसाळाच्या पाण्याने कचरा लगेच कुजतो व ते रोगराईस निमंत्रण ठरते. कचर्याच्या कुंड्या नियमितपणे साफ करून त्याभोवती कीटकनाशक पावडर टाकणे. लोकप्रतिनिधीनीं खास करून पावसाळ्यात या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे.
४) गलिच्छ वस्तींमध्ये रस्त्यावर शौचालयास बसण्यास मुलांना प्रतिबंध करावा व वेळ आल्यास अशा मुलांना, पालकांना दंड करावा.
५) हॉटेल्स, फेरीवाले यांच्याकडील अन्न व पाणी यांची नियमित तपासणी केली जावी.
प्रतिबंधात्मक उपायात शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो. एखाद्या तासाला शिक्षकांनी मुलांना पावसाळ्यात होणार्या साथीच्या रोगांची माहिती द्यावी. कावीळ, टायफॉर्डड, कॉलरा इत्यादी रोगांच्या माहितीबरोबर पाणी व अन्न शुद्धीकरणाचे उपाय याबद्दल माहिती द्यावी. याने काही मुलांनी, प्रभावित होऊन चांगल्या सवयी जडवून घेतल्या, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ते एक मोठे कार्य ठरणार आहे.
डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३