विद्यार्थ्यांची गणिताची भीती घालविणारी शास्त्रज्ञ हरपली : सुधीर मुनगंटीवार

    17-Jul-2023
Total Views |
Dr Mangala Jayant Narlikar Passed Away

मुंबई
: प्रा. डॉ. मंगला जयंत नारळीकर यांच्या निधनाने विद्यार्थ्यांना गणित अतिशय सोपे करून शिकविणाऱ्या आणि त्यांची गणिताची भीती घालविणाऱ्या एक श्रेष्ठ शास्त्रज्ञास आपण आज मुकलो आहोत, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या आयुष्यात सावलीसारखी अत्यंत खंबीर साथ देणाऱ्या अर्धांगिनी इतकीच प्रा.डॉ. मंगला नारळीकर यांची ओळख नव्हती तर त्या स्वतः एक गणितज्ञ विदुषी होत्या. त्यांना विद्यार्थ्यांना विशेषतः लहान मुलांना गणित शिकवायला आवडायचे. गणित अतिशय सोपे करून शिकविण्यात त्यांची हातोटी होती. त्यातून अनेक विद्यार्थ्यांची गणिताची भीती घालवून त्यांना गणिताची आवड निर्माण करण्यात त्यांना यश आले होते. शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत त्या विद्यार्थीप्रिय होत्या.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवतीच्या कळात टाटा मूलभूत संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतांनाही त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला. गणित विषयातील संशोधन हा त्यांचा आत्मा होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कधीकाळी कँब्रिज विद्यापीठात गणित शिकविणाऱ्या मंगलाताईंनी नंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेतूनच गणितातील डॉक्टरेट पदवी मिळवली.
 
मुंबई आणि पुणे विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना गणित शिकवितांनाच त्यांनी आवड म्हणून शालेय विद्यार्थ्यांना गणित शिकवायला सुरूवात केली आणि सोपे गणित हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यांनी गणितावर लिहिलेली गणित गप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासह त्यांची इतर पुस्तके गाजली. ईश्वर मंगलाताईंना सद्गती देवो. या कठीण प्रसंगी मी नारळीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रा.डॉ. मंगला जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.