पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर निर्बंध!

16 Jul 2023 15:16:24
Pakistan Former PM Imran Khan Party PTI Restrictions

इस्लामाबाद
: पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर प्रतिबंध लावण्याकरिता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानात ९ मे रोजी झालेल्या हिंसक राष्ट्रव्यापी आंदोलनानंतर इम्रान खान यांच्या तहरीक ए इंसाफ (पीटीआय) वर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास जोर आला. त्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सांगितले की, पीटीआयवर निर्बंध लावणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पीटीआयवर कठोर निर्बंध लादण्यासाठी सर्वच स्तरांतून मागणी केली जात असताना पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांनी सांगितले की, जर त्यांच्या पक्षावर बंदी घातली गेली तर आगामी निवडणुका लढवण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार, असे इम्रान खान म्हणाले.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आरिफ यांनी सांगितले की, पक्षावर निर्बंध लादण्याबाबत विचार केला जात असून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनीही पक्षबंदीवरील कोणत्याही हालचालींना आपले समर्थन असेल, असे त्यांनी याआधीच जाहीर केले होते.

त्याचवेळी, पीटीआयवरील संभाव्य बंदीच्या प्रश्नावर इम्रान खान म्हणाले की, जर त्यांनी पक्षावर बंदी घातली तर आम्ही नवीन नावाने पक्ष स्थापन करू आणि निवडणुका जिंकून दाखवू तसेच, आपल्याला अपात्र ठरवून तुरुंगात टाकले तरी पक्ष निवडणूक जिंकेल, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळ १४ ऑगस्ट रोजी संपणार असून अशा स्थितीत निवडणूक आयोग पुढील सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर करेल, असे ते म्हणाले होते.



Powered By Sangraha 9.0