पुन्हा एकदा मैत्रीचे वारे!

16 Jul 2023 21:46:41
Iran and Saudi Arabia agree to restore relations

आंतरराष्ट्रीय राजकारण हे वेगाने बदलत असून, जगाच्या पाठीवर नवनवीन समीकरणे उदयास येताना दिसतात. चीनमुळे एकीकडे जगात तणावाचे वातावरण निर्माण होत असून, अनेक देश चिनी कर्जाच्या विळख्यात अडकलेले दिसतात. परंतु, आखाती देशांची गोष्ट काहीशी वेगळी. कधीकाळी एकमेकांसमोर उभे ठाकणारे आखाती देश आता गळ्यात गळे घालून मैत्रीचे गोडवे गाऊ लागले आहेत.

२०२१ साली सौदी अरेबिया, युएई, बहारीन आणि इजिप्त या देशांनी कतारशी असलेला तणाव दूर केला. मार्च महिन्यात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले सौदी अरेबिया आणि इराण यांनी चक्क मैत्रीची घोषणा केली. त्यानंतर तुर्की आणि युएईने आपापसांतील मतभेद दूर केले, तर तिकडे सौदी अरेबिया सोबतदेखील तुर्कीने मैत्रीचा अध्याय सुरू केला. यावरून स्पष्ट होते की, तुर्की इस्लामिक देशांसोबत असलेले मतभेद दूर करत असून, मैत्रीचा अध्याय लिहिण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुर्की आणि इजिप्त यांच्यातही आता मैत्रीची सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांनी एक दशकानंतर राजनैतिक संबंध पुन्हा सुधारले आहेत. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अम्र अल हेमा हमीद तुर्कीत इजिप्तचे राजदूत असतील, तर तुर्कीने सलीह मुतलू सेन यांना आपले इजिप्तमधील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. या दोन्ही देशांचे संबंध नेमके का बिघडले होते आणि आता हे दोन्ही देश नेमके का एकत्र येत आहेत, याची कारणे समजून घ्यायला हवी.

अरब क्रांतीच्या काळात दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू झाला. ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या राजकारणामुळे याची सुरुवात तशी आधीच झालेली होती. २०१० साली पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत सत्ताधार्‍यांविरोधात बंड सुरू झाले. यात अनेक देशांत हुकूमशाही संपली, तर काही देशांत गृहयुद्ध सुरू झाले. डिसेंबर २०१० साली ट्युनिशियामध्ये एका फळविक्रेत्याने स्वतःला जाळून घेतले आणि त्यानंतर ही आग अल्जेरिया, इजिप्त, जॉर्डन, येमेनपर्यंत पोहोचली. तरूणांनी रस्त्यावर येत हुकूमशाहांना सत्तेवरून खाली खेचले. इजिप्तची राजधानी कैरोत दहा लाख लोकांनी एकत्र येत सत्तेला आव्हान दिले. त्यानंतर राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आखाती देशांत लोकशाहीचे उत्तम उदाहरण म्हणून तुर्कीकडे पाहिले जाऊ लागले. इस्लामी मूल्य आणि आर्थिक विकास यामुळे तुर्कीला चांगलेच महत्त्व आले.

पुढे इजिप्तसोबत तुर्कीचे संबंध बिघडले. इजिप्तचे राष्ट्रपती मुबारक पायउतार झाल्यानंतर तुर्कीने ‘मुस्लीम ब्रदरहूड’ला समर्थन देत तिथे आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून ‘मुस्लीम ब्रदरहूड’ची राजकीय शाखा असलेल्या ‘फ्रिडम अ‍ॅण्ड जस्टीस‘चे सदस्य मोहम्मद मुर्सी सत्तेत आले. यानंतर इजिप्तमधील ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या नेतृत्वातील सरकार आणि तुर्कीने संबंध आणखी मजबूत केले. परंतु, ही मैत्री फार काळ टिकली नाही. २०१३ साली तुर्कीचे समर्थक मोहम्मद मुर्सी यांना सत्तेवरून हटविण्यात आले आणि सोबतच इजिप्तने ‘मुस्लीम ब्रदरहूड’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. तुर्कीने यावर आक्षेप घेत नवीन राष्ट्रपती अब्देल फतह अल सिसी यांना इजिप्तचे अधिकृत राष्ट्रपती मानण्यास नकार दिला. यानंतर इजिप्तने तुर्कीच्या राजदूतांना देश सोडण्यास सांगितले. त्याला प्रत्युत्तर म्हणून तुर्कीनेही आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आणि दोन्ही देशांचे संबंध बिघडले. त्यानंतर आता एका दशकानंतर दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत.

सध्या तुर्कीचे पश्चिमी देशांसोबत संबंध फारसे चांगले नाही. त्यामुळे आखाती आणि इस्लामिक देशांसोबत संबंध सुधारण्यासाठी तुर्की आग्रही आहे. नोव्हेंबर २०२२ साली कतारमध्ये ’फिफा’ विश्वचषकादरम्यान तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी यांच्याशी पहिल्यांदाच हात मिळवला होता. तेव्हा दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचे संकेत मिळाले होते. याव्यतिरिक्त गेल्या पाच वर्षांत तुर्कीचा परदेशी चलनासाठा घटला असून, तो सध्या २० अरब डॉलरपेक्षाही कमी झाला आहे. भूकंपानेही यंदा तुर्कीला मोठा फटका बसला. अशात तुर्की आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूत करू पाहत आहे. दुसर्‍या देशांसोबत चांगले संबंध असणे, ही सध्या काळाची गरज बनली आहे, हे तुर्की जाणून आहे. त्यामुळेच इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्याची इच्छाही तुर्कीने तूर्त बाजूला ठेवली आहे.

७०५८५८९७६७


Powered By Sangraha 9.0