मोदी-योगींवर द्वेषपूर्ण टीपण्णी करणाऱ्या आझम खानला दोन वर्षांची शिक्षा!
15 Jul 2023 15:28:25
लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवले आणि भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे पुन्हा आझम खान यांना जेलवारी करावी लागणार आहे. आझम खान यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याचे आमदारपदही गेले आणि रामपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. रामपूरच्या MP-MLA न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान शहजाद नगरशी संबंधित आहे.
त्यावेळी आझम खान यांनी निवडणुकीच्या भाषणात विधान केले, त्यानंतर तत्कालीन व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी (एडीओ) अनिल कुमार चौहान यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. दरम्यान आझम यांचे भाषणही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांनी केवळ तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसाठीच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही आक्षेपार्ह शब्द वापरले. ऑक्टोबर २०२२ मध्ये देखील त्यांना द्वेषपूर्ण भाषणाच्या वेगळ्या प्रकरणात शिक्षा झाली आहे.
मात्र, नंतर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुका सपा आणि बसपाने एकत्र लढल्या होत्या. आझम खान यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान आझम खान यांना शिक्षा सुनावल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना रामपूरचे भाजप आमदार म्हणाले, “ते घडणारच होते. आम्ही नेहमीच सत्याचे समर्थन केले आहे. मला विश्वास होता की सत्याचा विजय होईल. आता या निर्णयानंतर आझम खान यांच्या जिभेला कुलूप लागणार आहे.
नुकतेच आझम खान सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत आंब्याची मेजवानीत दिसले. त्यांच्यासोबत आणखी एक मुस्लिम खासदार शफीकुर रहमान बारक होते. तेही त्यांच्या हास्यास्पद विधानांमुळे चर्चेत राहतात. हे सर्व नेते मलिहाबादमधील 'मँगो मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलिमुल्ला खान यांच्या घरी पोहोचले. यावेळी अखिलेश यादव यांनी अनेक आरोप करत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. कोरोनापासून शेतकऱ्यांपर्यंतच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारविरोधी वक्तव्ये केली.