समर्थ संशोधनाची रामदासी ‘मनीषा’

15 Jul 2023 21:41:30
Interview Of multilingual scholar Manisha Bathe

मनीषा बाठे या संत वाङ्मय व बहुभाषा अभ्यासक व लेखिका. तब्बल ११ भारतीय भाषा त्यांना अवगत असून, त्यांनी त्या-त्या भाषांच्या काही राज्यांतील पदव्युत्तर व पदविका संपादित केल्या आहेत. आजवर सात संशोधनपर ग्रंथांचे लेखनही बाठे यांनी केले असून त्यांनी संशोधित केलेल्या ग्रंथांना ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि ‘महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार’ हा पुरस्कार उत्कृष्ट संशोधनासाठी प्राप्त आहे. समर्थ रामदासांच्या संप्रदायात अनुग्रहित ‘साहित्य अकादमी’द्वारे ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या ग्रंथमालिकेत मनीषा बाठे यांचा समर्थ रामदास यांच्यावर आधारित एक ‘मोनोग्राफ’ प्रकाशित झाला. बालपणापासूनच रामदासी संप्रदायाचा प्रभाव असणार्‍या मनीषा या आज सर्व वेळ संशोधन आणि लेखन यासाठी खर्च करतात. त्यांच्याशी साधलेला संवाद..
तुमचा संशोधन प्रवास हा कधी आणि कसा सुरू झाला?
 
माझा पहिला शोधग्रंथ २०१५ साली आला, ज्याचे संशोधन २००५ मधील उर्दू शिक्षणाबरोबर सुरू झाले होते. खरे तर लेखन, विचारांचे पायाभूत संस्कार व समर्थ सांप्रदायिक शिक्षण हे मला कुमारवयातच लाभले होते. सांप्रदायिक शिक्षणात संस्कारांची विशिष्ट धाटी असे. मुमुक्षू-वर्गात गेल्यानंतर रामदासीबुवा आम्हाला समर्थांची स्फुटे पाठांतरासाठी देत. दुसर्‍या दिवशी पाठ झालेल्यांना ते न बघता समोर लिहायला सांगत. त्यानंतर बुवा पाठांतराचा समजलेला अर्थ लिहायला सांगत व अखेरीस त्या भावार्थावर एक कथा सांगत. पाठांतर, लेखन व अर्थाचे आकलन अशी शिस्त समर्थांनी सांप्रदायिक शिक्षणाला ४०० वर्षांपूर्वीच सर्वांना घालून दिली आणि म्हणूनच आकलन झालेल्या कथांचे अर्थ, तात्पर्य, गुह्यार्थ शोधत राहणे, हा आमच्या वैचारिक प्रक्रियेचा अपरिहार्य भाग बनतो. माझ्या महाविद्यालयीन काळात सज्जनगडचे महंत अण्णाबुवा कालगांवकरांनी ‘दासबोध’, ’मनोबोध’ इत्यादी सांप्रदायिक मुख्य साहित्यावर लेखन आचरणात उतरल्याशिवाय करायचे नाही, असे बंधनच घातले होते. अण्णाबुवांनी घडविलेल्या मुमुक्षू-संस्कार वर्गातील मी एक भाग्यवान. जिला गड, शिवथरघळ येथील शिबिरांचा सहवास वय वर्षे २५ पर्यंत लाभला. बहुभाषिक म्हणून आरंभिलेल्या स्वतःच्या व्यावसायिक स्थिरतेनंतर मी समर्थांवरील आक्षेपार्ह लेखनास शास्त्रोक्त प्रत्युत्तर शोधण्यासाठी आधी अध्ययन व नंतर मूळ हस्तलिखित दफ्तरांचा धांडोळा घेणे आरंभिले. ’समर्थकृत दखनी-उर्दू पदावल्या’ या माझ्या पहिल्या संशोधन-ग्रंथाला संप्रदाय, समाज यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नंतरच्या काळात हस्तलिखित दफ्तरातील इतरही संतवाङ्मयाच्या बरोबरीने कागदपत्रे संशोधनातून मी मल्लखांब खेळाचे जनक बाळंभट देवधर यांचे चरित्र व खेळाचा सुमारे २३० वर्षांचा इतिहास लिहिला.
 
तुम्ही बहुभाषिक आहात, भाषांच्या या अभ्यासामागे काय उद्देश होता?

मी २३ वर्षांपूर्वी ’समर्थ ग्राफीक्स’ या नावे अनुवाद व प्रकाशकीय सेवांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायासाठीच मी एकेक भाषा शिकत, ११ भारतीय भाषा शिकले. त्यामुळे गुजराती, कन्नड, उर्दू, तेलुगू इत्यादी भाषांमध्ये माझ्याकडे शासकीय कामे मोठ्या प्रमाणात येऊ लागली. तसे व्यवसायापूर्वी नोकरी-काळात प्रकाशन व जाहिरात क्षेत्रात काम केल्याने कॉपी-राईटिंग, संपादन इत्यादींची सवय होतीच, त्यामुळे प्रकाशनविषयक ’समर्थ मीडिया सेंटर’ ही सुरू केले. खरे तर एका गुरुतुल्य व्यक्तीच्या मार्गदर्शनावरून व्यवसायाच्या दशकपूर्तीनंतर मी व माझी लहान बहीण आशा, आम्ही समर्थ संप्रदायात अनुग्रहित झालो. त्यामुळे ओघानेच मी संस्कार वर्गातील मुमुक्षू आता संप्रदायातील व्रतस्थ अनुग्रहित बनले. संप्रदायातील स.भ. आक्का वेलणकर (अंबरनाथ), स. भ. कु. मीनाताई भावे (पुणे) व स. भ. कु. कमलताई रामदासी पटवर्धन (जबलपूर) यांनी उदरनिर्वाहासाठी शिक्षिका, डॉक्टर म्हणून काम करीत, तर पूर्णवेळ समर्थ विचारांचा प्रचार-प्रसार केला व करीत आहेत, यांचे आचरण आजही माझे आदर्श आहे. वास्तविक पाहता गार्गी, मैत्रयी, शबरी आदींच्या जीवनशैलीचे आदर्श सांगणार्‍या आपल्या देशात मला, तरी आज समर्थ रामदास संप्रदायाव्यतिरिक्त कोणताही राजमार्ग दिसत नाही. त्यामुळे सध्या आम्ही भगिनी बहुभाषा अभ्यास-व्यवसाय व सांप्रदायिक ज्ञानोपासना म्हणून संशोधन-लेखन असे व्रत आचरित आहोत.

संशोधनात्मक किंवा अभ्यासपूर्ण साहित्य आज तुलनेत कमी प्रकाशित होताना दिसते. त्याबद्दल काय सांगाल?
 
संशोधनात्मक किंवा अभ्यासपूर्ण साहित्य निर्माण व्हायला हवं आणि ते होतही आहे, तशी मागणीही आहे, असा मागील सात ते आठ वर्षांचा माझा एकंदरीतच अनुभव आहे. संशोधन ग्रंथांना आज बरे दिवस आहेत. तुमची ग्रंथमांडणी कशी आहे, आशय काय आहे, अशा अनेक बाजूंवर विचार व्हायला हवा.

समर्थांविषयक तुमचं सध्या लेखन सुरू आहे. तुमच्या व्यवसायांची नावंसुद्धा समर्थांवर आहेत, तर समर्थांविषयी इतकं प्रेम का? समर्थ केव्हा जवळचे वाटले?
 
मला शालेय वयापासूनच रामदासी संप्रदायात आईने पाठविले होते, तेव्हा मी ११ वर्षांची होते. माझ्यावर सांप्रदायिक संस्कार-वर्गांचा मोठा प्रभाव आहेच. आयुष्याच्या विविध वळणांवर अडीअडचणींना मी समर्थांच्या उपदेशांचा (रामदास काय म्हणाले ?) व समर्थ विचारांना पथदर्शक मानणार्‍यांचा नेहमी आधार मिळत राहिला. त्यामुळे निश्चितच समर्थश्रद्धा दृढावली. अगदी गत तपापूर्वी आईनेसुद्धा तिची सातार्‍यातील राहती जागा समर्थांच्या झोळीत घातली व माझ्यासोबत येऊन राहिली.

तुमच्या ’रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट’ या पुस्तकाला ‘महाराष्ट्र राज्य’ पुरस्कार मिळाला आहे, त्यातील ’मोक्षपट’ ही संकल्पना नेमकी काय आहे? त्याबद्दल अधिक काही सांगू शकाल का?

‘मोक्षपट’ हा आध्यात्मिक सापशिडीचा खेळ आहे. मराठी वाङ्मयात तो सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांनी आणला. बाराबलुतेदार जे दिवसभर कष्टाची कामे करीत, त्यांना घरी आल्यावर विरंगुळा काय? परंतु, केवळ विरंगुळा नाही, तर त्यातून प्रबोधनही व्हावं, या उद्देशाने हा खेळ निर्माण केला गेला. ’काय करावे आणि काय करू नये (डूज अ‍ॅण्ड डोन्टस)’ या धाटणीने संतांनी समाजास अध्यात्म व रोजचा व्यवहार यांचा मेळ घालून दिला. चांगले कार्य केले, तर शिडी मिळते आणि वाईट कार्य करणार्‍याला साप गिळतो. कोणत्या कार्याने तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकता, हे सांगणारा हा मूळ खेळ!
 
तुमचा नुकताच समर्थ रामदासांवरील एक मोनोग्राफ (लघुप्रबंध) ‘साहित्य अकादमी’ने प्रकाशित केला आहे. त्याबद्दल काय सांगाल?

सदर मोनोग्राफ (लघुप्रबंध) हा ‘साहित्य अकादमी’द्वारे ’भारतीय साहित्याचे निर्माते’ या ग्रंथमालिकेत प्रकाशित झाला आहे. हे पुस्तक अकादमीतर्फे मूळ लेखन भाषेशिवाय एकूण २० भाषांमध्ये अनुवादित केले जाते. या लघुप्रबंधात मी स्वतःचे गत दशकाभरातील ’मूळ हस्तलिखित दफ्तरांतील अध्ययन-संशोधन एकत्र एकवटले आहे. त्यामुळे यात इ. स. १९२८ मध्ये ब्रिटन ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले रेव्ह.डब्यू.एस.डेमिंगच्या ’रामदास अ‍ॅण्ड रामदासीज’ या चरित्रापासून ते पंजाबमधील सुवर्णमंदिराच्या हरगोविंदांच्या शिष्यांनी दिलेल्या साकी क्रमांकापर्यंतच्या’ श्रीसमर्थांच्या व संप्रदायाबद्दलच्या अनेक नोंदींबद्दलची माहिती मांडली आहे.

सध्या कोणत्या प्रकल्पावर काम करीत आहात? आगामी कोणते संशोधन किंवा कोणत्या शोधग्रंथाचे लेखन करीत आहात?
 
सध्या माझे संशोधन संतसाहित्यावर महाराष्ट्राबाहेरच चालू आहे. यापूर्वी माझे सर्व लक्ष्य फक्त रामदासांच्या वाङ्मयावर होते. मात्र, आता अन्य संप्रदायांतील संत वाङ्मयावरही अभ्यास सुरू केला आहे. त्यातील पहिला टप्पा - ’विठ्ठल नामाचा भारतसंचार ः गुजरात’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. गुजरातमधील चार हस्तलिखित दफ्तरांच्या धांडोळ्यातून लाभलेले हे संशोधन-लेखन आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने संत नरसी मेहतांचे चरित्र व त्यांचा काव्यातील ’श्रीविठ्ठल, पंढरपूर, संत नामदेव’ यांचे उल्लेख प्रथमच मराठीत आले आहेत. इ. स. १३५० मध्ये संत नामदेव समाधिस्त, तरीही इ.स. १४५० मध्ये सौराष्ट्रातील संतकवी नरसी ’स्वतःच्या काव्यात भक्तीचा आदर्श म्हणून ध्रुव तार्‍यापेक्षा उंच ’नामदेवांचे स्थान’ लिहितो, हे चकित करणारे आहे. आता आगामी लेखनात गुजरात संशोधनात गवसलेले धुरंदर दाम्पत्याचे चरित्र म्हणजे एका ध्येयाचा प्रवास उलगडणार आहे. इ. स. १९१५ ते १९५८ पर्यंतच्या काळात या दाम्पत्याने एका आंतरराष्ट्रीय व्यक्तित्वाला स्पर्धा देणारे व्यायाम क्षेत्रामध्ये कार्य उभारले. आज कार्यारंभाच्या शतकानंतरही त्या दर्जाचे काम भारतात झालेले नाही. ते दाम्पत्य कोण, त्यांचे कार्य कोणते, याचा उलगडा करणारे चरित्र यंदाच्या दिवाळीत येत आहे.

Powered By Sangraha 9.0