नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत सरकारने ही घोषणा केली. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून 26 नवीन प्रगत राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. राफेलची निर्माता कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने याबाबत माहिती दिली आहे.
डसॉल्ट एव्हिएशनने म्हटले की, भारतीय नौदलाला नवीनतम पिढीतील लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी भारत सरकारने नौदलाच्या राफेलची निवड जाहीर केली. भारतीय नौदलाच्या ताफ्यात यापूर्वी ३६ राफेल तैनात असून त्यात आणखी २६ राफेल सामील होणार आहेत.
यावेळी भारताची एचएएल आणि फ्रान्सच्या सॅफ्रान हेलिकॉप्टर इंजिन यांमध्ये लढाऊ विमानांसाठी इंजिन बनवण्याचा करार केला आहे. त्याचबरोबर भारताच्या माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपमध्ये 3 स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या तयार करण्याचा करार करण्यात आला आहे. याशिवाय पॅरिसमधील भारतीय दूतावासात डीआरडीओचे तांत्रिक कार्यालयही उघडण्यात येणार आहे.