भारत :‘सेमीकंडक्टर’ची जगातील मोठी बाजारपेठ

15 Jul 2023 20:15:13
Article On Semiconductor Foxconn Investment In India

‘फॉक्सकॉन’ने ‘वेदांता’सोबतचा भागिदारी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करताच या आठवड्यात अर्थजगतात त्याचे तीव्र पडसाद उमटले. एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या ‘सेमीकंडक्टर’ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तथापि, ‘फॉक्सकॉन’ कंपनी भारतात गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त दुसर्‍याच दिवशी आले. यानिमित्ताने ‘सेमीकंडक्टर’चा विषय ऐरणीवर आला आहे. त्यावर या लेखात टाकलेला हा प्रकाश...

‘फॉक्सकॉन’ आणि ‘वेदांता’ या दोन्ही कंपन्या संयुक्तपणे भारतात ‘सेमीकंडक्टर’ आणि ‘डिस्प्ले’ उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. तथापि, सोमवारी ‘फॉक्सकॉन’ने संयुक्त उपक्रमातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आणि आर्थिक जगतात तिचे तीव्र पडसाद उमटले. हा प्रकल्प १९.५ अब्ज डॉलरचा होता. ‘वेदांता’च्या समभागानांही त्याचा काही अंशी फटका बसला. गुजरात येथे हा प्रकल्प उभा राहणार होता. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातने पळवला, असा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता. भारताला ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा प्रकल्प एक भाग मानला जातो. या घटनेला २४ तास होण्यापूर्वीच ‘फॉक्सकॉन’ने भारतात ‘सेमीकंडक्टर उत्पादन योजने’अंतर्गत गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच याविषयी सविस्तर माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते.

हा उद्योग अत्यंत स्पर्धात्मक असून, तो यशस्वी होण्यासाठी कंपन्यांना नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘फॉक्सकॉन’ला तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारा भागीदार शोधण्यात अपयश आले असावे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. हा प्रकल्प खूप मोठा आणि गुंतागुंतीचा होता. ‘जागतिक सेमीकंडक्टर बाजारा‘ला चिप्सची कमतरता तसेच वाढत्या खर्चासह अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच ’फॉक्सकॉन’ने ’वेदांता’सोबत जाण्याचा निर्णय मागे घेतला असावा, असा तर्क व्यक्त केला जात आहे.
 
भारताचे ‘सेमीकंडक्टर’ धोरण हा एक व्यापक कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश भारताला ’सेमीकंडक्टर डिझाईन’, उत्पादन तसेच चाचणीसाठी जागतिक केंद्र बनवणे, हा आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ७६ हजार कोटींच्या परिव्ययासह याबाबतचे धोरण जाहीर करण्यात आले होते. देशांतर्गत ‘सेमीकंडक्टर डिझाईन’ला प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश आहे. या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच ज्या कंपन्यांना देशात ‘सेमीकंडक्टर फॅब्स’ची स्थापना करायची आहे, त्यांना प्रोत्साहन देणे; याचाही यात समावेश आहे. देशातच चाचणी सुविधा उभारणार्‍या कंपन्यांना बळ देऊन चाचणी क्षमता विकसित करणे; हे उद्दिष्ट आहे.

प्रशिक्षण देऊन या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उभे करणे, हाही धोरणाचा एक भाग आहे. याचे ‘सेमीकंडक्टर’ उद्योगाने स्वागत केले असून, अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे. तथापि, ‘सेमीकंडक्टर फॅब्स’ उभारण्याचा उच्च खर्च तसेच ’सेमीकंडक्टर इकोसिस्टम’चा अभाव ही प्रमुख आव्हाने कंपन्यांसमोर आहेत. केंद्र सरकारने २०२६ पर्यंत भारताला १०० अब्ज डॉलरचे ‘सेमीकंडक्टर’ची बाजारपेठ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भांडवली सबसिडी, कर सूट तसेच संशोधन आणि विकासासाठी निधी यासाठी म्हणूनच केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. ‘सेमीकंडक्टर इकोसिस्टम’ विकासासाठी समर्थन देताना चाचणी सुविधांच्या विकासासाठी, कुशल कामगारांची निर्मिती तसेच संशोधन विकासाला चालना दिली जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. भारत ही ‘सेमीकंडक्टर’ची मोठी आणि वाढणारी बाजारपेठ आहे. हे धोरण यशस्वी झाले, तर भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवले. त्याचबरोबर या क्षेत्रात लक्षणीय रोजगार निर्माण करेल, यात कोणतीही शंका नाही.
 
’फॉक्सकॉन’ने मंगळवारी म्हटले आहे की, ’ते भारतात ’सेमीकंडक्टर’ आणि ’डिस्प्ले फॅब इकोसिस्टम’साठी अर्ज करण्यासाठी काम करत आहेत.’ दहा अब्ज डॉलरची ही योजना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भांडवली खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत केंद्र सरकारचे अनुदान तिला मिळू शकते. कंपनी भारतासाठी वचनबद्ध असून, भारत एक मजबूत ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन केंद्र म्हणून ’इकोसिस्टम’ स्थापित करताना दिसून येत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. ‘वेदांता’सोबत केलेला करार ’फॉक्सकॉन’ने रद्द करताच हा पंतप्रधान मोदी यांना धक्का असल्याचे म्हटले गेले. तथापि, ‘फॉक्सकॉन’ देशात गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट झाल्याने, चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही या निर्णयाचा भारताच्या ‘सेमीकंडक्टर’ प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही कंपन्यांना या क्षेत्रातील पूर्वानुभव नाही, हे कारण असावे, असे म्हणत दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे योग्य तंत्रज्ञान भागीदारांसह काम करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले होते. गेल्या १८ महिन्यांत ‘सेमीकंडक्टर’ क्षेत्रात भारताच्या योजनांमध्ये प्रगती झाली आहे.

काँग्रेसने नेहमीप्रमाणेच लगेचच प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. प्रकल्पाची घोषणा करताना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी एक लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा केला होता. त्याचे काय झाले, अशी विचारणा करत काँग्रेसने गुजरातच्या विकासाच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता ’फॉक्सकॉन‘ भारतातून माघार घेत नसल्याचे पुढे आले आहे. तसेच, ‘वेदांता’नेही तंत्रज्ञान परवाना कराराद्वारे ४० फॅबसाठीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावाचे मूल्यांकन केले जात आहे. अनेक परकीय कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सूक आहेत. ‘इंटेल’ आणि ‘टॉवर’ या दोन कंपन्यांचे विलीनीकरणाचा प्रस्ताव रखडल्याचा परिणाम या क्षेत्रातील गुंतवणुकीवर झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची देशांतर्गत पुरवठा साखळी निर्माण व्हावी. तसेच, आयात कमी व्हावी; यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
 
चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. म्हणूनच भारतात ‘सेमीकंडक्टर’च्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढेल, याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. हे धोरण यशस्वीपणे राबवल्यानंतर देशामध्ये रोजगार, तर मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेच, त्याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा, असे हे धोरण आहे. ही धाडसी तसेच महत्त्वांकाक्षी योजना असल्याचे म्हणूनच मानले जाते.
 
‘सेमीकंडक्टर’ बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून, यात उपकरणांची रचना, उत्पादन आणि विक्री यांचा समावेश होतो. संगणक, स्मार्टफोन, ऑटोमोबाईल्स तसेच औद्योगिक उपकरणांमध्ये यांचा वापर होतो. २०२२ ते २०२९ पर्यंत जागतिक ‘सेमीकंडक्टर’ बाजारपेठ १२.२ टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढेल, अशी अपेक्षा आहे. ’इंटिग्रेटेड सर्किट’ (आयसी) हा याचा सामान्य प्रकार आहे. सर्वच उत्पादनात तो वापरला जातो. ’डिस्क्रीट सेमीकंडक्टर’ हे वैयक्तिक ‘सेमीकंडक्टर’ म्हणून ओळखले जातात. ट्रान्झिस्टर, डायोड आणि रेझिस्टर यांचा त्यात समावेश होतो. इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार तसेच औद्योगिक उपकरणांमध्ये त्यांचा वापर होतो. ‘सेन्सर’ हाही ‘सेमीकंडक्टर’चाच एक प्रकार आहे.
 
यात ‘इंटेल‘, ’सॅमसंग’ आणि ’टीएसएमसी’ यांसारख्या कंपन्याचे वर्चस्व असून, या कंपन्या नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. चिप्सची कमतरता, वाढती किंमत आणि त्यांची वाढती जटिलता या आव्हानांचा या क्षेत्राला सामना करावा लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘५ जी’ तसेच ’इंटरनेट ऑफ थिंग्ज’ यांसारख्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे या बाजारपेठेची मागणी वाढतच आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकार ‘सेमीकंडक्टर’च्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. या माध्यमातून ’सेमीकंडक्टर’ची जागतिक बाजारपेठ अशी भारताची ओळख जगाच्या नकाशावर होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमीकंडक्टर’चाच आहे, यात कोणतीही शंका नाही.

संजीव ओक
Powered By Sangraha 9.0