वकीलसाहेब!

15 Jul 2023 20:33:26
Article On Laxmanrao Inamdar
 
“हजारो वर्षांपूर्वी एक सेतू बांधला गेला.रामायणकाळात लढाई झाली. राम-रावण व देव-राक्षस यांच्यात. दानव आणि मानव यांच्यातला संघर्ष सुरूच राहतो. म्हणून तर निर्माण करावे लागतात सेतू. गुजरातमध्येसुद्धा अशा सेतुबंधाची झाली निर्मिती. त्याचे प्रमुख वास्तुशास्त्रज्ञ होते वकीलसाहेब,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजाभाऊ नेने यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्यासंदर्भात गौरवोद्गार व्यक्त केले. खरेच गुजरातच नव्हे, तर देशभराच्या युवकांना आणि समाजशक्तीला प्रेरणा देणारे लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकीलसाहेब. दि. १५ जुलै रोजी त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने ‘सेतुबंध’ या नुकत्याच सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशित पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर वकीलसाहेबांच्या महान जीवनकार्य विचारांचा घेतलेला संक्षिप्त मागोवा...
 
१९३५ सालचा मार्च महिना होता तो. सातार्‍यामध्ये शाखा उघडावी आणि स्वयंसेवक जोडावे, यासाठी रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार सातार्‍यामध्ये आले होते. त्यावेळी डॉ. हेडगेवारांच्या समक्ष १७ वर्षांच्या लक्ष्मणराव इनामदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होण्याची प्रतिज्ञा केली की, ”हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचे रक्षण करू, हिंदू राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग झालो आहे, संघाचे कार्य मी प्रामाणिकपणे नि:स्वार्थ बुद्धीने तन-मन-धनपूर्वक करेन, हे व्रत मी आजन्म पाळेन.” त्यानंतर लक्ष्मणराव आयुष्यभर रा. स्व. संघ आणि शाखा तसेच लोकोत्तर ध्येयासाठीच झिजले. पण, हे झिजणे चंदनासारखे होते. हे दीप्तीमान होणे, एका ज्योतीतून लक्ष दीप निर्मिती करण्यासारखे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. हेडगेवारांनी दिलेल्या प्रतिज्ञेनुसार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक का बनायचे? ही भूमिका ठरली होती.

मात्र, स्वातंत्र्यानंतरही स्वयंसेवक म्हणून का राहावे, याबाबत लक्ष्मणरावांची भूमिका कशी होती? गांधींजीची हत्या झाली. त्यानंतर काँग्रेस सरकारने रा. स्व. संघावर बंदी आणली. दि. ११ जुलै १९४९ साली रा. स्व. संघावरची बंदी उठवण्यात आली. ऑगस्ट १९४९ साली राजकोट येथे ध्वजारोहण करून लक्ष्मणरावांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य पुन्हा अमूल्य वेगाने करण्यास प्रारंभ केला. संघटनेवर सरकारने बंदी आणली होती. या काळात संघ स्वयंसेवकांची मानसिकता, ज्या समाजासाठी संघ स्वयंसेवक रात्रं-दिवस तन-मन-धन अर्पण काम करत होते, त्या समाजाची मानसिकता याचा मागोवा घेत रा. स्व. संघाचे भाग व्यक्तीने का व्हावे, हे पुन्हा मांडणे गरजेचे होते. त्यामुळे की काय, राजकोट येथे ध्वजारोहण करताना लक्ष्मणराव म्हणाले की, ” हिंदू समाजाला शक्तिसंपन्न बनविण्यासाठी संघकार्य सुरू राहील. देशांतील युवकांमध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणि ती उत्तरोउत्तर वाढत राहावी, हेच संघाचे कार्य आहे.” संघाची आवश्यकता काय आणि त्यानुसार संघाचे काम काय? याची दोन वाक्यता लक्ष्मणरावांनी केलेली मांडणी आज लाखो-कोटी संघ स्वंयसेवकांसाठी मार्गदर्शक आहे.

तसेच, सातारा-खटाव येथे दि. १९ सप्टेंबर १९१७ साली माधवराव आणि इनामदार या दाम्पत्याचे सुपुत्र लक्ष्मणराव. त्यांना ‘वकीलसाहेब’ का बरं म्हणत असतील? वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लक्ष्मणरावांनी वकिली केलीच नाही, तर ते प्रचारक झाले. २४ तास देशहितासाठीचे व्रत स्वीकारले. पण, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा वकिली केली. कशासाठी? तर गांधीहत्येनंतर संघावर बंदी आणली. संघाचा काहीएक संबंध नसताना संघाला बदनाम करण्यासाठी हे कुटील कारस्थान तत्कालीन राजकारण्यांनी केले. संघाविरोधी बंदी उठावी, यासाठी स्वयंसेवकांनी सत्याग्रह केला. त्यावेळी संघ स्वयंसेवकांना तुरूंगात डांबण्यात आले. गुन्हे दाखल करण्यात आले. फक्त सत्य आणि न्यायासाठी तुरुंगात गेलेल्या स्वयंसेवकांना तुरुंगातून सोडवणे गरजेचे होते. मात्र, भीतीमुळे कुणीही स्वयंसेवकांची वकिली करण्यास पुढे आले नाही. अशावेळी लक्ष्मणराव वकील म्हणून पुढे आले. गुजरातभर ज्या तुरूंगात स्वयंसेवक अटकेत होते, तिथे गेले, त्यांची वकिली केली. हे काम मोठे निर्भयतेचे होते.

स्वयंसेवकांच्या भल्यासाठी तसेच सत्यन्यायासाठी लक्ष्मणरावांनी कर्तृत्वाची गाठलेली ही परिसीमा होती. भय आणि अन्यायाच्या विरोधातला हा त्यांचा संघर्ष अविस्मरणीय आहे. याच काळात त्यांना ’वकीलसाहेब’ ही उपाधी जनसामान्यांनी बहाल केली. वकीलसाहेबांचा स्वयंसेवकांशी त्याचबरोबर सत्य आणि न्यायाशी आजन्म ऋणानुबंध होता. विद्यार्थीदशेत असताना भागानगर (हैदराबाद) येथे निजामाच्या अत्याचारी राजवटी विरोधातल्या ते आंदोलनात सामील झाले होते. मुस्लीम राज्यकर्ता निजाम हा तिथल्या हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार करत होता. स्वायत्त अधिकारासाठी जनतेने व्यापक प्रमाणात आंदोलन केले. निजामाने हिंदू जनतेवरच्या अत्याचाराची क्रूरता वाढवली. या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आंदोलन उभे केले. महाराष्ट्रातून भोपटकरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा गट हैदराबादमध्ये गेला. अर्थात, वकिलीचे शिक्षण घेणार्‍या लक्ष्मणरावांना आंदोलनाला जाण्यासाठी घरून परवानगी मिळणार नव्हती. त्यामुळे परवानगी न घेताच ते आंदोलनाला गेले. मात्र, आंदोलनासाठी त्यांना सात वर्षांचा कारावास भोगावा लागला. हे सगळे का? तर केवळ अन्यायाला विरोध करण्यासाठी आणि त्यातही निजामाच्या क्रूर अत्याचाराखाली भरडल्या गेलेल्या हिंदू बांधवांच्या सहकार्यासाठी!

दुसरी घटना अशीच. हैदराबादहून परत आल्यावर ते संघप्रचारक म्हणून पहिल्यांदा गुजरात, नवसारीला गेले. तिथे त्यांनी संघटन केले. युवा आणि बालकांची वर्षासहल आयोजित केली होती. मात्र, त्यावेळी दोन बालक नदीत बुडू लागले. लक्ष्मणरावांच्या लक्षात येताच त्यांनी नदीत उडी घेतली. दुर्देवाने दोन्ही बालक मृत पावले. या दोन बालस्वयंसेवकांसाठी युवा लक्ष्मणरावांनीही प्राणाची बाजी लावली होती. का? तर स्वयंसेवकांशी त्यांचे नाते म्हणजे माता आणि बालक गुरू आणि शिष्य असे दुहेरी होते.

नव्या ठिकाणी नव्या लोकांसोबत संघाचे काम उभे करण्याच्या सुुरुवातीलाच अशा प्रकारे दुःखद घटना घडली. मृत बालकांचे पालक आणि इतरही लक्ष्मणरावांना वाट्टेल तसे बोलू लागली. नवसारी त्यातही गुजरातमध्ये संघकार्याला यामुळे मोठा फटका बसेल का? लक्ष्मणरावांएवजी दुसरे कोणी असते, तर त्यांनी जाऊ दे परत घरी जाऊन चांगले अर्थाजन करणारे सुखासीन भवितव्य निर्माण करण्याचा विचार केला असता. मात्र, लक्ष्मणरावांनी हार मानली नाही. याच गुजरातमध्ये रा. स्व. संघटनेचे मजबूत जाळे विणले. लक्ष्मणराव नेहमी हेडगेवारांचे स्मरण करून सांगायचे की, ”आपला देश मुसलमान किंवा इंग्रजांच्या पारतंत्र्यात का गेला? आपल्याकडे काय सत्तासंपत्ती नव्हती? राजसत्ता नव्हती? सगळे होते; पण लोकांकडे राष्ट्रभक्ती नव्हती. त्यामुळेच परकीय आक्रमण करून सत्ता गाजवू शकले.

प्रत्येक देशवासीयांमध्ये राष्ट्रनिष्ठा आणि बंधुभाव निर्माण होणे गरजेचे आहे.” याच भावनेने लक्ष्मणरावांनी रा. स्व. संघाच्या माध्यमातून कुशल संघटनात्मक जाळे विणले. गुजरातचा कायापालट करणार्‍या आणि गुजरातच्या इतिहासात दिमाखाने तळपणार्‍या अनेक मान्यवरांना संघशाखेशी जोडणारे संघकार्यासाठी प्रेरणा देणारे लक्ष्मणराव होते. संघाशी जोडल्या गेलेल्या आणि न जोडल्या गेलेल्या लोकांशीही त्यांचे संबंध मधुर आणि नि:स्वार्थी होते. कुणी संघकार्यासाठी प्रचारक व्हायचे आणि कुणी गृहस्थ जीवनात राहूनही, आहे त्या स्तरावर संघ अर्थोअर्थी देशसमाजसेवेचे काम करायचे, याची अतिशय भक्कम पारख त्यांच्याकडे होती. गुजरातच्या देदीप्यमान विकासामध्ये आणि पुढे भारताच्या सत्ताक्रांतीमध्ये बदल घडवणार्‍यांमध्ये लक्ष्मणरावांच्या मार्गदर्शनाने आणि स्नेहाने बांधलेले स्वयंसवेक सत्ताधारी झाले. त्याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी होत.

याच आयामामध्ये आपदा काळात विलक्षण नियोजन करणार्‍या लक्ष्मणरावांची दूरदृष्टीही वाखाणण्याजोगीच होती. मोरवी नदीला पूर आला आणि जनजीवन प्रचंड उद्ध्वस्त झाले. स्वयंसेवक कामाला लागले. त्यावेळी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे गरजेचे होते. त्यावेळी लक्ष्मणरावांनी सूचना दिली की, मोरवी आणि राजकोट येथे पूरग्रस्तांच्या मार्गदर्शन आणि साहित्य केंद्र असावे. लोक या केंद्रामध्ये जीवनावश्यक साहित्य नक्कीच दान करतील. दोन ठिकाणी केंद्र उघडण्यात आली. या दोन्ही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त मदतीचा ओघ सुरू झाला. आपल्या समाजाच्या भलेपणावर, दानशुरतेवर लक्ष्मणरावांचा असा विश्वास होता, तर या मदत स्वरुपातल्या वस्तूंबद्दल लक्ष्मणरावांनी एक मत मांडले. ते मत म्हणजे, वैश्विक स्तरावरच्या स्वयंसेवकांची मनोभूमिका विशद करणारी आहे. ते म्हणाले की, ”लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून इतके सगळे दिले आहे. एका दृष्टीने आपण या साधनांचे ट्रस्टी आहोत, हे सामान पूरग्रस्त लोकांपर्यत योग्य वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.” पुरामध्ये यशस्वी नियोजन केल्याबद्दलसगळे संघ स्वयंसेवकांची आणि वकीलसाहेबांची प्रशंसा करू लागले. त्यावेळी स्थितप्रज्ञ वकीलसाहेब म्हणाले की, ”हे सगळे ठीक आहे. परंतु, हे जे काही आहे, त्याचे शिक्षण दैनंदिन शाखेत दिले जाते, जे काही आहे, ती शाखाच आहे. मोरवीतले सेवाकार्य, तर त्याचे प्रात्यक्षिक आहे.”
 
लक्ष्मणरावांनी पूरपरिस्थितीमध्ये भारतीय समाजावरचा विश्वास आणि त्यानंतर मांडलेली भूमिका आजही तशीच जीवंत आहे. कोरोना काळात जगभरात हाहाकार माजला. मात्र, भारतीय समाजाने आपल्यातील भलाईने एकमेकांना मदत केली आणि कोरोनाला हरवले. यावेळी सगळे घरी बसले. मात्र, संघ स्वयंसेवक रस्त्यावर उतरून सेवाकार्य करत होते. त्यांनी मदतकेंद्रे उभारली होती आणि मोरवीच्या पुरामध्ये मदतकार्य करताना लक्ष्मणरावांनी जे उद्गार काढले होते की, “आपण साधनांचे ट्रस्टी असून, लोकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे,” हे म्हणणे संघस्वयंसेवकांचे जगणे होते.

असो. किशोरवयात डॉ. हेडगेवारांच्या उपस्थितीमध्ये वकीलसाहेबांनी हिंदू समाज संस्कृती रक्षणाची शपथ घेतली होती. ती शपथ आयुष्याच्या कोणत्याही वाटेवर ते विसरले नाहीत. अगदी कर्करोगाने त्यांचे शरीर पोखरले. मृत्यू समीप होता, त्यावेळीही! दुर्धर आजाराने ग्रस्त झाल्यानंतरही ते नागपूर संघशिक्षा वर्गाला गेले. त्यानंतर राजकोट संघशिक्षा वर्गालाही गेले. पुढे त्यांची तब्येत खूपच ढासळली. तेव्हा वणीकर त्यांना भेटायला गेले. वकीलसाहेबांची प्रकृती पाहून त्यांच्याशी काय बोलावे, असे त्यांना वाटले. शब्द जुळवत ते म्हणाले की, “वकीलसाहेब, तुमच्या मनात काय विचार सुरू आहेत?” त्यावर त्यांचे उत्तर होते की, “शाखेचे विचार आहेत.” दिवसेंदिवस कर्करोगामुळे त्यांची प्रकृती ढासळत होती. इतकी की, देवाघरी बोलावणे येईल अशीच स्थिती. त्यावेळी राजाभाऊ नेने आणि दत्तोपंत ठेंगडी पुण्याला मुळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये वकीलसाहेबांना भेटायला गेले. अतिशय दुःखात असलेल्या राजाभाऊंना सूचेचना की काय बोलावे? ते काहीबाही प्रश्न विचारत राहिले.
 
त्यावेळी वकीलसाहेब म्हणाले की, ”राजाभाई, तुम्ही सहा महिन्यांपूर्वी नवयुग संघकार्यालयात जो प्रश्न विचारला होता, तो हा प्रश्न नाही. त्यावेळचा विषय अधिक महत्त्वाचा आहे. संघ आणि संघ परिवाराचे काम देशभरात वाढत चालले आहेे. परंतु, संघ परिवाराचा भाग म्हटल्यानंतर काही जीवनमूल्ये आपल्या आचार-विचारात असली पाहिजेत, ही अपेक्षा असते. या विषयाबद्दलचा आपला आग्रह कमी होत चालला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर कार्याचा विस्तार होऊनही अपेक्षित समाजपरिवर्तन होऊ शकणार नाही. हा प्रश्न तुम्ही विचारला होता ना?” असे बोलून तिथे असलेल्या दत्तोपंत ठेंगडी यांना वकीलसाहेब म्हणाले की, ”हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माझी विनंती आहे की, तुम्ही या विषयाकडे अधिक लक्ष द्यावे, तुम्ही लक्ष दिलेत, तर मला विश्वास आहे की, जीवनमूल्ये आचार-विचारात आणण्याच्या समस्येचे समाधान नक्की होईल.” कल्पना करा, एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे. त्यावेळी त्याच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न कोणता असायला हवा? या परिक्षेपात वकीलसाहेबांना शाखा आणि जीवनमूल्यांचा प्रश्न महत्त्वाचा होता, तर अशा या महान कर्मयोग्याचे निधन दि. १५ जुलै १९८५ रोजी झाले; पण मृत्यू त्यांना पराजित करूच शकत नाही. कारण, वकीलसाहेब गुजरातच्याच नव्हे, तर विश्वातल्या संघ स्वंयसेवकांच्या आदर्श जीवनमूल्यांची पाठराखण करणार्‍या कोणत्याही देशनिष्ठ भारतीयांचे आदर्श आहेत. त्यांच्या विचारकार्यास नमन!

९५९४९६९६३८

 
Powered By Sangraha 9.0