फ्रान्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान!

14 Jul 2023 12:59:19
pmmodi 
 
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सकडून 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा देशाचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी संध्याकाळी पॅरिसमधील एलिसी पॅलेसमध्ये डिनरच्या वेळी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
 
फ्रान्सने याआधी प्रमुख व्यक्तिमत्त्वांना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान केला आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बुट्रोस यांचा समावेश आहे. यापूर्वी जूनमध्ये इजिप्तने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ द नाईल देऊन सन्मानित केले होते.
 
पंतप्रधान दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ते बॅस्टिल डे च्या समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. बॅस्टिल डे समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तीनही दलाच्या तुकड्या पॅरीसमध्ये दाखल झाल्या आहेत. सोबतच या परेडमध्ये भारतीय हवाईदलाची राफेल विमानं ही सहभागी होणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0