मुंबई : मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत आहे या वाक्याला खोडून टाकत केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटाने विक्रमी इतिहास रचला आहे. बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे प्रत्येक चित्रपटगृहात शो हाऊसफुल्ल होत आहे. अशात या चित्रपटाच्या शोदरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन भागात असलेल्या पीव्हीआर चित्रपटगृहात रविवारी हा प्रकार घडला.
चित्रपट सुरू असताना पाठीमागे बसलेल्या एका लहान मुलीचा पाय सीटला लागत होता. यावरुन वाद झाला आणि एका दाम्पत्याने केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे. सायन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
सायन येथील पीव्हीआर चित्रपटगृहात रविवारी रात्री 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचा शो सुरू असताना एका दाम्पत्याच्या पाठीमागे बसलेल्या लहान मुलीचा सीटला पाय लागत असल्याने या दाम्पत्याने वाद घालण्यास सुरुवात केली. मुलीसोबत बसलेल्या एकाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्या दाम्पत्याची समजूत काढण्यासाठी या तरुणाने त्यांना चित्रपटगृहाच्या बाहेर नेले. मात्र तेथे या दाम्पत्याने त्याच तरुणाला छत्रीने आणि हाताने मारहाण केली. तरुण जखमी झाल्याचे पाहून पोलिसांना बोलावण्यात आले. लगेचच सायन पोलिसांनी चित्रपटगृहात धाव घेत मारहाण करणाऱ्या दाम्पत्यावर कारवाई केली आहे.
महाराष्ट्रभरात ३० जुन रोजी प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब-चौधरी या सहा अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत.