पंतप्रधान मोेदींचा १३ ते १५ जुलैदरम्यान फ्रान्स आणि युएई दौरा

12 Jul 2023 17:43:44
India PM narendra Modi On France And UAE Tour

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (१३ ते १५ जुलै) फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १५ जुलै दरम्यान फ्रान्स आणि युएईला भेट देणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून ते १३ ते १४ जुलै दरम्यान पॅरिसला भेट देतील. पंतप्रधान मोदी १४ जुलै रोजी बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संचलनात भारतीय सशस्त्र दलाच्या त्रि-सेवेच्या तुकड्या सहभागी होणार आहेत.

फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्याची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जुलै रोजी अबुधाबीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी युएईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबु धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी चर्चा करतील. भारत - युएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा, शिक्षण, आरोग्यसेवा, अन्न सुरक्षा, फिनटेक, संरक्षण आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करण्याच्या संदर्भात या दौऱ्याच चर्चा होतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.



 
Powered By Sangraha 9.0