ईडी प्रमुख कोणीही असो, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

12 Jul 2023 18:07:10
Central Home Minister Amit Shah On ED Actions

नवी दिल्ली :
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रमुखपदावर कोणीही व्यक्ती असला, तरीदेखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणारच; अशा इशारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. ईडीचे विद्यमान प्रमुख संजय कुमार मिश्रा यांच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. त्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ईडीचे संचालक कोण आहेत हे महत्त्वाचे नाही, कारण जो कोणी या पदावर असेल; तो व्यक्ती विकासविरोधी मानसिकता असलेल्या घराणेशाहीच्या भ्रष्टाचारावर कारवाई होणे थांबणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) कायदा, २०२१ मधील दुरुस्ती कायम ठेवली आहे, ज्या अंतर्गत सरकार सीबीआय आणि ईडी प्रमुखांना जास्तीत जास्त पाच वर्षांचा कार्यकाळ देऊ शकते.
 
भ्रष्ट आणि कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचे ईडीचे अधिकार कायम असल्याचे गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ईडी ही संस्था कोणत्याही व्यक्तीच्या पलिकडे विचार करणार आहे. हवाला आणि परदेशी चलन कायद्याच्या उल्लंघनाच्या गुन्ह्यांची चौकशी करण्याचे ईडीचे काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आनंद व्यक्त करणारे लोक एकप्रकारच्या भ्रमात जगत आहेत, असा टोलाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगाविला आहे.



Powered By Sangraha 9.0