महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी आक्षेपार्ह कमेंट; सात जणांविरुद्ध गुन्हा

11 Jul 2023 16:26:36
Offensive comments about Women Commission Chairperson Chakankar

पुणे
: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पेजवर अश्लिल कमेंट करुन विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर सायबर पोलिसांनी फेसबुक आणि युट्युब वापरकर्त्या सात आरोपीं विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५६ अ, ५०९, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ जुलै आणि ८ जुलै रोजी ऑनलाईन घडला.

अ‍ॅड. विजयकुमार साखरे, नितीन पाटील, धनराज विश्वकर्मा, राज वाडे यांच्यासह वेगवेगळ्या सात जणांविरोधात एकूण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज विलास चव्हाण यांनी चाकणकर यांच्यावतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली चाकणकर या ६ जुलै रोजी फेसबुक पेजवरून लाईव्ह असताना युजर आयडी धारक अ‍ॅड. विजयकुमार साखरे याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर फेसबुक युजर नितीन पाटील याने देखील अश्लील शब्दांमध्ये कमेंट केली.
 
८ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक येथे राजकीय सभा होती. या सभेचे वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. या सभेमध्ये होत असलेले खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण लाईव्ह सुरु असताना आरपीएम या नावाच्या वापरकर्त्याने चाकणकर आणि चित्रा वाघ यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच धनराज विश्वकर्मा याने देखील अश्लील शिवीगाळ केली. राज वडे याने चाकणकर, भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांच्याविषयी अश्लिल शब्दांमध्ये कमेंट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


 
Powered By Sangraha 9.0