'युद्धस्य कथा रम्या’ अशी एक म्हण आहे. परंतु, आता बदलत्या ‘स्मार्ट’ युगात युद्धस्य कथा या डिजिटल स्वरुपात म्हणजेच ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लढल्या जातील. युद्ध कथा वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीच चांगल्या वाटतात. मात्र, त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुभव ज्यांना येतो, त्यांच्यावर त्याचे नक्कीच दूरगामी परिणाम दिसून येतात. तरीही जग हे नेहमीच युद्धाच्या तयारीत असते. हे युद्ध कधीकाळी जमिनीवर लढले जायचे, त्यात कालपरत्वे बदल होत जाऊन ते पाण्यात आणि आकाशातही लढले जाऊ लागले. अजस्त्र आकाराची शस्त्रे आणि मोठमोठी क्षेपणास्त्रे विकसित करून कालौघात युद्धाचे तंत्र बदलले. हे तंत्र परिणामकारक ठरत नाही, तोच सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या अविष्कारासह जीवघेण्या विषाणूंच्या मदतीने जैविक शस्त्रास्त्रे विकसित झाली. हे युद्ध अर्थातच प्रयोगशाळेत बसून लढता येऊ लागले. युद्ध करणे, त्यात जिंकणे आणि शत्रूराष्ट्राला नेस्तनाभूत करणे हे साध्य करण्यासाठी साधनं झपाट्याने बदलत आहेत आणि यापुढेदेखील ती बदलतच राहणार आहेत. आजघडीला भारतानेही या क्षेत्रात जोरदार आघाडी घेतली असून कानपूर येथील ‘आयआयटीयएन्स’ने ‘सुसाईड ड्रोन’चा अविष्कार केला आहे. या ड्रोनची चाचणी यशस्वी झाली असून ते अद्याप प्राथमिक अवस्थेत असताना, त्याची क्षमता सहा किलोग्रॅम स्फोटकांसह १०० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात शत्रूच्या तळावर हल्ला करू शकेल इतकी आहे. हे भेदक ‘सुसाईड ड्रोन’अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे शत्रूचे रडारदेखील त्यापासून गाफील राहतील, अशी त्यात यंत्रणा आहे. अशाप्रकारचे तंत्रज्ञान भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या चीनकडेही नाही. त्यामुळे येत्या काळात यदाकदाचित चीनविरोधात युद्ध झालेच, तर हे नवतंत्रज्ञान भारताला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. युद्धाची साधने, शस्त्रास्त्रे दिवसेंदिवस बदलताना सद्यःस्थितीतती ‘हायब्रीड’ स्वरुपातील झाली आहेत. म्हणजे काही प्रमाणात थेट तर काही प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने. अशा या युद्धाच्या कथा विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या असतील. त्यात ‘युद्धस्य कथा रम्या’ऐवजी ‘युद्धस्य डिजिटल कथा रम्या’ असा उल्लेख करावा लागेल.
'बलवानांचा देश’ म्हणून भारताचा गौरव प्राचीन काळात केला जाता होता. भारताने कोणत्याही देशावरआक्रमण केले नसले तरी भारतीय बलवानांनी आपल्या युद्ध कौशल्याने सर्वच प्रकारची आक्रमणे परतवून लावली. कधीकाळी पाकिस्तान, बांगलादेश, एवढेच नव्हे तर श्रीलंकेसारखा चिमुकला देशही भारताला गंभीरपणे घेत नव्हता. मात्र, आता गेल्या नऊ वर्षांत चित्र पूर्णपणे पालटले आहे. भारत शस्त्रसज्जच नव्हे, तर शत्रूला धडकी भरेल अशा शस्त्रांचा अविष्कार करत आहे. त्यामुळे शेजारचे चिमुकले देश भारताने डोळे वटारताच गप्प बसतात. राहता राहिला पाकिस्तान आणि चीन, तर या दोन्ही देशांचा बंदोबस्त भारताने केला आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी केल्यामुळे तो देश भिकेला लागला आहे, तर चीनला थेट लढत देऊ शकेल, अशी शस्त्रास्त्रे आज भारताकडे आहेत. त्यामुळे चीनही आगळीक करताना अनेकदा विचार करू लागला. शत्रूंच्या जरबेमुळे एकेकाळी भयभीत वाटणारा भारत आता बलवान झाला आहे. बलवान भारताला अमेरिका, फ्रान्ससह अन्य देशांतूनही रसद मिळत असल्याने भारतीय सैन्यशक्ती अधिक मजबूत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा आणि आगामी फ्रान्स दौरा भारताच्या शस्त्रसज्जतेला त्यातून नवा साज आणि बळ मिळणार आहे. फ्रान्स दौर्यात भारतीय नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा अंतिम करार होणारआहे. भारतीय नौदलाचे स्वदेशी लढाऊ जहाज ‘आयएनएस विक्रांत’साठी २६ ‘राफेल एम’ वरदान ठरणार आहे. त्याचप्रमाणे फ्रेंच कंपन्यांच्या मदतीनेभारतात अत्याधुनिक इंजिन तयार करण्याची प्रक्रियाही मार्गी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेक इन इंडिया’अंतर्गत अन्य उपक्रमांप्रमाणेच भारतीय सैन्यदलही ‘आत्मनिर्भर’ होत आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची आणि अभिमानाचीच. भारत हा केवळ बल्लवांचा देश नव्हे, तर तो बलवानांचाही देश आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांची ही संकल्पना यशस्वी होत असल्यामुळेच आजघडीला भारत सर्वच क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होत आहे, हे सुचिन्ह भारताच्या विकासाला निश्चितच चालना देणारे आहे.