पेरूत आणीबाणी

11 Jul 2023 21:42:07
Article On Emergency In Peru

राष्ट्रीय आणीबाणी म्हंटलं की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेली आणीबाणी भारतीयांना स्मरावी. खरं तर अंतर्गत सुरक्षा, परकीय आक्रमण किंवा मोठ्याप्रमाणात उद्भवलेले आर्थिक संकट अशा काही आपात्कालीन घटनांमुळे त्या-त्या राष्ट्राकडून आणीबाणी घोषित केली जाते. दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकतीच देशभरात आणीबाणी घोषित केली. ’गुइलेन बॅरे सिंड्रोम’(जीबीएस)च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि ‘इम्युनोग्लोबुलिन’ची (अँटिबॉडिज) कमतरता असल्याच्या भीतीमुळे आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देत ही आणीबाणी जाहीर करण्यात आली.

‘कोविड-१९’,‘गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन’ किंवा ‘झिका व्हायरस’शी संबंधित असलेल्या ‘जीबीएस’च्या वाढत्या प्रकरणांमुळे ९० दिवसांसाठी म्हणजेच साधारण तीन महिन्यांकरिता पेरूने आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. ’कोविड-१९’च्या संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे श्वसनाशी संबंधित असल्याचे नोंदविले होते, त्याचप्रमाणे ‘जीबीएस’च्या एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णांमध्ये दिसलेली लक्षणेसुद्धा श्वसनावरच आधारित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आणि ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ हे काही प्रमाणात सारखेच आहेत, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ हा एक दुर्मीळ विकार, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती थेट मज्जातंतूवर हल्ला करते, ज्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. पेरू प्रजासत्ताकाचे अधिकृत राजपत्र असलेल्या ’एल पेरुआनो’मध्ये इथल्या सरकारने ’जीबीएस’च्या प्रकरणांमध्ये असामान्य वाढ होत असल्याचे म्हटले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला या ‘सिंड्रोम’ची केवळ दोन ते आठ प्रकरणे नोंदवली गेली होती. मात्र, जूनअखेरीस त्याचे प्रमाण १०३ प्रकरणांपर्यंत पोहोचले. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ‘अँटीबॉडीज’ची कमतरता भासू शकते, या भीतीमुळे पेरूचे आरोग्यमंत्री सेझर वास्क्वेझ यांनी मंत्रिमंडळापुढे आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली. त्यामुळे आता याठिकाणी महामारीविषयक पाळत ठेवणे, योग्य तपासणी, औषधांचा पुरवठा आणि रुग्णांची काळजी घेणे यासह कठोर मोहीम राबविली जात आहे.

आता निश्चितच प्रश्न पडला असेल की, हा आणीबाणीसारखा स्थिती निर्माण करणारा ‘सिंड्रोम’ नक्की आहे तरी काय? तर, युएस एनआयएच वेबसाईटनुसार ‘जीबीएस’ ही एक दुर्मीळ न्युरोलॉजिकल डिसॉर्डर आहे. ज्यामध्ये थेट मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर स्थित असलेल्या नसांवर त्याचा परिणाम होतो. हे सांसर्गिक किंवा अनुवांशिक नाही आणि त्याचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. ‘जीबीएस’ची तीव्रता पाहता, अल्प अशक्तपणा असलेल्या सौम्य प्रकरणांपासून ते जवळजवळ विनाशकारी अशा पक्षाघातापर्यंत असू शकते. ज्यामुळे लोकांना स्वतंत्रपणे श्वास घेता येत नाही. पेरूमध्ये, जानेवारी २०२० ते जुलै या कालावधीत ’कोविड-१९’ची ४५ लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

‘जीबीएस’ हा ‘कोविड’ नंतरच्या समस्यांपैकी मज्जासंस्थेशी संबंधित एक ‘सिंड्रोम’ आहे. ‘जीबीएस’मुळे मानवी शरीरात दिसणारी कमकुवतता सहसा लवकर येते आणि काही तासात किंवा दिवसात बिघडते. लक्षणे दिसू लागल्यानंतर बहुतेक लोक पहिल्या दोन आठवड्यांत अशक्तपणाच्या सर्वात मोठ्या टप्प्यावर येऊन पोहोचतात. बोटं, गुडघे, मनगट यांसोबतच कधी हात तर कधी चेहर्‍यावर मुंग्या येणे; पायांमध्ये कमकुवतपणा येऊन नंतर सबंध शरीरभर पसरणे; चेहर्‍याच्या हालचालींमध्ये अडचण म्हणजेच बोलताना, चघळताना, गिळतान त्रास होणे; डोळे फिरवताना त्रास होणे; उच्च रक्तदाब व श्वास घेण्यास अडचण होणे ही या ‘सिंड्रोम’ची लक्षणे आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे पक्षाघात होण्याची सुद्धा शक्यता असते. या ‘सिंड्रोम’साठी कोणताही ज्ञात उपचार नसला तरी काही उपचारांमुळे आजाराची तीव्रता कमी करण्यात आणि पुनर्प्राप्तीचा वेळ कमी करण्यात मदत होऊ शकते. तेव्हा, पेरूला आणि तेथील जनतेला या गंभीर आजाराचा सामना करण्यासाठी बळ मिळो, तेथील आरोग्य यंत्रणाही हे आव्हान सक्षमपणे पेलू शकेल, अशी सध्या तरी प्रार्थना करुया.
 
Powered By Sangraha 9.0