खोपोलीची युवाप्रेरणा : अविनाश मोरे

11 Jul 2023 20:47:31
Article On Avinash More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारकार्याची प्रेरणा समाजात सातत्याने जागृत राहावी, असे जीवन ध्येय असलेले खोपोलीचे अविनाश मोरे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
खोपोलीला राहणार्‍या अविनाश मोरे यांना कर्जत येथे एका मंडळाने शिवजयंतीनिमित्त व्याख्याता म्हणून बोलवले होते. खूप प्रयत्न करूनही अविनाश तिथे थोडे उशिरा पोहोचले. त्यामुळे गावातल्या लोकांनी निर्णय घेतला की, आता ग्रामभोजन उरकून घ्यावे. रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. सगळ्यांनी भोजन केले आणि ग्रामस्थ म्हणाले, “अविनाश सर, आता तुम्ही व्याख्यान द्या.” अविनाश यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विचार’ हा विषय मांडायला सुरुवात केली. व्याख्यान संपले आणि ग्रामस्थ अविनाश यांना भेटायला आले. त्यावेळी ग्रामस्थांमधल्या एक आजी अविनाश यांना म्हणाल्या, “तुझ्या शब्दांत आणि बोलण्यात ताकद आहे. सगळं सोडलं तरी चालेल, पण बाळा तू कायम असाच विचार मांडत राहा. आपल्या लोकांना जागं करणं गरजेचे आहे.” अविनाश मोरे आपल्या वक्तृत्वाने रायगड आणि पुणे येथे सातत्याने लोकजागृती करत असतात. छत्रपती शिवाज महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींच्या विचारकर्तृत्वावर अविनाश अत्यंत उत्तम व्याख्यान देतात. त्याचवेळी आपल्या समाजापुढील आव्हाने, देशदेवधर्म जागृती यावरही ते अतिशय समर्पक व्याख्यान देत असतात.

अविनाश यांच्या भूतकाळाचा मागोवा घेतला तर जाणवते की, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांनी प्रेरित असलेल्या विनोद मोरे आणि सुशिला मोरे यांचे ते सुपुत्र. विनोद हे नगरपालिकेत शिपाई, तर सुशिला या घरी खाणावळ चालवत. दिवसांतून तीन वेळा त्या ५० जेवणाचे डबे बनवत असत. कष्टाशिवाय पर्याय नाही, असे या दोघांचेही म्हणणे. मोरे कुटुंबीयांनी धार्मिक आणि सांस्कृतिक श्रीमंती जपली होती. विनोद आणि सुशिला दोघेही अतिशय समाजशील. गावचा भजन सप्ताह असू दे की, कुणाच्या घरचे मंगलकार्य असू दे, सुशिलाबाई घरचे आटपून मदतीला तिथे हजर असायच्या. तसेच मोरे यांच्या घरासमोरच रा. स्व. संघाची शाखा लागे. त्यामुळे शाळेत जाण्याआधीपासूनच अविनाश यांना संघाच्या शाखेची गोडी लागलेली.

असो. इयत्ता चौथीत शिकतानाही अविनाश यांना स्पष्ट बोलता येत नव्हते. बोबडे बोलत त्यामुळे त्यांची अनेकजण टिंगल करत. एकदा शिक्षकांनी त्यांना ‘नाचरे मोरा अंब्याच्या वनात’ कविता म्हणायला सांगितली. बालक अविनाश कविता म्हणू लागले. पण, त्यावेळी त्याचे बोबडे बोल ऐकून काही मुलांनी त्यांना चिडवायला सुरुवात केली. ते सगळे असह्य होऊन ते रडू लागले. हे सगळे जाणून रा. स्व. संघाच्या शाखेचे तत्कालीन शिक्षक रोहित कुलकर्णी आणि करूणेंद्र टिमाने या दोघांनी अविनाश यांचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्पष्ट बोलण्यासाठी काय करावे, कसे बोलावे, याचे एकप्रकारे प्रशिक्षणच सुरू केले. या संघशिक्षकांनी अविनाश यांना विविध ठिकाणी भाषणं करायला पाठवले. मार्गदर्शन करायला पाठवले. त्यामुळे अविनाश यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. संघ शाखेने, शिक्षकांनी अविनाश यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला.

 आयुष्य पुढे जात होते. बारावी शिकल्यानंतर अविनाश यांना भूगोलशास्त्रामध्ये पुढे शिकायचे होते. मात्र, शिकण्यासाठी जळगाव येथे जावे लागणार होते. दूर जावे लागणार म्हणून घरातल्यांनी परवानगी नाकरली. मग अविनाश यांनी दहावीच्या गुणपत्रिकेवर ‘मॅकेनिकल डिप्लोमा’ला प्रवेश घेतला. दोन वर्षे महाविद्यालयात जाऊन पुन्हा डिप्लोमा करतोय, या विचारांनी ते अस्वस्थ व्हायचे. पण, जिथे असू तिथे उत्तम काम करायचेच, हे संस्कार असल्याने ‘मॅकेनिकल डिप्लोमा’ला त्यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी ‘मॅकेनिकल डिप्लोमा’ शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणी घ्यायला सुरुवात केली. हे करता करताच पुढील शिक्षणही सुरू केले. विश्व हिंदू परिषदेचे दिनेश बोडसे तसेच सागर मेढी या दोघांनी अविनाश यांना नेहमीच मार्गदर्शन केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगल्या उत्पन्नाच्या संधी प्राप्त झाल्या होत्या.

मात्र, आपण रायगड जिल्ह्यात राहून समाजासाठी काम करावे, हे अविनाश यांचे ध्येय होते. युवकांच्या सातत्याने संपर्कात येऊ शकू असे क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. त्यामुळे अविनाश हे प्राध्यापकाची नोकरी करू लागले. हे सगळे करताना रा. स्व. संघाची त्यांची जुळलेली नाळ कायमच होती. गेले काही वर्षे महाराष्ट्रातच नव्हे, तर जगावरही अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यावेळी रा.स्व.संघाचे स्वयंसवेक जीवाची पर्वा न करता समाजासाठी रस्त्यावर उतरले. त्यापैकी एक अविनाशही होते. कोरोना, त्यानंतर पूर आणि वादळ यामुळे रायगडचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यावेळी समाजातल्या युवकांना आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अविनाश यांनी एकत्रित केले. रायगडमध्ये आलेल्या या आपत्तीविरोधात काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन केले. समाजाची तरुणाई समाजासाठी भक्कमपणे उभी राहिली. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले अविनाश हे खोपोलीच्या बी.एल.पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागाचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर शाश्वत शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्यही आहेत. अविनाश म्हणतात, ”छत्रपतींच्या उदात्त विचारकार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या या धरतीवर युवकांमध्ये देव, देश आणि धर्म, समाजाप्रती निष्ठा आणि प्रेम कायमच निर्माण करणे हे माझ्या जगण्याचे ध्येय आहे.” देव, देश, धर्मासाठी ध्येय ठरवणारे अविनाश हे खरेच समाजासाठी आदर्शच आहेत.
 
९५९४९६९६३८


Powered By Sangraha 9.0