भारतीय नौदलासही मिळणार ‘राफेलचे’ बळ

10 Jul 2023 18:58:58
France Give Rafale fighter jets

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी फ्रान्स दौऱ्यामध्ये भारतीय नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलासदेखील शक्तीशाली अशा राफेलचे बळ मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १३ आणि १४ जुलै रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहे. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्याप्रमाणेच फ्रान्स दौरादेखील भारताच्या संरक्षण सज्जतेसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय नौदलाचे स्वदेशी लढाऊ जहाज आयएनएस विक्रांतसाठी २६ ‘राफेल एम’ विमानांच्या करारास अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी १३ जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये करारासाठीची स्विकृती दिली जाणार आहे.

भारत आणि फ्रान्स संरक्षण सौद्यांसाठी विशेष धोरणही आखले जाण्याची शक्यता आहे. फ्रेंच कंपन्यांच्या मदतीने भारतात इंजिन आणि इतर गोष्टी तयार करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये विशेषत: भारतीय नौदलासाठी अनेक प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाच्या शस्त्रांवर भर देण्यात येणार आहे. यावेळी मेक इन इंडिया अंतर्गत तीन पाणबुड्यांच्या निर्मितीचाही करार होण्याची शक्यता आहे.

आयएनएस विक्रांत ठरणार अजिंक्य

‘राफेल एम’ लढाऊ विमाने खास सागरी क्षेत्रात हवाई हल्ल्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. ते स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर तैनात केले जातील. ही विमाने तैनात झाल्यानंतर भारतीय नौदलाची शक्ती वाढणार असून आयएनएस विक्रांतही अजिंक्य ठरणार आहे. सध्या आयएनएस विक्रांतवर रशियन मिग-२९ तैनात आहेत, ज्यांना हळूहळू सेवेतून बाहेर काढले जात आहे.


Powered By Sangraha 9.0