जुहू किनाऱ्यावर दोन ऑलिव्ह रिडले कासवे

01 Jul 2023 17:09:54


olive ridley rescue

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी महानगरपालिकेच्या लाईफगार्ड्सना दोन ऑलिव्ह रिडले कासवे आढळली. माशांच्या जाळीत ही दोन कासवे अडकलेली होती. त्यांना जाळी कापुन सुखरुप बाहेर काढल्यानंतर त्यातील एका कासवाला समोरचा एक पाय नसल्याचे लक्षात आले. सुस्थितीत असलेल्या कासवाला लाईफगार्ड्सनी त्वरित पुन्हा समुद्रातील पाण्यात सोडुन दिले. तर, जखमी कासवाला कांदळवन कक्षाकडे सुपुर्द करण्यात आले होते. सध्या ते कासव कांदळवन कक्षाच्या निरिक्षणाखाली आहे.



जुहू किनाऱ्यावर गुरूवार दि. २९ जून रोजी सकाळी फेरी मारत असताना महानगरपालिकेच्या एका लाईफगार्डला माशांची जाळी तरंगत असलेली पहायला मिळाली. ती बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यात दोन कासवे अडकली असल्याचे लक्षात आले, व त्वरित वन विभाग व कांदळवन कक्षाला याबाबत माहिती दिली गेली. माहिती मिळताच कांदळवन कक्षाचे संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याआधी लाईफगार्ड्सने दोन्ही कासवांना जाळीतुन सोडवले होते. त्यापैकी एक कासव सुस्थितीत असल्यामुळे त्याला पुन्हा सुखरुप समुद्रामध्ये सोडण्यात आले. पण, एका कासवाला समोरील डावीकडचा पाय नसल्यामुळे त्याला तसेच सांताक्रुझला आणले गेले. जवळच असलेल्या रिना देव या पशुवैद्यांकडे त्याला तपासणीसाठी नेले गेले. तपासणीनंतर आता हे कासव कांदळवन कक्षाच्या एरोली येथील ट्रान्झीटमध्ये निरिक्षणासाठी ठेवले आहे.




olive ridley rescue

या कासवाला कोणतीही जखम झालेली नसुन त्याला चांगल्या अवस्थेत पोहोता येत असल्याचे आता लक्षात आले आहे, अशी माहिती कांदळवन कक्षाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. बऱ्याचदा समुद्र सफरीवर असताना सतत पाण्यात पोहल्यामुळे कासवांची शक्ती संपुन ते थकतात आणि काही वेळासाठी विश्रांतीसाठी किनाऱ्यावर येतात अशीही माहिती त्यांनी पुढे सांगितली. त्याचबरोबर हे कासव आणखी काही काळ वैद्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या निरिक्षणाखाली राहणार असुन त्याला त्यानंतर पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0