समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! २६ जणांचा मृत्यू

01 Jul 2023 11:40:01
 
accident on Samruddhi highway
 
 
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ३० जून च्या रात्री भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये २६ जणांचा मृत्यु झाला असुन ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपघातस्थळी जाऊन माहिती घेणार आहेत. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते घटनास्थळी पोहोचतील. अपघातातील जखमींचीही ते विचारपूस करणार आहेत. तर, राज्य सरकारकडुन मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहिर केली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे.
 
 
 
 
कसा झाला अपघात ?
 
विदर्भ टॅव्हल्सची ही खासगी बस काल संध्याकाळी ५ वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. एका चालकाने कारंजापर्यंत ही बस चालवली होती. रात्री ही बस कारंजा येथे थांबली होती. यावेळी सर्व प्रवाशांनी कारंजा येथे थांबून जेवण केलं होतं. सर्व प्रवाशी जेवल्यानंतर ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ आली. समृद्धी महामार्गावरून ही बस जात होती.
 
रात्रीचे एक च्या सुमारास बस पिंपळखुटा गावाजवळ येताच एका खांबाला धडकली. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही बस पुढे असलेल्या डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बसच्या टँकची डिव्हायडरला धडक लागली आणि टँक फुटला. त्यामुळे स्फोटाचा आवाज झाला अन् अचानक आग लागली.
 
तरीही बस डिव्हायडरला घासत पुढे गेली आणि पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडणं कठिण झालं. तर एक चालक आणि इतर सात प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून बाहेर पडत स्वत:चे जीव वाचवले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना इतर प्रवाशांचे जीव वाचवता आले नाही.
 

accident on Samruddhi highway 
 
 
मृतांची ओळख पटवणं कठीणं...
 
अपघातानंतर मृतांची ओळख पटवणं पोलिसांसाठी कठीण झालं आहे. कारण अपघातातील सर्व मृतदेह जळून खाक झाले आहेत. त्यांच्या अंगावरील कपडेही जळून खाक झाले आहेत. प्रवाशांचे सामानही जळून खाक झालं आहे. त्यामुळे या प्रवाशांची ओळख पटत नाहीये. त्यातच ट्रॅव्हल्स कंपनीकडे या प्रवाशांचे पत्तेही नाहीत. काहींचे फोन नंबर्सही नाहीत. यामुळे फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनीही तपास सुरू केला आहे. डीएनए चाचणी करूनच मृतांची ओळख पटवली जाणार आहे.
 
 

accident on Samruddhi highway 
 
Powered By Sangraha 9.0