आता परीक्षा मूल्यमापनाची!

01 Jul 2023 21:56:03
Article On Exam Evaluation In Education System

शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थी मागील वर्गात न ठेवण्यासंदर्भाने गेले बारा वर्षं प्रयत्न झाले. राज्य शासनाने नव्याने तरतूद करून यापुढे इयत्ता पाचवी, आठवीच्या वर्गात विद्यार्थी नापास झाल्यास त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. पुन्हा नापास झाल्यास त्याच वर्गात विद्यार्थ्याला ठेवता येणार आहे. शासनाच्या या एका निर्णयामुळे आता सुरू असणारी ढकलगाडी बंद होईल, विद्यार्थी अभ्यास करू लागतील, शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता उंचावेल, असे सांगण्यात येत आहे. पण, असे केल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावेल का? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित साधले जाईल का? यांसारख्या प्रश्नांचा उहापोह करणारा हा लेख...
 
केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर देशभरात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मूल्यमापन प्रक्रियेने शाळा स्तरावर आधारित असलेली लेखी परीक्षा केंद्रित मूल्यमापन प्रक्रियेत मूलभूत बदल करण्यात झाला. विद्यार्थ्यांच्या व्यापक विकासाची प्रक्रिया मूल्यमापनाच्या आधारे मापन करण्याची भूमिका शिक्षणात महत्त्वाची असते. शिक्षणाच्या त्रिकोणात अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. अध्ययन, अध्यापनाइतकेच मूल्यमापन महत्त्वाचे असते. शिक्षणाची अपेक्षित ध्येय, उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत? विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेतील नेमके अडथळे कोणते? विद्यार्थ्याने काय साध्ये केले आहे? कशा स्वरुपात साध्य केले आहे? विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया नेमकी कशी सुरू आहे? या संदर्भाने वास्तव जाणून घेण्यासाठी मूल्यमापन महत्त्वाचे मानले जाते.

अनेक दशकांच्या मूल्यमापन प्रक्रियेनंतर २०१०ला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या मूल्यमापन प्रक्रियेत मूलभूत बदल करण्यात आल्यानंतर ‘आता परीक्षा नाहीत’ असा समज समाजात पसरवला गेला. गेले १३ वर्षं तेच बोलले जात आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर कोणतीही परीक्षा नाही. अभ्यास न करता विद्यार्थी पुढच्या वर्गात जाता आहेत. परीक्षाच नाही म्हटल्यावर विद्यार्थी अभ्यास करत नाही. शिक्षणाची गुणवत्ता ढासळते आहे, असा आक्षेप सातत्याने घेतला जात होता. आता पुन्हा एकदा विद्यार्थी नापास होणार आहे. विद्यार्थी नापास केले, तर शिक्षणाची गुणवत्ता खरंच उंचवणार आहे का? नापास केल्याने गुणवत्ता उंचावत असेल, तर जगभरात शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी पुन्हा-पुन्हा अनेक वाटा का धुंडाळल्या जातात?

जगभरात शिक्षणासंदर्भात विविध अंगाने विचार केला जात आहे. शिक्षण आनंददायी करण्याबरोबर मूल्यमापन तणावमुक्त करणे, विद्यार्थ्यांचा शिक्षणातून समग्र विकास करणे, शिक्षणाच्या मूलभूत विचाराची पेरणी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शिक्षणातील तणाव कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जगभरात परीक्षेच्या तणावात लाखो विद्यार्थी आहेत. आपल्या देशातही परीक्षा केंद्रित व्यवस्थेमुळे दरवर्षी किमान चार ते पाच हजार विद्यार्थ्यांची पानगळ होते. शिक्षण जीवन फुलवण्यासाठी आहे. मात्र, परीक्षाकेंद्रित व्यवस्थेमुळे ही मुले आपले आयुष्य संपुष्टात आणता आहेत.शिक्षण म्हणजे केवळ एका कौशल्याचा विचार नाही. कौशल्य कमी-अधिक प्रमाणात साध्य करण्याचे प्रयत्न केले जातात. शिक्षणातून व्यापक विकास अपेक्षित असेल, तर त्या दिशेचा प्रवास घडतो आहे की नाही, हे पडताळून पाहण्यासाठी मूल्यमापनाची गरज आहे. त्यामुळे समग्र विकासाच्या दिशेने जायचे असेल, तर त्यासाठीची मूल्यमापन साधनेदेखील समग्र स्वरुपाचे असायला हवीत. प्रत्येक मूल्यमापन साधन विशिष्ट कौशल्यांचे मापन करत असते. अशा परिस्थितीत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात आठ साधनांची निश्चिती केली होती. ही साधने म्हणजे व्यापक मूल्यमापन करणारी आहेत.

लेखी परीक्षेतून केवळ लेखन कौशल्यांचे मूल्यमापन करणे शक्य आहे. काही प्रमाणात आकलन जाणता येईल. केवळ लेखन कौशल्य म्हणजे शिक्षण नाही. विद्यार्थ्यांच्या श्रवण, भाषण आणि वाचन कौशल्यांचे मूल्यमापन कसे करणार? विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया, प्रयोग क्षमता, अभिव्यक्ती, व्यवस्थापन कौशल्य, सृजनक्षमता, गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्य, २१व्या शतकासाठीची कौशल्यांचे मूल्यमापनाची गरज आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना किमान उत्तम बोलता यायला हवे. आपले विचार, मतांची योग्य स्वरुपात मांडणी करता यायला हवी. आपले विचारांचे प्रकटीकरण उत्तम स्वरुपात करण्याची गरज असते. यातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजली की नाही, हे केवळ लेखी परीक्षेच्या माध्यमातून मापन करता येणार नाही. शासनाने समग्रतेने विकास मापनासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रियेत आठ साधनांचा समावेश केला आहे. या साधनात काही तंत्रांचाही समावेश आहे. मूल्यमानात निरीक्षण नोंदी, तोंडीकाम, कृती-उपक्रम, प्रयोग-प्रात्यक्षिक, प्रकल्प, अल्पगुणांची चाचणी, इतर स्वाध्याय-वर्गकार्य या साधनांचा समावेश आहे. यात गटचर्चा, चर्चा, प्रकटवाचन, प्रश्नोत्तरे, मुलाखत, भूमिका अभिनय यांसारख्या साधनतंत्राचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास होत असताना त्याचेही मापन यातील काही तंत्राच्याद्वारे करणे शक्य आहे.

 प्रकट वाचन तंत्राच्या आधारे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांची वाचन गती, स्वराघात, लय, उच्चार पडताळून पाहणे गरजेचे असते. लेखी परीक्षेत या गोष्टी कशा तपासणार, हा खरा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना प्रयोग करता येणे, योग्य हावभावासह कथा सांगता येणे, प्रयोग करताना साहित्य व्यवस्थापन, स्वतःचे मत आणि भूमिका गटचर्चा, चर्चा, नेतृत्व कौशल्य अशा अनेक कौशल्य विकसित करण्याची जबाबदारी आहे. शिक्षण म्हणून आपण समग्र व्यक्तिमत्त्व विकासाची अपेक्षा असते. असा विविध अंगी विकास लेखीपरीक्षेच्या माध्यमातून मोजता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्याचेही मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाद्वारे शक्य आहे. विविध साधनतंत्राद्वारे मूल्यमापन होत असल्याने मुलांवरील परीक्षेचा ताण कमी होण्यास निश्चित मदत झाली आहे. यातील अनेक गोष्टी इतक्या सहजतेने होत होत्या की, आपण जे काही करतो आहोत, त्या परीक्षा आहेत असे विद्यार्थ्यांना वाटतदेखील नव्हते.विद्यार्थी गोष्ट सांगतो, गाणी म्हणतो, कविता गातो, प्रकट वाचन करतो, गप्पा मारतो, चर्चेच सहभाग घेतो, प्रकल्प करतो, माहिती गोळा करतो या कृतींना गुण मिळत होते.त्यामुळे विद्यार्थी सहजतेने पुढील वर्गात जाणे शक्य होते. मुळात विद्यार्थ्यांची प्रत्येक कृती आणि त्याचा प्रतिसाद म्हणजे मूल्यमापनच होते.

आपल्याकडे शिक्षण, अभ्यास म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक केंद्रित प्रक्रिया मानली जाते. पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे पाठ करणे, परीक्षेत ते लिहिणे आणि गुण मिळवणे म्हणजे शिक्षण मानले जाते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने या पारंपरिक मूल्यमापनाला छेद दिला. पारंपरिक मूल्यमापन प्रक्रियेला छेद देणे, हेच मोठे यश आहे. अनेक वर्षं परीक्षांचे तणाव कमी करण्यासाची जगभरात विविध समित्या शिफारसी करत आहेत. त्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात असताना, आपल्या देशात बदललेल्या मूल्यमापनानेदेखील मोठे यश प्राप्त केले होते. इतक्या विविध अंगाने आणि जगाने स्वीकारलेल्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार मापनाची संधी यात आहे. त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. केवळ लेखी स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीने विद्यार्थ्यांवरील ताण वाढत होता. तो यानिमित्ताने कमी झाला. विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात घट होणे आणि आनंदाने शिकणे, हे अधिक महत्त्वाचे आहे.शिक्षण म्हणजे पास-नापास करणे, नाही हे लक्षात घ्यायला हवे. मात्र, आज शिक्षण म्हणजे परीक्षा इतका अर्थ बदलला आहे

विद्यार्थी शाळेत नियमित आला. शिक्षकांनी वेगवेगळे अध्ययन अनुभव दिले की, विद्यार्थी उत्तीर्ण होणारच. मात्र, जे विद्यार्थी काही न करता उत्तीर्ण होता आहेत, त्यांचा खरा प्रश्न आहे. जी मुले शाळेच्या पटावर आहे, ज्या विद्यार्थ्यांची अनुपस्थिती अधिक आहे, ती मुले वयानुरूप पुढील वर्गात जात आहेत. दिव्यांग विद्यार्थी, गतिमंद, अध्ययन अक्षम विद्यार्थी अपेक्षित क्षमता नसतानादेखील पुढील वर्गात पोहोचत होती.शिक्षण हक्क कायद्यातील कलम चार प्रमाणे वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिला जातो.त्यामुळे एखादा विद्यार्थी नापास झाला, तरी तो कायद्याने पुढील वर्गात जाण्यास पात्र ठरतो. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थी या कलमाप्रमाणे पुढील वर्गात जात होते. अर्थात, हे विद्यार्थी म्हणजे अपवाद ठरायला हवेत.अशा स्वरूपातील विद्यार्थी नापास होतील; पण वर्षभर शाळेत येऊनही तो विद्यार्थी काहीच शिकला नाही, असे होणार नाही.

त्यामुळे अशा विद्यार्थ्याला शिकण्याची संधी त्याच्या बुद्धिमत्तेनुसार उपलब्ध करून देणे, हे शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी असल्याचे कायद्यात म्हटले आहे. त्यामुळे आज वंचित समूहातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकवणे महत्त्वाचे आहे. ते विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले, तर उद्या ती शिक्षणाच्या प्रवाहातून कायमची बाहेर फेकली जाण्याचा धोका आहे. मूल्यमापनात काही चुकीचे घडत असेल, तर त्यात दुरूस्ती होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मुल नापास होते तेव्हा ते नापास होत नाही, तर व्यवस्था नापास होत असते. त्यामुळे आज मुले नापास करणे सुलभ असले, तरी उद्याच्या विकसित भारतासाठी ते पाऊल योग्य नाही.शेवटी ‘सबका साथ सबका विकास’ करायचा असेल, तर आपल्याला सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचायला हवे.

संदीप वाकचौरे
sandeepwakchaure२००७@rediffmail.com

Powered By Sangraha 9.0