राष्ट्रवादीच्या शिबिरात ओबीसींच्या हिताचे निर्णय झाले नाहीत!

09 Jun 2023 19:05:17
BJP Chandrashekhar Bawankule

नागपूर
: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरात ओबीसींच्या हिताचे निर्णय झाले नाहीत, ओबीसींचे हित साधायचे असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचा राष्ट्रीय किंवा राज्याचा अध्यक्ष ओबीसी व्यक्ती करावा असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरात काहीही झाले नाही असा थेट आरोप त्यांनी केला. बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये छगन भुजबळ वगळता कोणत्याही ओबीसी नेत्याला काम मिळाले नाही, यामुळे हा पक्ष ओबीसीचा शत्रू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुणीही ओबीसीचे समर्थन करणारे नेते नाहीत. त्यांनी नेहमीच ओबीसी जनतेचा घात केला असून याची अनेक उदाहरणे देता येतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. या उलट भाजपाने ओबीसी समाजातील व्यक्तिला देशाचे पंतप्रधानपदाची संधी दिल्याचेही ते म्हणाले.

तेलंगणाचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष महाराष्ट्रात विस्तार करीत असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने यावे, प्रत्येकाचे स्वागत आहे. सर्वांना त्यांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र कितीही पक्ष आले तरी भाजपाला कोणताही फरक पडणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विकासकामांची शिदोरी आमच्याजवळ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरी भाजपा कार्यकर्ते पोहचणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, नागपूर लोकसभेची जबाबदार आ.प्रवीण दटके तर रामटेकची जबाबदारी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही नेत्यांना जबाबदारी दिलेल्या मतदारसंघाचा चांगला अनुभव असल्याचे सांगत गजभिये भाजपामध्ये मागासवर्गीयांचे नेते आहेत. त्यामुळे दोघेही आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडतील, असा विश्वास बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केला.

बावनकुळे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नसून नॅरेटिव्ह सेट केला जातोय, ते कुटुंबासह काश्मिरला गेले असावे, असे म्हणत कोल्हापूर दंगली प्रकरणावर कार्यवाही करण्यात सरकार सक्षम आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवारांना आलेल्या धमकीबाबत बावनकुळे म्हणाले, कुणालाही अशाप्रकारे धमकी देणे योग्य नसून सरकार यावर योग्य ती कार्यवाही करेल, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.


Powered By Sangraha 9.0