दुर्गण विकृती

    08-Jun-2023   
Total Views |
Maharashtra Criminal atrocious Cases

स्वा. सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात ‘सद्गुण विकृती’चा उल्लेख करीत काही उदाहरणे उद्धृत केली होती. पण, सध्या आसपासच्या काही किळसवाण्या घटनांच्या बातम्या वाचल्या की, केवळ ‘दुर्गण विकृती’चाच दर्प यावा. मुंबईनजीकच्या मीरा रोडमध्ये काल-परवा उघडकीस आलेली घटनाही त्याच पठडीतली. ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’मध्ये राहणार्‍या ५६ वर्षांच्या गृहस्थाने त्याच्या ३२ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केली. ‘निर्घृण’ हा शब्दही खरंतर सौम्य ठरावा, अशाप्रकारे या नराधमाने त्याच्या प्रेयसीचे तुकडे तुकडे केले. एवढ्यावरही थांबेल ती दुर्गण विकृती कुठली! या मानवरुपी राक्षसाने हे तुकडे कुकरमध्ये शिजवले. गॅसवर भाजले. नंतर चक्क बादलीमध्ये लपवून ठेवले, तर काही तुकडे गटारात फेकले, काही भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले. म्हणजे त्या मृतदेहाची अगदी कल्पनेपलीकडची ही विटंबना... हे सगळं साधं वाचूनही घृणा यावी इतकं भयंकर आणि नरकचित्रच! पण, आज कलियुगात अशा घटना एकामागोमाग बिनदिक्कत घडतायेत. सातासमुद्रापार नाही, अगदी आपल्या आसपास. मीरा रोडची ही घटना तर या सर्वांचा परमोच्च बिंदू ठरावी. यापूर्वीही श्रद्धा वालकरचे प्रकरण असो किंवा मुंबईच्या परळमध्ये पोटच्या मुलीने आपल्या जन्मदात्या आईचा खून करून कपाटात-बाथरुममधील पाण्याच्या टाकीत तिचे असेच छिन्नविछिन्न तुकडे दोन महिने ठेवण्याचा केलेला रानटी प्रकार असो... हे पाहिले की, विकृती ही लिंग, जात, धर्मापलीकडची असते, हेच या घटनांवरून सिद्ध होते. असे हे टोकाचे प्रकार का घडतात? द्वेषाने भरलेली माणसं आपल्या सगेसोयर्‍यांच्या रक्तालाच अशी कशी एकाएकी चटावतात? संवाद, चर्चा, समुपदेशनातून मार्ग निघूच शकत नाही, असं का घडतं? माणसात लपलेला हा हैवान एवढा वरचढ ठरेपर्यंत त्याला आपणच द्वेषाने पाळतो-पोसतो का? आपल्याच आईबापाचे, प्रियकर-प्रेयसीचे, रक्तसंबंधांचे असे रक्तबांध वाहताना खरंच कुठले आत्मिक समाधान वाटत असावे? पश्चातापाची लकेरही कशी या निर्जीव हत्यार्‍यांच्या पाषणरुपी हृदयाला स्पर्श करत नाही? हे सगळे खरंच या हत्यार्‍यांच्या मनकल्पनेतले की मुक्त माध्यमांतील काल्पनिक पण आता वास्तवात उतरलेल्या एखाद्या भयपटातील दु:स्वप्नासारखे... सगळं अनुत्तरीतच!

पाशवी प्रवृत्ती

स्वप्नांचे शहर असलेली मुंबईनगरी ही महिलांसाठी खरंच कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न मरीन लाईन्स वसतिगृहातील १८ वर्षीय इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तसेच, मुंबईसारख्या महानगरात महिला या त्यांच्या वसतिगृहातही सुरक्षित नसतील, तर इतर सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच. खरंतर मुंबईसारख्या सर्वांचे पोट भरणार्‍या शहरात राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी, नोकरदार उदरनिर्वाहासाठी धाव घेतात. महिलांचे वसतिगृह अशावेळी विद्यार्थिनींसाठी, नोकरदार महिलांसाठी एक किफायतशीर पर्याय मानला जातो. पण, हाच किफायतशीर पर्याय त्या महिलांच्या अब्रूवर आणि जीवावर बेतणारा असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. विशेषकरून अशा महिला वसतिगृहांमधील नियुक्त्या, छोट्या-मोठ्या कामांसाठी ये-जा करणारी मंडळी यांची कटाक्षाने नोंद ठेवायलाच हवी. शिवाय ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे हे केवळ प्रवेशद्वारापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मजल्यावर ते सुस्थितीत असणे तितकेच महत्त्वाचे. तसेच अशा वसतिगृहांमध्ये महिला पोलिसांनी ठरवून भेटी देणे, तेथील महिलांशी चर्चा करणे यांसारख्या प्रयत्नांना अधिक गती देण्याची आज नितांत आवश्यकता आहे. फक्त सरकारीच नाही, तर अशा खासगी वसतिगृहांवरही पोलिसांची नजर असावी. अगदी वसतिगृहात काम करणार्‍यांपासून ते अशा वसतिगृहांबाहेर वावरणार्‍या रोडरोमिओंपर्यंत, पोलिसांनी, तेथील सुरक्षारक्षकांनी खबरदारी बाळगणे हे अगदी क्रमप्राप्तच. कदाचित तसे झाले असते, तर आज मुलीचे प्राण वाचले असते. वसतिगृहातील मुली-महिला या आपल्या घरपरिवारापासून दूर असतात. त्यामुळे नियमितपणे त्यांच्याशी वसतिगृहातील प्रशासनाने संवाद साधणे, गरज पडल्यास त्यांना समुपदेशन देणे हेदेखील तितकेच आवश्यक. शिवाय या वसतिगृहांमध्ये घडणारे गैरप्रकार वेळीच पोलिसांच्या निदर्शनास आणून त्यांना चाप लावलाच पाहिजे. त्यामुळे भविष्यात किमान महिलांची वसतिगृहे सर्वार्थाने सुरक्षित राहतील, यासाठी सरकारने कठोर पावले उचलायलाच हवी!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची