निद्रारूपेण संस्थिता...(भाग-२)

08 Jun 2023 21:25:03
Article On Bhagwan Birsa Munda

निद्रा अर्थात झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले असल्याचं आपण जाणतो. निद्रेचा हक्क सगळ्यांनाच असतो, तसा तो बिरसालाही होता. पण, नको तो फितुरीचा जास्तीचा हक्क काहींनी मिळवत फिरंग्यांकडून पलंगही मिळवले. बिरसा कालखंडानंतर लोकमान्य टिळक तसेच सावरकरांसारख्या कालखंडात जो बदल होत गेला, त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणं पुढच्यांना सोप होत गेलं असावे. आज दि. ९ जून या भगवान बिरसा मुंडांच्या स्मृतिदिनानिमित्त या लेखाचा हा दुसरा आणि शेवटचा भाग देत आहोत.

आज आपल्यातले काहीजण, झोपण्यापूर्वी श्रीदुर्गसप्तशती, अध्याय पाच, श्लोक १६ मधला झोपेच्या
यादेवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः।
या मंत्रांचे पठण करतात, तर काहीजण
पड पड कुडी धरणीवरी, गंगा भागीरथीचे तीरी।
गयागी गमन प्रयागी मरण, काशिविश्वेश्वरा तुझे नित्य स्मरण।
अस्तिक अस्तिक काळभैरव दंडपाणी ...असे अस्तिक ऋषींचे नाव घेत नाईट लॅम्प चालू करत झोपायला जातात. सर्व प्राणिमात्रांमध्ये ’निद्रा’रूपात विराजमान असलेल्या देवीला आणि धरणीमातेला सगळे नमस्कार करतात. याने मनातील विचार प्रक्रिया हळूहळू थांबण्यास मदत होते, एक लय तयार होत. १०-१५ मिनिटांत झोप लागते. झोपताना देवीदेवतांचे स्मरण केल्याने स्वप्ने दूर करण्यात व दुःस्वप्न टाळण्यासाठी मदत होते, असे केल्याने आपल्याला नकारात्मक शक्तींच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळते. रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जेची शक्ती वाढते आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीवर झोपेत असताना ते सहजपणे हल्ला करू शकतात. आपण अशी उदाहरणे इतिहासात आणि महाभारतातदेखील बघत आलो आहोत. खर्‍या अर्थाने, झोपण्यापूर्वी झोपेच्या मंत्रांचे पठण करण्यास पूर्वापार आपल्याला म्हणूनच सांगितले आहे.

मेध्यामनःसंयोगः

असे सांगतात की, ‘मेध्यामनःसंयोगः’ म्हणजे ‘मेध्या’ नामक नाडी आणि मन यांचा संयोग म्हणजे ‘निद्रा’ होय. सर्व इंद्रिये मनात लीन झाली, म्हणजे इंद्रियांचे कार्य थांबले की, व्यक्तीला निद्रा येते. यावेळी व्यक्तीला ऐकू येत नाही, दिसत नाही अन् वासही येत नाही. निद्रा (झोप) ही ब्रह्माचे स्त्रीरूप असून समुद्रमंथनातून तिची उत्पत्ती झाली, असे आपल्या पुराणांत सांगितले आहे.

चमक रुद्रप्रश्न...
अभयं च मे। सुखं च मे। शयनं च मे।
सूषा च मे। सुदिनं च मे॥
प्रसिद्ध रुद्रसूक्ताच्या ’चमक’ नावाच्या दुसर्‍या अर्ध्या भागामध्ये ’मला अमुक मिळो, मला तमुक मिळो’ अशा अनेक गोष्टी रुद्रदेवतेकडून मागितल्या आहेत. त्यातच यावरील मागण्या आहेत. त्यांचा अर्थ मला भीतीपासून मुक्ती मिळो, मला सुख मिळो, चांगली निद्रा, चांगली पहाट आणि चांगला दिवस मिळो...असा आहे. त्यामधून आरामाचे जीवन अशा अर्थी ‘सुखं च मे शयनं च मे’ हा शब्दप्रयोग वापरला आहे.

मांडुक्योपनिषद...

‘मांडुक्योपनिषद’ या अथर्ववेद शाखेतील एका उपनिषदात आत्मा चतुष्पाद आहे, असे सांगितलं आहे. म्हणजेच जागरण, स्वप्न, निद्रा आणि तुरिया या त्याच्या प्रकट होण्याच्या चार अवस्था आहेत. त्यातील झोपेचा तिसरा टप्पा, म्हणजेच गाढ झोपेची लय प्राप्त होते आणि आत्म्याची स्थिती आनंदमय ज्ञानाचे मूर्त स्वरूप बनते. या कारणास्तव, तो सर्वज्ञ आणि आंतरिक अस्तित्व आहे आणि सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचे आणि लयाचे कारण आहे. ‘मांडुक्योपनिषदा’तही निद्रेचा उल्लेख आपण बघू शकतो.

सामान्यांची झोप...

आपल्याला जेवणानंतर ग्लानी, झापड येते. उत्तम आरोग्यासाठी मनुष्याला त्याच्या देहाच्या मूळ स्वभावामुळे रोज झोप येते. झोपेचा कालावधी ऋतुमानानुसार, वयानुसार, शरीर व मानसिक स्वास्थ्यानुसार कमी-अधिक बदलतो. अतिमानसिक ताणतणावामुळे मन थकते, आपली ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये कार्य नीट करण्यात असमर्थ ठरतात व झोप येऊ लागते. ज्याप्रमाणे मन थकल्याने झोप येते तशीच शारीरिक कष्ट झाल्यावर, शरीर थकल्यावरही चटकन झोप येते. मनुष्य प्राण्याला रात्री स्वाभाविकपणे झोप येते व शांत गाढ झोप लागते, असे झोपेबद्दल आपल्याला अनेकांकडून समजते. निद्रेबद्दल आपल्याला समर्थ काय सांगतात ते जागेपणी आपण बघू.

निद्रेची सुस्ती...

समर्थ श्री रामदासांच्या सार्थ श्री दासबोधाच्या दशक दोन समास सहामध्ये माणसाच्या तमोगुणाविषयी सांगताना जो अखण्ड भ्रमांत असतो, ज्याचा कृतनिश्चय विस्कटून जातो, ज्याचे निद्रेवर अत्यंत प्रेम, तो तमोगुणी असे निद्रेबद्दल सांगितले आहेच. तमोगुणी व्यक्तीच्या निद्रेमुळे आळस, सुस्ती, तंद्री यांमुळे असफलता हाती येते. त्यांच्या झोपेतल्या स्वप्नांना मनात असूनही मूर्त रुप येत नाही. झोपेवर ताबा नसलेली व्यक्ती ’आत्ताच काय नडलय! करू सावकाश’ अशा विचाराने झोपून राहते आणि तिचा कार्यभाग बुडतो. अशा व्यक्तींची कामे पूर्ण न झाल्यास ते त्याची अनेक कारण शोधून त्या असफलतेचे समर्थन करत राहतात. निद्रेच्या आहारी गेलेली व्यक्ती शिथिलगात्र होत आपल्या कामात ढिली पडते. या लोकांसारखी निद्रा माणसाला अनारोग्य तर देतेच, पण तीच निद्रा त्यांना दु:ख व दारिद्य्रही देते. ही माणस निद्रेनेच अधोगतीस पावते होतात.

अखंड भ्रांती पडे। केला निश्चय विकले। अत्यंत निद्रा आवडे। तो तमोगुण॥
अशा एका तमोगुणी गृहस्थावर आधारित बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातला ’झोप’ हा श्री. कृ. कोल्हटकर यांचा इयत्ता चौथीसाठीचा धडा ११ वा, मला वाचनीय वाटतो.

झोपेचा धडा...

अनेकजण झोपेत घोरतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःची कधी झोपमोड होत नसते. पण, त्यांच्या जवळपासच्या माणसांचा कधी डोळ्यास डोळा लागत नसतो. त्यांच्या घोरण्याच्या आवाजाने डासांचे गुणगुणणे मात्र लोपून जाते, ही त्यांची जमेची बाब ठरते. अनेकांची वामकुक्षीच्या नावाखाली घेतली जाणारी झोप एकदोन तासांऐवजी चारपाच तासांच्या पुढे कधी जाते, ते त्यांनाही कळत नसते. मित्रमंडळीत गप्पा चालू असता काही जण बघताबघता झोपायलाही लागतात. हे निद्राप्रेमी जेव्हा गाण्यांच्या बैठकीत दर्दी म्हणून जातात, तेव्हा आपल्या घोरण्याने बाजाच्या पेटीची नकळत साथ करू लागतात. मोठमोठ्या गवयांच्या पहाडी आवाजांचे अशा घोरण्यापुढे तेज पडत नसावे. या लोकांच्या प्रवासात त्यांच्या जीवाची धांदल उडत असेल. झोपेच्या भरात मुक्कामाच्या पुढे एकदोन स्टेशन जाऊन मग उलट दिशेने येणारी गाडी पकडावी लागत असेल.

हे प्रवासी जेव्हा स्टेशनावर कधी नव्हे ते वेळेवर जात असतील खरे, पण गाडी निघायला अजून वेळ आहे, असे लक्षात येताच फलाटावरील बाकड्यावर तेवढ्यातल्या तेवढ्यात एक डुलकी घेत असताना त्यांची गाडी निघून जात असताना कळतही नसेल. ही प्रवासी मंडळी चक्क हमालाला पैसे देत असतील व आपल्याला उठवायला त्या हमालाला बजावत असतील. ही निद्रा’प्रेमी लोक बसून झोप घेत असतील, उभ्याने झोप घेत असतील, फार काय, पण चालतानाही झोप घेत असतील याचा काही भरवसा नाही. त्यांना पळत पळत झोप घेताना मात्र अजून कोणी पाहिलेल नसेल म्हणजे नशीब! या अशा झोपेवरचा तो धडा वाचताना वाटलं की शाळेत वर्गावर आलेला एखादा बदली शिक्षक, मुलांना ’चला झोप हा अकरावा धडा वाचत बसा रे’ असं सांगून स्वतः एक डुलकी तर घेत नसेल ना! आपण योगासने झाल्यावर न चुकता शवासन करतो आणि ते करताना काहींना झोप लागतही असेल, पण सच्च्या योगीजनांची निद्रा ही वेगळीच असते.

योगीजनांची निद्रा...

योगासनांमुळे आपल मन आणि शरीर संतुलित राहण्यास मदत होते. काही योगासनांप्रमाणेच तुमच्या मनाला शांत करणारी आणि शरीराला निरोगी ठेवणारी एक योग्य क्रिया म्हणजे योगनिद्रा. जेव्हा तुम्ही खूप थकता अथवा तुम्हाला पुरेसा आराम मिळत नाही, तेव्हा काही मिनिटांची योग निद्रा तुम्हाला ताजेतवाने करायला मदत करते. योग निद्रा म्हणजे झोप आणि जागृती यांच्यामधील एक स्थिती आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि मनाला आराम मिळतो. या निद्रेला ‘आध्यात्मिक निद्रा’ असेही म्हणतात. अध्यात्मात वेदांचे जे विविध प्रकार सांगितले जातात त्यात आख्यायिकेनुसार, ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून ऋग्वेदासह तीन वेद निघाले होते, असा उल्लेख आहे.

घेतो झोप सुखे फिरोनी उठतो...

मृत्यू म्हणजे एक प्रकारची निद्राच मानली जाते. आपण जेव्हा अंथरुणात झोपतो, तेव्हा आपण पुन्हा उठू का, हे आपल्याला ठाऊक नसते. जीवनात जागृती आणि निद्रा हे खूप महत्त्वाचे असतात. जागृती म्हणजे आपण जीवनात जागेच असतो, तर निद्रा म्हणजे आपण जीवनात फक्त झोपूनच राहतो. आपण जेव्हा गाढ झोपी गेलेलो असतो, तेव्हा आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे मृत्यू म्हणजे एक प्रकारे निद्रा असे संबोधले जाते. म्हणून सद्गुरू वामनराव पै यांच्यासारख्यांनी आपल्या प्रवचनात ’मृत्यू म्हणजे निद्रा’ यावर सांगितल आहे की, कोणी नुसताच जागत राहिला आणि कोणी नुसताच झोपत राहिला की संपल असे म्हणायचे. म्हणून मर्यादित झोप हवी. काम भरपूर केले, तर झोप हवी. निद्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ती कधी येते हे आपल्याला कळतच नाही. कोणी जरी ठरवले की झोप येऊ द्यायची नाही तरी ती येतेच, तिच्यावर सामान्य लोक ताबा ठेऊच शकत नाहीत.

तसेच आपण जागे कधी होतो तेही कळत नाही. जणू हे देवाकडचं एक गुपितच आहे. जन्म आणि मृत्यू म्हणजे नेमकं हेच आहे. ज्या वेळेस मरण येत तेव्हा दिवे विझवल्यासारखा काळोख होतो तेव्हा सगळे दरवाजे बंद होतात. एक एक दरवाजे बंद होताना त्याची वाचा जाते, त्याचे डोळे जातात असे करत करत शेवटी त्याचा श्वास जातो. मग लोक म्हणतात ’अरे गेला रे गेला.’ म्हणजे गेला कोण तर श्वास गेला. जो गेला तो परत येत नाही त्याला म्हणून मृत्यू म्हणतात. म्हणून ’जागृती व निद्रा’ आणि ’मृत्यू व जन्म’ या गोष्टी सारख्याच आहेत. म्हणून असे म्हंटलं आहे की, ’डोळ्याने बघतो ध्वनी परिस तो कानी पदी चालतो जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसार काम करतो विश्रांतीही घ्यावया घेतो झोप सुखे फिरोनी उठितो ही इश्वराची दया.....’ ही देवाची दया आहे, नाहीतर झोपला तो झोपला. म्हणून जागे झाल्यावर आपण देवाचे आभार मानावेत.

निद्रेचे तिकीट...

काहींचा असा अनुभव असतो की, पुढे येणार्‍या घटनाही कधी कधी स्वप्नांत प्रथम दिसतात. असे म्हणताना सावरकर त्यांच्या एका कवितेत सांगतात की, भविष्याच्या चित्रशाळेंत काय काय चित्रे हळूहळू प्रेक्षकांस उघडी होत जाणार आहेत ती निद्रेचे तिकीट काढले की कधी प्रथमही पाहण्यास सापडतात. सुषुप्तींत-गाढ झोंपेंत जी स्थिती ती मूळ अव्यक्ताच्या द्वंद्वरहिततेची लवमात्र कल्पना देऊ शकते. ’योगनिद्रा’ हे नाव समाधीला देण्यात येते. यांचेही कारण हेच की, ती समाधीची कल्पना सामान्य जनांस यावयास गाढ निद्रेतील जाणीव ही कशीबशी पण एकच उपमा आहे. झोपेत आपला देह जिथे असतो त्याहून अन्यत्र आपण संचारतो. या झोेपेतील अनुभवावरूनच प्रथम देह हा आत्मा नाही ही कल्पना सुचते.

आपली कॉट/बेडवरची निद्रा...

निद्रा अर्थात झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले असल्याचं आपण जाणतो. निद्रेचा हक्क सगळ्यांनाच असतो तसा बिरसालाही होता. पण, नको तो फितुरीचा जास्तीचा हक्क काहींनी मिळवत फिरंग्यांकडून पलंगही मिळवले. बिरसा कालखंडानंतर लोकमान्य टिळक तसेच सावरकरांसारख्या कालखंडात जो बदल होत गेला, त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणं पुढच्यांना सोप होत गेलं असावे. याच स्वातंत्र्य सैनिकांमुळे सरकारी महालांमध्ये मोठी ताणातणी होत राहिली असणार. वृत्तपत्रांमधून हाकोट्या झाल्या असणार. शेवटी समाजाची झोप उडली असेल. त्यामुळे समाज झोपेतून जागा होत गेला. ते त्यांचे स्वप्नवत चित्र आज आपण बघत आहोत आणि सुखाने झोपू शकत आहोत. पलंगावरची सुखाची निद्रा आणि सावरकरांची सुखाची निद्रा यात मग आपल्याला फरक कळू लागला आहे. काही शहाणे झाले काहीजण वेड पांघरून पेडगावला जात राहिले. काही गोधडीत सुख घेतात, तर काही आज सावरीच्या मऊ मऊ कापसाची उशी किंवा डकबॅकच्या उशा व गाद्या, रजई ओढून ताणून देणार्‍या निद्राप्रेमींना आपण बघत आहोत; निद्रादेवीचे वरदान मिळवलेले काहीजण हे असे आहेत, तर काहीजण डोक्याखाली कोपर घेऊन शिणवठा असल्याने पाठ टेकताच झोप लागणारेही आहेत. निद्रेकडे आपण योग्य दृष्टिकोनातून बघत आहोत का आणि आपण :

यादेवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्य नमोनमः।
असे मनोभावे आळवल्यावर देवी आपल्यावर प्रसन्न राहात असेल का? आपल्याला भारतमातेच्या सेवेत कार्यरत राहण्यास उत्साह देत असेल का? बिरसा आणि सावरकर अशांना सतत ध्यानी ठेवत त्यांना नमन करत असताना आता असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आहेत.

श्रीपाद पेंडसे
Powered By Sangraha 9.0