लव्ह जिहादचा विरोध करणारा स्टेटस ठेवला म्हणून तरुणीला कट्टरपंथींच्या धमक्या!

06 Jun 2023 16:58:44
Pune Love Jihad Status

पुणे
: दिल्लीमध्ये साक्षी या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खुनाचा व्हिडिओ स्टेटसला ठेवत लव्ह जिहादचा निषेध करणाऱ्या तरुणीला संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी या मुलीला इंस्टाग्राम व व्हाट्सअपद्वारे अश्लील शिवीगाळ करून धमकी देण्यात आलेली आहे. चिंचवड पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आलम राजबक्सादर शेख (वय २०, रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड मध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपी आलम हे एकाच कंपनीमध्ये काही वर्षांपूर्वी काम करीत होते. तो या तरुणीच्या मित्राचा मित्र आहे. त्यामुळे त्याने या तरुणीला सोशल मीडियावर फॉलो केलेले होते.

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये साक्षीचा साहिल नावाच्या मुस्लिम तरुणाने निर्घृण खून केला होता. चिंचवड येथे राहणाऱ्या तरुणीने हा व्हिडिओ व्हाट्सअपवर स्टेटस म्हणून ठेवला होता. त्यावर 'मुलींनो काळजी घ्या' असा संदेश असलेला मजकूर देखील नमूद केलेला होता. त्यानंतर आरोपी आलम याने या तरुणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील शिवीगाळ केली. 'स्टेटस ठेवायचं बंद कर, नीट राहायचं आहे ना. परत मला स्टेटस दिसले ना... मग मी तुला दाखवेन, मी कोण आहे? बघायचं आहे का तुला, मी काय करू शकतो?' अशी धमकी ३१ मे रोजी दिली. त्यानंतर ३ जून रोजी ही तरुणी कामावर असताना आलम याने तिला गाठले.

हात पकडून तिला जबरदस्तीने थांबवले. त्यानंतर 'मीच तुला इंस्टाग्रामवरून मेसेज केला होता. संध्याकाळपर्यंत तुला संपवतोच. तुम्हाला काय शिकवण आहे, ते आम्हाला चांगलं माहिती आहे. तु दिल्लीला होती का, तिथे काय झाले ते पाहायला? तुला आता सोडणार नाही.' अशी धमकी दिली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ शोध घेत आलम याला गजाआड केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करीत आहेत.


Powered By Sangraha 9.0