वाराणसीत जुलै मध्ये इंटरनॅशनल टेंपल कन्व्हेंशन चे आयोजन

05 Jun 2023 14:53:38
Varanasi Temple Connect Convention

वाराणसी
: जगातील मंदिरांना जोडणारे व्यासपीठ व पुणेस्थित संस्था असलेल्या टेंपल कनेक्ट तर्फे वाराणसी येथे २२ ते २४ जुलै २०२३ दरम्यान दरम्यान इंटरनॅशनल टेंपल कन्व्हेंशन अ‍ॅन्ड एक्स्पो (आयटीसीएक्स) चे आयोजन करण्यात आले आहे.मंदिर व्यवस्थापनावरील सर्वोत्तम पध्दती व व्यवस्थापनाशी निगडीत अंर्तदृष्टी मिळावी या हेतूने भारत आणि जगभरातील मंदिर व्यवस्थापन एकत्र येणार आहेत.याचे उद्घाटन २२ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.या अधिवेशनाला केंद्र आणि विविध राज्यातील सरकारी प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील.भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय या अधिवेशनाचे अधिकृत भागीदार असतील.

टेंपल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी म्हणाले की,आयटीसीएक्सचे मुख्य उद्दिष्ट अभ्यागतांना आणि भाविकांना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी नवीन युगाच्या कल्पनांसह मंदिर परिसंस्थेला अधिक सक्षम करणे आहे.जगभरातून सुमारे ३५० मंदिरे याच सहभागी होतील अशी अपेक्षा असून आतापर्यंत २८५ मंदिरांनी या अधिवेशनासाठी नोंदणी केली आहे.त्यामध्ये काशी विश्‍वनाथ देवस्थान,गिरनार दत्त मंदिर,माँ वैष्णव देवी मंदिर,कालभैरव मंदिर उज्जैन ,महाकालेश्‍वर ज्योतिर्लिंग,कंकाल काली माँ मंदिर या भारतातील प्रमुख मंदिरे सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनात युके,युएस,श्रीलंका,मलेशिया,थायलँड,ऑस्ट्रेलिया,नेपाळ, दुबई आणि नेदरलँडस येथील २७ आंतरराष्ट्रीय मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले की, आयटीसीएक्स मध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र,नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण,मंदिर तंत्रज्ञान व्यवस्थापन व उत्पादने या विषयावर प्रदर्शन,शाश्‍वतता,निधी व्यवस्थापन,गर्दीचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांचा समावेश असेल.याशिवाय मंदिर व्यवस्थापनातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातील.चर्चासत्रातील महत्त्वाच्या विषयांमध्ये मंदिर सुरक्षा,आर्थिक व्यवस्थापन,आपत्ती व्यवस्थापन,गर्दी व्यवस्थापन,खरेदी धोरण,अग्नी सुरक्षा,पायाभूत सुविधा,माहिती तंत्रज्ञान,बौध्दिक संपदा अशा अनेक विषयांचा समावेश असून मंदिर व्यवस्थापनातील प्रतिनिधी,विश्‍वस्त,मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद साधणार आहेत.  

Powered By Sangraha 9.0