आंदोलक कुस्तीपटू सरकारी नोकरीत रूजू; आंदोलन सुरूच असल्याचा दावा

05 Jun 2023 19:14:37
The wrestler Protest Delhi

नवी दिल्ली
: लैंगिक शोषणाच्या कथित प्रकरणावरून आंदोलन करणारे बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक हे आपापल्या सरकरी नोकऱ्यांमध्ये रूजू झाले आहेत. त्याचवेळी अद्याप आंदोलन मागे घेतले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्याविरोधात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या तीन कुस्तीपटूंनी आंदोलनास सुरूवात केली होती. या कुस्तीपटूंनी शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर सोमवारी या तिघा खेळाडूंनी आपापल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये पुन्हा रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याविषयी कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाल्या की, न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मात्र, आंदोलनासोबतच रेल्वे खात्यातील जबाबदारीदेखील पुन्हा हाती घेतली आहे. यापुढे आंदोलनाची दिशा कशी असेल, त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही धरणे आंदोलन थांबविले असल्यानेच पुन्हा नोकरीत रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये आम्ही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले.

Powered By Sangraha 9.0