राजीनामा नव्हे तर जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे !; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

05 Jun 2023 16:08:12
Balasore Railway Accident Ashwini Vaishnav

नवी दिल्ली/ पार्थ कपोले
: ओदिशामधील बालासोर येथे अपघाताच्या ५१ तासांनी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अपघातानंतर राजकारण बाजूला ठेवून मदतकार्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे अपघातानंतर राजीनामा देण्यापेक्षाही घटनास्थळी थांबून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन मार्ग काढणे आवश्यक असल्याचा वस्तुपाठ देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवून दिला आहे.

बालासोर येथे झालेल्या भयानक अपघातामध्ये २५० हून अधिक बळी गेले तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या विचित्र अपघातामुळे संपूर्ण देशास धक्का बसला होता. विशेषत: गेल्या ९ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रेल्वेचा सर्वांगीण कालापालट करण्यात प्राधान्य दिले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर, सिग्नलिंग व्यवस्थेचे अद्यतनीकरण, रेल्वेमार्गांमध्ये सुधारणा, रेल्वेच्या टकरी रोखण्यासाठी ‘कवच तंत्रज्ञान’ यामुळे भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र सुधारण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अपघात अधिक धक्कादायक होता. अर्थात, अपघातानंतर काही तासातच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंकमुळे हा अपघात झाल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यानंतर पुढील चौकशीसदेखील प्रारंभ झाला आहे.

अपघातानंतर भारतीय राजकीय पद्धतीप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करून राजकारणास प्रारंभ झाला होता. त्याचवेळी अपघातानंतर काही तासातच केंद्रीय मंत्री वैष्णव हे घटनास्थळी पोहोचले होते. विशेष म्हणजे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी वातानुकूलीत खोलीत बसून अधिकाऱ्यांसोबत केवळ बैठकाच घेतल्या नाही तर ते प्रत्यक्ष अपघातस्थळी जवळपास ५० तास हजर होते. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांशी सातत्याने संपर्कात राहणे, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देणे आणि मदतकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांसोबत रात्रभर घटनास्थळी थांबणे असा रेल्वेमंत्र्यांचा नवा चेहेरा यानिमित्ताने पाहण्यास मिळाला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी अधिकारी असलेल्या वैष्णव यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ यावेळी झाला आहे. त्यामुळेच त्यांनी घटनास्थळी असलेल्या सर्व यंत्रणांशी कुशलतेने समन्वय साधून अपघातानंतर काही तासातच अपघाताचे कारण समजणे, मदतकार्य करणे आणि रेल्वे वाहतून सुरळीत करणे शक्य झाले आहे.

जबाबदारी अद्याप संपलेली नाही

बालासोर अपघातानंतर ५१ तासांनी रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. रेल्वेमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याची माहिती दिली. अर्थात, जोपर्यंत अपघातामध्ये बेपत्ता झालेल्या प्रवाशांनी त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविले जात नाही, तोपर्यंत आमची जबाबदारी संपलेली नाही; अशी संवेदनशीलताही त्यांनी दाखविली आहे. विशेष म्हणजे अपघाताविषयी कोणत्याही प्रकारची राजकीय कारणे न देताही समस्या सोडविता येते हे यानिमित्ताने दिसून आले आहे.


Powered By Sangraha 9.0