नारी नही, नारायणी तू...

05 Jun 2023 22:20:39
Article On Adv Sunita Joshi

साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील मातृशक्ती म्हणून पनवेल शहरात ठसा उमटवणार्‍या अ‍ॅड. सुनीता श्रीकांत जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...

उत्तम लेखिका आणि कवी असलेल्या अ‍ॅड. सुनीता जोशी या रायगड कोकण साहित्य परिषदेच्या अध्यक्षही राहिल्या आहेत. ‘सरीवर सरी’, ‘बिच्चारी आई’, ‘फंटास्टिक, अस्सा नवरा तुझ्याचसाठी’, ‘जानकी’, ‘वारी अडगळ’, ‘थोडं जनातलं थोंड मनातलं’, ‘आयुर्वेद’, ‘गजल माझी’, ‘आठवणीतलं पनवेल’ अशी त्यांची एक ना अनेक दर्जेदार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. साहित्यक्षेत्रातील अनेक प्रकार त्यांनी लिलया हाताळले. ललित, काव्यसंग्रह, कथासंग्रह या साहित्य प्रकारातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. कवीमनाच्या सुनीता यांनी नुसतेच शब्दांचे जीवंत महल उभे केले नाहीत, तर ‘पारिजात प्रोपरायटर’च्या माध्यमातून बांधकाम विश्वातही आपले कर्तत्व सिद्ध केले. त्या पनवेल येथील ‘स्मृती डायनिंग’च्याही सर्वेसर्वा आहेत. ‘कै. एस. आर. जोशी मेमोरियल ट्रस्ट’च्या त्या संस्थापक-अध्यक्ष आहेतच; त्याशिवाय ‘इनरव्हिल क्लब’च्या पनवेल शहर अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. साहित्य, उद्योग आणि समाजकारणामध्ये अहोरात्र कार्यरत असणार्‍या सुनीता या आयकर विभागातून उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या. हे सर्व पाहिले की, सुनीता यांच्या कार्याची व्याप्ती सहज लक्षात यावी. त्याचबरोबर त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्वही डोळ्यासमोर उभे राहते.

दरवर्षी गरीब गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार्‍या सुनीता, वनवासी कल्याण आश्रमातल्या मुलांसाठी काही ना काही करण्याचा ध्यास असलेल्या सुनीता, कोरोना महामारीत ७०० कुटुंबीयांचे दायित्व स्वीकारणार्‍या सुनीता, कोरोना सेंटरमध्ये ‘क्वारंटाईन’ केलेल्या लोकांना दररोज न चुकता नाश्ता पुरवणार्‍या सुनीता, पनवेल शहर प्लास्टिक प्रदूषणातून मुक्त व्हावे, म्हणून स्वखर्चाने प्लास्टिक प्रदूषणाविरोधात प्लांट उभारणार्‍या सुनीता आणि तेवढ्यावरच न थांबता, प्रदूषणमुक्त पनवलेसाठी पनवेलच्या उच्चभ्रू आणि वस्तीपातळीवरही प्लास्टिक प्रदूषणमुक्तीविषयी जागरण करणार्‍या सुनीता! आरोग्य शिबीर, सामाजिक प्रश्नांवर जागृती शिबीर आयोजित करणार्‍या सुनीता... एक महिला स्वत:चे कर्तृत्वशील विश्व उभे करते, यामागची प्रेरणा काय असेल? सुनीता यांच्या आयुष्याचा मागोवा घेताना मात्र मनात उमटले ते संत तुकोबारायांचे वचन-

सुख पाहता जवापाडे।
दुःख पर्वताएवढे॥
खरंच आयुष्य म्हणजे सुखदुःखाची विण. अशा आयुष्यामध्येही सुखदुःखापल्याड जात मानवी संवेदना जपत इतरांचे अश्रू पुसणार्‍या देवदुर्लभ व्यक्तीही असतात. त्यापैकी एक अ‍ॅड. सुनीता श्रीकांत जोशी. मूळच्या सांगलीच्या रामचंद्र इनामदार आणि सुमती इनामदार यांना चार अपत्ये. त्यापैकी एक सुनीता. रामचंद्र हे सातारा येथील आयुर्वेदिकअर्कशाळेमध्ये काम करायचे. रामचंद्र आणि सुमती दोघेही पापभिरू आणि धार्मिक. रामचंद्र यांना वाचनाची प्रचंड आवड. कोणत्या वर्तमानपत्रातला कोणता अग्रलेख उत्तम आहे, यावर ते घरी चर्चा करत. त्यातूनच मग सुनीता यांना वाचनाची आवड लागली. पुढे कामानिमित्त इनामदार कुटुंब पनवेलला स्थायिक झाले. आयुष्य सुरळीतच सुरू होते. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्या नोकरी करू लागल्या. याच काळात श्रीकांत जोशी यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर सुनीता यांना आयकर विभागामध्ये क्लर्क म्हणून नोकरी लागली. श्रीकांत आणि सुनीता यांना दोन मूलं झाली. पुढे घर आणि नोकरी सांभाळत सुनीता यांनी कायद्याची पदवी घेतली आणि त्या ‘अ‍ॅडव्होकेट सुनीता’ झाल्या.

त्याचकाळात सुनीता यांनी डॉ. स्वामी माधवन यांच्याकडून अनुग्रह घेतला. दिवस असे उगवत आणि मावळत. पण, या सगळ्या धकाधकीमध्ये श्रीकांत यांना मधुमेहाने गाठले. एक पाय काढावा लागला. मात्र, आयुष्यातले दुःख विसरत पुढेच चालायचे, हे सुनीता यांनी ठरवलेले. नव्हे नव्हे, देवाने त्यांना संकेतच दिला की, तुला दुःखाशी लढायचे आहे आणि जिंकायचे आहे, तुला स्वतःचे दुःख वेदना बाजूला सारत दुसर्‍यांच्या सुखासाठी कार्य करायचे आहे. त्यामुळेच अभियंता असणारा मुलगा वयाच्या २२व्या वर्षी ‘ब्लड कॅन्सर’ने मृत्यू पावला. हे दुःख मोठे होते. पण, सुनीता यांनी ते दुःख पचवले. पुढे काही वर्षांनी त्यांच्या दुसर्‍या २८ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू पावला आणि त्याच्या मृत्यूनंतर एका महिन्याने सुनीता यांचे पतीही देवाघरी गेले. भयंकर! कुणाच्याच आयुष्यात येऊ नये, असे भयंकर दुःख सुनीता यांच्या वाट्याला आले. मात्र, सुनीता यांनी त्या दुःखाचा बाऊ केला नाही. दुःखाने काळीज चिरून गेले, मन फाटून गेले. पण, सुनीता यांनी कर्तव्यपथ सोडले नाही.

कारण, पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अर्धवट राहिलेली व्यावसायिक कामे पूर्णत्वास नेणे गरजेचे होते. काही बांधकाम प्रकल्प अर्धवट अवस्थेत होते, तर काहींसाठी कर्ज घेतलेले होते. हे सगळे व्यवहार पूर्ण करणे गरजेचे होते. सुनीता यांनी हे सगळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी नियोजन केले. पतीच्या पश्चात त्यांच्या नावाने असलेल्या कोणताही व्यावसायिक करार अर्धवट राहू नये, यासाठी त्यांनी काळ-काम-वेगाचे गणितही तोडले. संतांचे वचनच आहे की, ‘आता उरलो उपकारापुरता’ तसे सुनीता आयुष्य व्यतीत करत आहेत. पतीच्या व्यवसायातून होणारे अर्थार्जन आणि स्वतःच्या पेन्शनचा काही भाग त्या सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणतात. अशा या अ‍ॅड. सुनीता जोशी यांच्यासारख्या मातृशक्तीच्या विचारकार्याला पाहिले की वाटते, ‘नारी नही, नारायणी तू!’

Powered By Sangraha 9.0