मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातानंतर कार नाल्यात कोसळली

04 Jun 2023 08:07:40
Mumbai-Nashik Highway Accident

ठाणे
: मुंबई - नाशिक महामार्गावर रिक्षा नाल्यात कोसळुन जिवीतहानी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एक कार नाल्यात कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. रुस्तमजी अग्निशमन केंद्राजवळील अर्बानिया सोसायटी समोर भरधाव ट्रकची धडक बसुन कार थेट नाल्यात कोसळली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने कार चालक सतिश सदानंद विचारे (४५) यांचा जीव वाचवण्यात अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले.

घोडबंदर रोड ,वाघबीळ येथे राहणार विचारे शनिवारी आपल्या चारचाकी वाहनाने नाशिक -मुंबई महामार्गाने पनवेलवरून ठाण्याकडे येत होते.तेव्हा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकची त्यांच्या कारला धडक बसली. वेगाने बसलेल्या धडकेने कार थेट बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली. कार सोबतच चालक सतीश विचारे कारमध्ये नाल्यात अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत कार चालक विचारे यांना बाहेर काढण्यात यश मिळवले.नंतर क्रेनच्या सहाय्याने नाल्यात पडलेली कार बाहेर काढली. या अपघातात चालक सतीश विचारे यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढल्याने त्यांना कसलीही दुखापत झालेली नसून कारचे मात्र नुकसान झाले आहे.दरम्यान, दोनच दिवसापुर्वी मुंबई - नाशिक महामार्गावर टिटवाळा येथील रिक्षा थेट नाल्यात कोसळुन तीनजण ठार तर चारजण जखमी झाले होते.

Powered By Sangraha 9.0