राष्ट्राय स्वाहा, इदं न मम् - ३३ वर्षांचे अविनाशी राष्ट्रकार्य!

04 Jun 2023 23:00:39
Article On Madhav Sadashiv Golwalkar

५ जून १९७३. ३३ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून सांभाळलेली जबाबदारी पूर्ण पार पाडून ते मुक्त झाले. स्वतःच्या हाताने स्वतःचे श्राद्ध घातलेला संन्यासी राष्ट्रकार्याची मोठी शिदोरी मागे सोडून पुढच्या प्रवासाला निघाला. नागपूरच्या गोळवलकरांच्या घरी दि. १९ फेब्रुवारी, १९०६ साली पहाटे रायकर वाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गुरूजी यांचा जन्म झाला. नागपूर येथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यावर बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. परिस्थितीमुळे तिथेच प्राणिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि माधव सदाशिव गोळवलकर, गोळवलकर गुरूजी झाले.

तेव्हाच रामकृष्ण मिशनच्या संपर्कात आले. बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे निकटवर्ती भय्याजी दाणी यांनी सुरू केलेल्या शाखेपासून गुरूजी संघाच्या संपर्कात आले आणि संघाचे झाले, ते कायमचेच. १९३३ मध्ये जेव्हा बनारस हिंदू विद्यापीठात त्यांची तीन वर्षांसाठी प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली त्यावेळी मदन मोहन मालवीय यांच्यासोबत डॉ. हेडगेवारही त्यांना भेटले होते. तिथेच डॉक्टरांनी गुरूजींना संघकार्यात सहभागी करून घेण्याचे ठरवले. पुढे त्यांनी १९३५ साली कायद्याची पदवी घेतली. हिंदू विद्यापीठात कार्यकाळ संपल्यानंतर सरगाची येथे साधनेसाठी गेले. रामकृष्ण मिशनच्या स्वामी अखंडानंदांकडून त्यांनी दीक्षा घेतली. यानंतर काही दिवसातच स्वामीजी समाधीस्थ झाले. गुरूंच्या जाण्याने समाधी घेण्याचा विचार करू लागलेले गुरुजी डॉक्टरांच्या संपर्कात आले आणि राष्ट्रकार्यात आयुष्य झोकून देत स्वामीजींचा ‘राष्ट्र देवो भव।‘ हा मंत्र जपण्याचा निश्चय केला.

कित्येक वर्ष ते डॉक्टरांची सावली बनून राहिले. १९४१ साली त्यांच्या निधनानंतर डॉक्टरांच्या इच्छेनुसार, माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी अवघ्या ३४व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. त्यानंतर तब्बल ३३ वर्ष त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. या काळात संघावर अनेक आघात झाले. भारताची फाळणी, महात्मा गांधींची हत्या, संघबंदी आणि काय काय. परंतु या सगळ्या विरोधी वातावरणात प्रत्येक स्वयंसेवकाची प्रेरणा, आधार बनत त्यांनी डॉक्टरांच्या कार्याला वाढवले. संघावरील प्रत्येक आघात सोसत संघ तावून सुलाखून निघाला तो गुरुजींच्या भक्कम आधारामुळे. गुरूजी कार्यकर्त्यांना सांगत, हे जीवन नावाचे इंद्रियग्राम फार बलवान आहे. थोडे दक्ष रहा. अव्यवस्थित चित्त हे शापासमान आहे. संस्कारित व्हा. टीकाकार त्यांचा प्रतिवाद करू पाहात. त्यावर गुरूजी म्हणत, राष्ट्र हे मानवाकुलाचे एक स्वाभाविक परिमाण आहे... अगदी एकाकी व्यक्ती ही शून्यवत आहे. माणूस जन्माला येतो तो घरात. लहानाचा मोठा होतो तो गावात. तो वाढत राहतो तो समाजात. या समाजाचे परिणत रूप म्हणजे राष्ट्र. राष्ट्रावर असणारे जीवनमूल्यांचे आकाश म्हणजे धर्म. या आभाळात कधी धूळवादळ होईल, पालापाचोळा उडेल, कधी ढग जमा होतील. पण, शेवटी ते निरभ्र होईल. हिंदुत्वाच्या गगनाखाली असणारे राष्ट्र ते हिंदूराष्ट्र.

अखेर संघाचा वाईट काळ, वनवास संपला. गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली संघ हळूहळू सर्व क्षेत्रांमध्ये उतरून समाजाला एकसंध करू लागला. परंतु आता मात्र गुरूजी थकले होते. सततच्या आजारपणाने शरीर जीर्ण होऊ लागले होते. त्यातच कर्करोगासारख्या आजाराने विळखा घातला होता. ३३ वर्ष अविरत राष्ट्रकार्य करून थकलेला जीव शेवटी दि. ५ जून, १९७३ रोजी मावळला. गुरूजींच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी पसरली आणि जवळपास तीन लाखांहून अधिक लोक अंत्यदर्शनासाठी धावून आले. त्यांनी जाण्यापूर्वी स्वयंसेवकांना उद्देशून दोन ऐतिहासिक पत्र लिहिली होती. या पत्रांचे अंतयात्रेपूर्वी जाहीर वाचन करण्यात आले होते. यातील एका पत्रात गुरूजींनी सर्व स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितली आहे. आपल्यात असणार्‍या स्वभावदोषामुळे कार्यकर्त्यांना त्रास झाला असेल. त्यासाठी हात जोडून क्षमा मागतो, असे ते म्हणतात. यासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेतला. अभंग आहे-

शेवटची विनवणी, संतजनी परिसावी
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित
तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची
हाच अभंग नागपूर, रेशीमबागेतील त्यांच्या समाधीवर गरूजींच्याच हस्ताक्षरात लिहिलेला आहे. ३४व्या वर्षी घेतलेली जबाबदारी ३३ वर्षे उत्तमरित्या पार पाडत एका देशव्यापी संघटनेचे यशस्वी नेतृत्व करत जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठ घालून दिला. कदाचित म्हणूनच सदस्य नसतानाही भारतीय संसद आणि अनेक विधिमंडळांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अशा या संन्याशाने दाखवलेल्या मार्गावर चालत अविनाशी असे राष्ट्रकार्य अविरत चालू आहे, चालू राहणार आहे.

Powered By Sangraha 9.0