आयुष्याचा सुगंध वेचणारी जया

    04-Jun-2023   
Total Views |
Article On Jaya Patil Palghar

प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक आयुष्य उभी करणार्‍या अर्धशिक्षित निराधार पण खंबीर स्त्रीविषयी. ही कहाणी आहे जया पाटील हिची...

स्त्रीची ओळख म्हणजे कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातले काळे मणी, इतकीच. परकर्‍या मुलींना ओळख नव्हतीच. भावा बहिणींचं लेंढार सांभाळण्यात बालपण जाई. त्याकाळातली ही गोष्ट आहे. उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात अर्नाळानजीक आगाशी गावातील तिचा जन्म. हिरुबाईच्या पोटी जन्माला आलेली ही पहिली मुलगी. पण मुलांचं कौतुक कुठे व्हायचं? मुलं म्हणजे ईश्वराची देणगी. ईश्वर प्रसन्न होई तेवढी मुलं होत. हिच्यामागे अजून पाच बहिणी झाल्या. त्यानंतर मुलगा. परंपरागत घरचा फुलांचा व्यवसाय, रडणारी तोंडं वाढली तशी जयाची शाळा सुटली. चौथीतून जया दप्तराची पिशवी घेऊन बाहेर पडली ती स्वतःच्या वजनापेक्षा जास्त ओझं घेऊन टोपलं घेऊन बाजारात जाऊन बसली. गुलछडीचे हार, गोंड्याच्या माळा, अ‍ॅस्टर फुलांचे मुंडासे, गुलाबाचे गुच्छ, मोगरा, जाईचे गाजरे, चाफ्याच्या/जुई-अबोलीच्या कलाबूत घातलेल्या वेण्या असा सगळा सुगंधी ऐवज तिच्या टोपल्यात असायचा.

दुपारी सूर्य डोक्यावर येईस्तोवर विक्री करायची, देवाचं नाव घेत सुगंधाचा सौदा करायचा आणि मिळतील तेवढ्या नोटा, नाणी फडक्यात बांधून कमरेच्या परकराला घट्ट खोवून ठेवायची. येताना टोपलं हलकं झालेलं, तेव्हा नाक्यावरच्या देढियाच्या दुकानातून तेल मीठ तांदूळ दिवसापुरतंच घरी घेऊन जायचं. तिच्या वाटेकडे कित्येक डोळे लागलेले असायचे. तिचं पाऊल घरात पडत नाही तोवर चुलीवर भाताचं आधण चढायचं नाही. एवढं करूनही शिव्यांची लाखोली काही चुकायची नाही. बापाला दारूसाठी केवळ पैसे देऊन भागायचं नाही. गावकुसावरील देशी दारूच्या कट्ट्यावर हातात तांब्या घेऊन त्या बेवड्यांच्या रांगेत उभं राहावं लागायचं. ती तेवढी टाकभर दारू घशात गेली की कुठे वडील शांत व्हायचे. हळूहळू सगळ्याच बहिणी बाजार करू लागल्या, घरात एकवेळचे जेवणाची ददात गेली पण लग्नाची वयं उलटून चालली तरी स्थळं येईनात.

इतकी मेहनत करूनही समाजव्यवस्था काहींना धड जगू देत नाही. या कुटुंबाला गावाने वाळीत टाकलं होतं. जयाची आई भूती आहे आणि तिला कुणाचा राग आला, तर त्या कुटुंबाचा ती विध्वंस करेल, अशी ठाम समजूत. अर्थात मुलींची लग्न मिळेल तशा घरात, दूरच्या गावी करून द्यावी लागली. जया लग्न करून वरोर या खेडेगावी नारायण पाटीलांच्या घरात येऊन पडली. खेडेगाव असल्याने बाजारही सुटला आणि रोजीही थांबली. दोन मुली झाल्या आणि पाच वर्षांत रेल्वे अपघातात पतीचं सोनं झालं. मुलींना घेऊन जया धाकट्या भावाच्या आधाराला माहेरी येऊन राहिली. फुलांची टोपली परत डोक्यावर आली. आता पुन्हा माहेरच्या कुटुंबासोबत दोन मुलीसुद्धा पदरात होत्या. भावाची आश्रित होती म्हणून घरची फूलं आता आपली नाहीत. पण, घरातल्या सर्वांना पोसण्याची जबाबदारी मात्र आपलीच, हे तत्व अंगीकारून पुन्हा ओढाताण सुरू झाली. मुलींना शाळेत घालायला पैसे नव्हते, पुस्तकं गणवेश दूरच्या गोष्टी. पण हे सर्व करताना मुलींवर संस्कार मात्र केले.

जया इयत्ता चौथी शिकली असली तरी तिला वाचनाचा छंद आहे. गुरुचरित्र, तसेच इतर धार्मिक ग्रंथांचं वाचन ती नियमितपणे करते. आजही वयाच्या ८२ व्या वर्षी ती बाजार करते आणि घरी येताना टोपलीत रोजच वृत्तपत्र असतं. गावात घडणार्‍या घडामोडींपासून ते जुन्या काळातील आठवणी सांगताना ती अगदी रंगून जाते. तिची आजी औषधी बटवा घेऊन रुग्ण पाहायला जायची, त्यामुळे विविध झाडापानांची माहितीही तिला आहे. मात्र, तुला काय आवडत हा प्रश्न विचारल्यावर आजही ती निरुत्तर होते! तिला तिची आवड माहितीच नाहीये. मुलींची लग्न झाली तास भावाचा आधार तिने सोडला. एका चाळीत एक खोली घेऊन आजतागायत राहते. एकटी. कितीतरीवेळा वाटतं, या माणसांचे आयुष्य ते काय? कुणासाठी जगावं? कशासाठी जगावं? यांची सुख काय आणि आयुष्याकडून अपेक्षा काय?

जया सुग्रण आहे. आज थकली तरी नातवंड, नातेवाईकांचा गोतावळा तिच्यापाशी जमतो. सगळ्यांचं जेवण तिने एकटीने करावं असा सगळ्यांचा आग्रह, तिच्या हातचं खाऊन पानात शिल्लक टाकून कोणी उठत नाही. उठूच शकत नाही. जया ना मोठी व्यावसायिक झाली, ना खर्‍या अर्थाने गृहिणी झाली. सगळ्या जबाबदार्‍या पार पडल्या. मुलगी, बहीण, पत्नी, आई अगदी सगळ्या. एकहाती 12 तोंडांचं कुटुंब चालवलं, फुलांच्या सहवासात आयुष्य घालवलं पण एकही फूलं केव्हा केसात माळलं नाही. तिचं आईपण, बाईपण समृद्ध करणारा हा जन्म ती कृतज्ञतेनेच जगतेय. अजूनही. माणसात उल्लेखनीय काय असतं? त्याच यश? त्याचे गुण? आणि मग, स्वतः अलिप्त राहून अनेक आयुष्य घडवण्याचं त्याचं कार्य? त्याला काय म्हणावं? तिचा स्त्रीजन्म तिने सार्थकी लावल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे तिचं अभिनंदन!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.