पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ‘वनवार्ता’

04 Jun 2023 20:50:41
Sudhir Mungantiwar

मुंबई
: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८.४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पद्धतीने पर्यावरणविषयक बाबींची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देणार आहेत.

एकविसाव्या शतकात जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, अवकाळी होणारा पाऊस, दुष्काळ यासारख्या मोठ्या समस्यांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या या समस्या सोडविणे हे काम कुठल्याही एका विभागाचे अथवा समूहाचे नसून त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे, असे वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले. त्यादृष्टीने जनसामान्यांना पर्यावरण विषयक असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी दिली.

वननिती नुसार, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी मंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या ५० कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये लोकसहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वनाच्छादन, मॅन्युव्ह इत्यादींच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.

“वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून वनांविषयी कुतूहल, गंमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्त्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मंत्री मुनगंटीवार माहिती देणार आहेत.

आकाशवाणीवर केव्हा कार्यक्रम सुरु होणार?

०५ जून २०२३ रोजी सकाळी ८:४० वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम १५ मिनिटांचा असून पुढील सत्रांचे नियोजन ४ महिन्यांकरिता दर १५ दिवसांनी रविवारी सकाळी ७:२५ वाजता आकाशवाणी वरुन प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे वने व सामान्य नागरिक यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होणार आहे.

Powered By Sangraha 9.0