स्पेनमधील महिला हक्क

30 Jun 2023 20:43:51
Spain Government Womens Rights

स्त्री किंवा पुरुष किंवा तृतीयपंथी या परिक्षेपात मानवाच्या मूलभूत गरजा आणि हक्क काय असायला हवेत, यावर जगभरात मतभिन्नता आहेच. अफगाणिस्तानसारख्या देशामध्ये मुलीबाळींना माध्यमिक शिक्षणासाठीही जीवाचा आकांत करावा लागतो. माणूस म्हणून मोकळा श्वास घ्यायलाही संघर्ष घ्यावा लागत आहे, तर अमेरिकेमधील अनेक राज्यांना, इटली वगैरे सारख्या पाश्चात्य देशातील महिलांना गर्भपाताच्या हक्कासाठी लढावे लागते, तर आफ्रिकेच्या आणि आशिया देशातील काही महिलांना सक्तीने केल्या जाणार्‍या खतना पद्धतीविरोधात आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनाचे विषय वेगळे आहेत, पण त्या त्या महिलांसाठीचे ते विषय महत्त्वाचे आहेत. या पाश्वर्र्भूमीवर स्पेनमधील महिलांनी काही वर्षे एका हक्कासाठी आंदोलन सुरू केले होते.

कोणत्या हक्कासाठी स्पेनमधील महिलांनी आंदोलन केले असेल? तर सार्वजनिक तरणतलावामध्ये, सार्वजनिक ठिकाणी पुरुष ज्याप्रमाणे टॉपलेस म्हणजे शरीराच्या कंबरेवरील भागावर कोणतेही कपडे न घालता पोहू शकतो, भिजू शकतो तोच हक्क महिलांनाही मिळावा. कालपरवाच स्पेनमध्ये महिलांना हा अधिकार मिळाला. या हक्काची भूमिका मांडताना या आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे होते की, ”पुरुष आणि महिला समान आहेत. मग पुरुष टॉपलेस राहू शकतो, तर महिला का नाही?” समानता कुठे आणि कशी तसेच कशासाठी, यावर विचार करता स्पेनच्या महिलांचे हे आंदोलन आणि त्यांनी प्राप्त केलेला अधिकार याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. कारण, समानता कोणत्या तत्वासाठी आणि त्याने काय साध्य होणार, हा मुद्दा इथे दुय्यम. अर्थात, पुरुष दारू पितात किंवा सिगारेट ओढतात, त्यांच्याबरोबर समानतेच्या पातळीवर दिसावे म्हणूनही अनेक महिलांना अशी व्यसनं करताना पाहिलेलेही आहे. पण, पुरुषांच्याबरोबरीने त्यांच्यासारखे व्यसन करणे म्हणजे जर स्त्री-पुरुष समानता असेल, तर मग या समानतेच्या गृहितकावरही आक्षेपच असायला हवा.

असो. तर स्पेनमध्ये आधीपासून कायद्याने प्रत्येक नागरिकाचा त्याच्या शरीरावर अधिकार आहे. त्याच्या शरीराचे तो काही का करेना तो त्याचा अधिकार. जसे आपल्या भारतात बेगडी अवास्तव तर्कहिन मानवतावाद, पुरोगामित्व कुरवाळणारे काही लोक आहेत तसेच काही लोक स्पेनमध्येसुद्धा आहेतच. ‘माझे शरीर माझा अधिकार’ हा कायदा आहे, तर मग स्पेनमधील महिलांना तरण तलावासारख्या ठिकाणी कोणते कपडे घालावेत यासाठी नियमावली का? या मतानुसार मग स्पेनमधील महिलांनी तरणतलावासारख्या ठिकाणी टॉपलेस पोहण्याचा आणि भिजण्याचा कायदेशीर अधिकार असावा, अशी मांडणी सुरू केली. बघता बघता, यासाठी जनआंदोलन सुरू झाली. कुणाचे काय आणि कुणाचे काय! मात्र, या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्याच वर्षी स्पेनमध्ये बलात्काराविरोधात पारित झालेला कायदा आणि त्यानुसार घडलेल्या घडामोडींचा परामर्श घ्यायलाच हवा.

स्पेनमध्ये ऑक्टोबर २०२२ साली बलात्काराविरोधातील कायद्यामध्ये सुधारणा केली गेली. त्याचे नावच होते ‘येस मिन्स येस.’ याचा अर्थ असा होता की, कुणाचीही संमती असल्याशिवाय त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच. पण, तो कायदा पारित झाल्यानंतर पुढे दि. ३१ मार्चपर्यंत ९७८ बलात्काराच्या गुन्ह्याखाली सजा भोगत असलेल्या ९७८ कैदींची सजा कमी झाली, तर १०४ तुरुंगातून सुटलेही. कारण, या गुन्हेगारांच्या वकिलांनी न्यायालयाला पटवून दिले की, बलात्कार झाला नव्हता, तर जे काही झाले ते सहमतीने झाले. कायद्याचा वापर करत इतके कैदी सुटले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कैद्यांची सजा कमी झाली, हे पाहून या कायद्याविरोधात स्पेनमध्ये आंदोलन सुरू झाली.

या आंदोलनाची व्याप्ती इतकी होती की, स्पेनच्या तत्कालीन पंतप्रधानांना पेड्रो सांचेज यांना हा कायदा पारित केला म्हणून माफी मागावी लागली. त्यांनी जनतेला ग्वाही दिली की, या कायद्याचा आधार घेत जे अपराधी सुटले किंवा ज्यांची सजा कमी झाली, त्यांच्यावर पुन्हा कारवाई केली जाईल. असो, तर तरणतलावामध्ये ‘टॉपलेस’ होण्याचा अधिकार मिळवणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच घरेलू हिंसा, बलात्कार, अपहरण हे सगळे प्रश्नही आहेतच. हे सगळे प्रश्न ना ‘टॉपलेस’ होऊन सुटणार ना अंगभर कपडे घालून सुटणार. संस्काराने येणारी समरस मानवतावादी दृष्टीच जगभरातल्या माणसाला समानतेचा मार्ग दाखवू शकते. स्पेन काही त्यापासून वेगळा नाहीच!

९५९४९६९६३८


Powered By Sangraha 9.0