सुवर्ण मंदिराजवळ ४ बॉम्ब ; अफवा पसरवल्याप्रकरणी निहंगला अटक!

03 Jun 2023 12:43:55
punjab-police-alert-operation-blue-star-bomb-in-harmandir-sahib-nihang-arrested
 
नवी दिल्ली : ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंजाबमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलीस ठिकठिकाणी फ्लॅग मार्च काढत आहेत. दरम्यान, अमृतसर पोलिस नियंत्रण कक्षाला मध्यरात्री सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ चार बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेच पोलिस दहा बॉम्ब निकामी पथके घेऊन श्री हरमंदिराच्या आजूबाजूला जाऊन तपासणी करू लागले. मात्र कुठेही बॉम्ब सापडला नाही.

यानंतर पोलिसांच्या सायबर टीमने पोलिस नियंत्रण कक्षात माहिती देणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक तपासला, तेव्हा तो २० वर्षीय निहंगचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खोटी माहिती दिल्याप्रकरणी २० वर्षीय निहंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यासोबतच काही मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गैरकृत्य करताना आरोपींनी नियंत्रण कक्षात ही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या दहशतवादी जर्नेल से भिंद्रनवालेविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर १ जून १९८४ ते ८ जून १९८४ या काळात लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार चालवले. त्यानंतर पाच महिन्यांनंतर, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली.

ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील प्रत्येक शहरात पोलीस फ्लॅग मार्च काढत आहेत. बॅरिकेडिंग करून सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एवढेच नाही तर ड्रोनच्या माध्यमातून प्रमुख इमारतींवर नजर ठेवली जात आहे. यासाठी संशयितांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे.

 
Powered By Sangraha 9.0