आषाढी एकादशीनिमित्त अभंग चित्र वारी प्रदर्शन संपन्न

29 Jun 2023 17:34:36
Ashadhi Ekadashi Artistic Approach

तळमावले
: आषाढी एकादशीचे औचित्य साधत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंग आणि त्याला साजेसे पोस्टर्स पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डॉ. संदीप डाकवे यांनी तयार केली होती. या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांनी आपला प्रदर्शन भरवण्याचा संकल्प पूर्ण केला. परिसरातील वारकरी यांनी या अभंग चित्र वारी उपक्रमाचे कौतुक केले. दररोज रेखाटलेले अभंग आणि त्या सर्व अभंगांचे आषाढी एकादशी दिवशी प्रदर्शन असा अनोखा योग डॉ.संदीप डाकवे यांनी साधला आहे.

बारा इंच बाय अठरा इंच आकाराच्या विविध प्रकारच्या रंगीत कागदावर स्केच पेन, पोस्टर रंग यांच्या माध्यमातून अभंगांच्या ओळी लिहल्या होती. त्याला साजेशी अशी चित्रे व सुंदर चित्रे तयार केली होती. विशेष म्हणजे या पोस्टरवर खाली रोजची दिनांक तिथी तसेच ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालखीच्या मुक्कामाची ठिकाणे, उभे, गोल रिंगण इ.ची माहिती सुंदर अक्षरात लिहली होती.

डॉ.संदीप डाकवे हे गेले काही वर्षापासून आषाढी वारीचे औचित्य साधून एक वेगळा, नावीण्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी डॉ.डाकवे यांनी एका पानावर हरिपाठ लेखन, टी शर्टवर विठूरायाचे चित्र, मोरपिसावर संत तुकाराम, १६ फुट बाय २ फुट आकाराच्या पोस्टरातून शुभेच्छा, घराच्या भिंतीवर १४ फूट बाय ६ फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, शब्दांच्या वेलबुट्टीतून विठूराय आदी कलात्मक उपक्रम राबवले आहेत. डॉ.संदीप डाकवे यांनी यंदा साकारलेल्या अभंग चित्र वारी उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



Powered By Sangraha 9.0