मुंबईत दिवसभरात वृक्ष कोसळून दोन युवकांचा मृत्यु

28 Jun 2023 18:59:18
Mumbai Suburbs malad Falling Tree

मुंबई
: दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून बुधवार दिनांक २८ जून रोजी मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कौशल महेंद्र दोषी (वय ३८)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार सकाळपासूनच मुंबईत पावसाची रिमझिम सुरु असून मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरातील मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंचीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. यावेळी झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल या ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबईत वृक्ष कोसळून मृत्यु झाल्याची दुसरी दुर्घटना गोरेगाव येथे घडली असून यात एका युवकाला जीव गमवावा लागला. गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात मुसळधार पावसामुळे वृक्ष घरावर कोसळल्याची दुर्घटना घडून यात एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव प्रेमलाल निर्मल असे असून शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या प्रार्थना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

Powered By Sangraha 9.0