'वंदे भारत एक्सप्रेस'मुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

28 Jun 2023 15:50:41
Margaon Goa Mumbai Vande Bharat Express Arrived At CSMT

मुंबई
: मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २७ जून रोजी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर सायंकाळी वंदेभारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन झाले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे लोको पायलट व प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मिठाई आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार यामिनी जाधव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, मुंबई विभागाचे महाप्रबंधक रजनीश गोयल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल. तसेच, वंदे भारत एक्सप्रेसमुळे विविध आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून कोकणवासीयांचा प्रवास सुलभ होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. वंदे भारत एक्स्प्रेस देशात निर्मित असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यास मदत करणारी आहे.

तसेच, राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे ते यावेळी म्हणाले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारच्या साहाय्याने बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0