पंढरीच्या वारीचे सामाजिक आणि राजकीय अंतरंग...

28 Jun 2023 21:48:24
Interview of Dr Varda Sambhus

‘आषाढी पर्वकाळ एकादशी दिन। हरि जागरण देवा प्रिय॥ निराहारे व्रत जो करी आवडी। मोक्ष परवडी त्याचे घरी॥’ असा हा आषाढीचा महिमा. आज आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरी वारकर्‍यांचा अफाट भक्तिसागर उफाळून येतो. विठ्ठल-रुक्मिणीच्या मनोभावे दर्शनाने वारीचा प्रवास सुफळ संपन्न होतो. अशा या वारीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून तो अभ्यासाचा, संशोधनाचा विषयही आहेच. ‘राज्यशास्त्र’ हा विषय घेऊन ‘पीएच.डी’ करताना ‘वारीतील भक्तिमार्ग’ हा अभ्यासाचा विषय म्हणून निवडणारी अशीच एक मराठमोळी लेखिका म्हणजे डॉ. वरदा संभूस. ‘वारी पिलग्रिमेज : भक्ती, बीईंग अ‍ॅण्ड बियाँड’ हे त्यांचे वारीचे सामाजिक आणि राजकीय अंतरंग उलगडणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने डॉ. वरदा संभूस यांची वारीचे विविध परिचित-अपरिचित पैलू उलगडणारी ही विशेष मुलाखत...

राज्यशास्त्रात ‘पीएच.डी’ करताना त्यासाठी या शाखेतील मुख्य प्रवाहातील विषयांची निवड करण्यापेक्षा ‘वारी’ हा सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक विषय का निवडावासा वाटला?

माझा ‘एमफील’चा विषय म्हणजे खरंतर ‘पीएच.डी’ची पायाभरणी होती. ’भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म यांचा तौलनिक अभ्यास - राजारामशास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे आणि इतिहासाचार्य वि. का राजवाडे यांनी केलेले प्रतिपादन.’ खरं तर महाराष्ट्रात सतत एक वाद उपस्थित होतो, तो म्हणजे वारकरी-धारकरी वाद. हा जरी धार्मिक क्षेत्रातीलवादाचा विषय असला तरीही त्याला राजकीय क्षेत्रातहीचेहरा आहे. त्याला जातीचं आवरण आहे तसं संत- परंपरांचं वेष्टन आहे. १९व्या शतकात किंवा २०व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र धर्माची संकल्पना आकार घेत होती. परंतु, या सर्व प्रकारावर या तिघांची परस्परविरोधी मते विचारात घेऊन, सैद्धांतिक स्तरावर वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचा अभ्यास करायचा ठरवलं. ‘महाराष्ट्र धर्म’ म्हटल्यावर समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, ज्याला पुढे ‘धारकरी संप्रदाय’ म्हंटलं गेलं, त्याचा अभ्यास करायची संधी मिळाली. मराठी संस्कृतीत भक्तीचे स्थान काय? आजही या भक्तिमार्गाचा अवलंब केला जातो, तर त्याकाळात संतांनी केलेलं काम किती महत्त्वाचे होतं, हे लक्षात येईल. सध्या ‘राष्ट्रीय चळवळीतील कीर्तन या माध्यमाचं योगदान’ असाही अभ्यास करते आहे. आपल्याकडे पूर्ण उपनिषदांत भक्तीवर बरच लिहीलं गेलं. पण, या भक्तीच्या माध्यमांचा अभ्यास झालेला नाही. आपण भक्ती हा वैयक्तिक मार्ग मानतो, पण ती सामाजिक आहे. वारी सामुदायिक आहे. लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. मग त्यांच्यात संवाद काय असतो? दरवर्षी का एकत्र येतात? आपल्याकडे इतर यात्रा आयुष्याच्या उत्तरार्धात एकदा करावी, ज्यायोगे पुण्यप्राप्ती होते म्हणतात. मात्र, वारी दरवर्षी का करावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खोलात गेल्यावर सापडतात.

वारीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात काय सांगाल? तसेच वारीमुळे देशाची सामाजिक, सांस्कृतिक समीकरणे बदलतात का?

बघ, ‘पालखी’ ही संकल्पना अगदी अलीकडची, पण ज्ञानेश्वरांच्या अभंगात ‘वारी’चे उल्लेख आहेत. लिखित स्वरूपातील ज्ञात असे उल्लेख त्याकाळातले आहेत. संत ज्ञानेश्वरांचे आई-वडील वारी करत असत, त्यामुळेच वारी त्यांच्या घरात आली असे दिसते. शंकराचार्यांचे ‘पांडुरंगाष्टक’ अतिशय प्रसिद्ध आहे. ते आठव्या शतकात लिहीलं गेलं. त्यावरून असं म्हणता येईल की, अगदी १३व्या शतकापासून वारी प्रचलित आहे आणि पंढरपूरचे माहात्म्यआठव्या शतकाच्याही पूर्वीपासून आहे. शंकराचार्य जर पंढरपूरला येऊन ‘पांडुरंगाष्टक’ रचतात, तर त्याच्याही पूर्वीपासून या भागात भक्ती होत होती. तुकोबांचे वंशज नारायणबुवा तुकोबांच्या पादुका घेऊन आळंदीला जायचे आणि तिथून ज्ञानेश्वरांच्या पादुकांसोबत घेऊन ते पंढरपूरला जायचे. पुढे तुकोबांची शिष्य परंपरा आणि वंश परंपरा असा वाद झाला. त्यातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकोबांची पालखी वेगवेगळी निघू लागली. आज रथ असतात आणि त्यात पालखी असते. त्यामुळे वारीचं स्वरूप दिंड्यांचं होतं. आज उत्तरेतील अनेक भक्ती पद्धती पाहता, आपल्याला सगुण भक्ती दिसते. द्वैत दिसतं. वारी म्हणजे अद्वैत. आपण कुणाला नमस्कार केला की आपल्याला फिरून नमस्कार केला जातोच! जात, वय, प्रतिष्ठा कशाचाही विचार न करता नमस्कार येतो तो या वारीत!

आज देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो लोक वारीत सहभागी होतात. तरुणांचे वारीतील अस्तित्व अत्यल्प नसले तरी पूर्ण वारी करणार्‍या वारकर्‍यांमध्ये ज्येष्ठांच्या तुलनेत तरुण कमीच आढळतात. त्यावरुन एक अभ्यासक म्हणून वारीचे भविष्य किंवा भवितव्य काय आहे, असे तुम्हाला वाटते?

मुळात माळकरी-वारकरी आता किती आहेत, त्यावरुन हे सांगता येईलही. तुला ‘फड’ हा प्रकार माहिती आहे का? वारकरी संप्रदाय फडांवर दिसतो. जसे वेगवेगळ्या संप्रदायांचे आश्रम किंवा मठ असतात, तसे वारकर्‍यांचे ‘फड’ आहेत. कोणते अभंग केव्हा म्हणायचे, हरिपाठ केव्हा घ्यायचा, ज्ञानेश्वरी केव्हा वाचावी, हे सर्व सांगणार्‍या फडाच्या संस्था किंवा धर्मशाळा प्रामुख्याने पंढरपूरजवळ आहेत. आज वारकरी संत नाहीत. बहिणाबाईंनंतर संतांचा वारीतील सहभाग तसा नाहीच. पण, तरीही वारी आजही तेवढ्याच किंवा अधिक जल्लोषात टिकून आहे. त्याच श्रेय फडांना जातं. सोनोपंत दांडेकर, साखरे महाराज, जोग महाराज, सातारकर महाराज, यांच्या माध्यमातून ही परंपरा अजूनही जीवंत आहे. आज वारीत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होतं. पर्यावरण विषय घेऊन किंवा सामाजिक विषय घेऊन, वारीच्या माध्यमातून लोकजागृती करणारे येतात. हौशेनवशे येतात. माझ्यासारखे अभ्यासकही आवर्जून येतात. सेवा दिंड्या असतात, जे वारकर्‍यांची सेवा करतात. पाय चेपून देणे, डोकं चुरून देतात. आज वारीत सहभागी होणार्‍यांची संख्या क्वचितच वाढते आहे. पण, त्यांची कारणे वेगवेगळी आहेत. अभ्यासक, माध्यम प्रतिनिधी, विक्रेते, प्रमोटर्स, डिजिटल क्रिएटर्स असे अनेक, पण त्यात वारकर्‍यांच्या संख्येचे गणित मात्र अजूनही अनुत्तरीतचआहे. माळ ज्या व्यक्तीने घेतलीये, त्याच्यासोबत ती वैकुंठाला जाते, तोपर्यंत तिने माळेची साथ करत वारीला जाणे अपेक्षित असते. तिचे कडक नियम म्हणजे दरवर्षी काहीही झाले तरी वारीला जायचेच. मांसाहार करायचा नाही. परस्त्री मातेसमान. त्यामुळे मुलांवरही तसेच संस्कार होतात. खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून आणि एकंदरच घरातून ती पुढच्या पिढीकडे जाते. वारी हा पुढच्या पिढीला दिला जाणारा वारसा आहे. वारी घराण्यात असते. चार पिढ्या एकत्र वारीत चालतानाही दिसतात. काही घरात वृद्धापकाळाने कुणाला जाता आले नाही, तर त्यांचा मुलगा वारी पूर्ण करतो.

गेल्या काही वर्षांत वारीचे स्वरूपही बदलले आहे, असे तुम्हाला वाटते का?

पंढरीच्या वारीचे सामाजिक आणि राजकीय अंतरंग गावातील सर्व जातीचे लोक यात सहभागी होतात. अर्थात, यावर शहीकरणाचा परिणाम झालाच. आज ‘आयटी दिंडी’ आहे. ‘आयटी प्रोफेशनल्स’ची ही दिंडी. पण, प्रत्येकालाच सलग २० दिवस चालणे जमत नाही, मग ते थोडे थोडे अंतर आलटून पालटून पंढरीच्या वारीचे सामाजिक आणि राजकीय अंतरंग चालतात. अगदी रिले शर्यत असते तसं. आज जातीला केंद्रस्थानी ठेवून चालणार्‍या दिंड्या नाहीत,तर एका प्रदेशातून येणारी एक किंवा व्यवसायावर आधारित अशा दिंड्या आहेत. हा बदल झाला.

विठ्ठल हा मुळात दक्षिणेतला देव, तर महाराष्ट्रीयन वारीबद्दल दक्षिणेतील नागरिकांच्या काय भावना आहेत. याबद्दल तुम्ही केलेल्या अभ्यासातून, संशोधनपूर्ण वाचनांतून समोर आलेले निष्कर्ष सांगू शकाल का?

हा खरंतर अभ्यासाचा विषय आहे. त्यावर बरंच बोलता येईल. पण, आपण सुरुवातीला मराठी भाषा प्रांतातून येणार्‍या दिंड्या पाहू. म्हणजे, इंदोर, बडोदा, गुलबर्गा, बेळगाव या प्रदेशातील मराठी भाषिकसुद्धा आपल्या दिंड्या घेऊन येतात. यापैकी कित्येकांना मराठीही येत नाही. पण, तुकोबा आणि ज्ञानोबांचे अभंग ते अगदी अस्खलित बोलतात!मला भविष्यात संधी मिळाली, तर खरंच ‘दक्षिणेतील विठ्ठल भक्ती’ या विषयावर अभ्यास करायला आवडेल. काही तामिळ लोकही वारीत सहभागी होतात. तसंच काही मौखिक संदर्भांना अनुसरून सांगते, तामिळनाडूत जी विठ्ठल मंदिरे आहेत, तिथे भजनी मंडळेसुद्धा आहेत. त्यात ते ज्ञानोबा आणि तुकोबांची भजनेही आवर्जून गातात.

वारीमध्ये चालण्यापासून ते अगदी जेवणखाणासंबंधीचे काटेकोर व्यवस्थापन हा नेहमीच सगळ्यांसाठी औत्सुक्याचा, कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरतो. तसेच वारीचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतो का? त्याविषयी तुम्ही नोंदवलेल्या निरीक्षणांविषयी काय सांगाल?

हो! वारीच्या व्यवस्थापन मूल्याचे नेहमीच दाखले दिले जातात. वारीतलं व्यवस्थापन मध्यवर्ती नाही, ते विकेंद्रित आहे. वारीचं आजच स्वरूप दिसतं ते १८व्या शतकातील. हैबत बाबा हरताळकर होऊन गेले, ग्वाल्हेरच्या शिंदे राजवटीत ते सरदार होते. त्यांनी पालखी सोहळ्यात शिस्त आणली. आर्थिक गणिताबद्दल तू विचारलंस, तर त्या भागातील छोटे-मोठे व्यावसायिक आपला वर्षभराचा प्रपंच भागेल एवढं या काळात कमवितात. एवढ्या मोठ्या प्रमाणाला जनसमुदाय येतो, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इथले स्थानिक तत्पर असतात. केवळ एक फिरता चहाचा स्टॉल लावला, तरी वर्षभराची कमाई सहज होते.

असं म्हणतात की, वारीला एकप्रकारे शास्त्रीय अधिष्ठानही लाभले आहे. वारी निघते तो कालावधी, त्याचे शेतीशी जोडलेले वेळापत्रक आणि अशा अनेक बाबी आहेत. त्याकडे तुम्ही कसं पाहाता?

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. वारकरी संस्कृतीवर बोलताना ते म्हणतात की, “आज जरी वारकर्‍यांचे सर्व आयुष्य बदलले असले तरीही पूर्वी जो कृषिप्रधान भाग होता ते लोक आषाढी वारी करत.” एकूण चार वार्‍या असतात. त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी वारी आपल्याला सर्वाधिक परिचयाची. पण, चैत्रात आणि माघात होणार्‍या वार्‍या आपल्याला फारशा माहिती नसतात. या चारपैकी कोणत्याही एका वारीला वारकर्‍यांनी जावे, हा नियम असतो. यापैकी कोणतीही वारी करावी. आता कृषिप्रधान संस्कृतीमुळे हा काळ शेतकर्‍यांसाठी सोयीचा असतो. शेतीची कामे झालेली असतात आणि पावसाची वाट पाहताना काय करावे, म्हणून तो वारीला जातो. म्हणून कोकणी मंडळी या वारीत नाहीत. कारण, त्यांच्याकडे भातशेती. काही महिन्याचे वारकरीसुद्धा असतात. ते दर महिन्याला वारी करतात. आळंदीत चार ते पाच दिवस मुक्काम करून पुन्हा पंढरीस जातात.

तुम्ही पूर्ण वारी किती वेळा केली आहे? तुमचे त्यावेळचे अनुभव काय होते?

मी खरं तर तीन वेळा पूर्ण वारी केली आहे. त्यापैकी एकदा संपूर्ण चालत वारी केली, तर दोन वेळा माझ्या अभ्यासाच्या निमित्ताने मुलाखती वगैरे घेत जमेल तसे चालत किंवा वाहनांनी पुढे जात पूर्ण केली. आमच्या एका नातेवाईकांसोबत मी वारीत गेले होते. काही किलोमीटर चाललो आणि मग घरी आले. घरात वारकरी वातावरण नसल्याने फार माहिती नव्हते. पण, घरी आल्यावर आई-बाबा चक्क माझ्या पाया पडले. मला इतकं अप्रूप वाटलं की मी पुन्हा वारीत जायचं, हे तेव्हाच ठरवलं.

इंग्रजीत तुम्ही याविषयी प्रकाशित केलेलं पुस्तक मराठीत लिहिण्याचा किंवा अनुवादित करण्याचा मानस आहे का? मुळात वारीविषयातील बहुतांश साहित्य मराठीत उपलब्ध असताना संशोधनाची भाषा इंग्रजी का निवडावीशी वाटली?

खरं तर संशोधन मला मराठीत करता आले असते. वारीचा विषय तसाही मराठीत स्वाभाविक समजण्यासारखा आहे. मला कित्येकांनी विचारले की, मराठीमध्ये केव्हा? तर यापुढचे काम माझ्या पुस्तकाचे मराठीकरण करायचे आहे. आता का लिहिले, तर आजची जागतिक भाषा आणि ज्ञानभाषा इंग्रजी आहे. महाराष्ट्राची वारी इतर भाषिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने इंग्रजी भाषा सोयीची वाटते.

’वारी पिलग्रिमेज : भक्ती, बीईंग अ‍ॅण्ड बियाँड’ या पुस्तकातून कुठली वेगळी माहिती तुम्ही प्रकाशझोतात आणली आहे?
 
हा केवळ भावात्मक वारीचा लेखाजोखा नाही. तशी अनेक पुस्तके उपलब्धही आहेत. त्यातला भक्तिभाव प्रामुख्याने समोर येतो. हा सामाजिक आणि राजकीय अंगाने केलेला वारीचा अभ्यास आहे. वारीत कोणत्या प्रकारचे संवाद घडतात? माणसे वारीत येतात आणि परतताना काय घेऊन जातात? वारी व्यक्तीमध्ये काही बदल घडवू शकते का? नव्या लोकांशी वारकरी कसा संवाद साधतो? त्याचा समाजातील मूल्यांवर काही फरक पडतो का? याची मांडणी मी पुस्तकातून केली आहे.
 
(अधिक माहितीसाठी संपर्क - sambhusvarada@gmail.com)

Powered By Sangraha 9.0