ठाणे : कोकणवासियांसाठी वरदान ठरणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणले. ही गोवा-मुंबई पहिली वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकावर येताच भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यानी ढोल ताशे वाजवुन फेर धरत या एक्सप्रेसचे स्वागत केले.
तसेच वंदे भारत एक्स्प्रेसवर पुष्पवर्षाव करून आ. डावखरे आणि खा. विचारे यांनी मोटरमनच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून मंत्री रविंद्र चव्हाण, खा. विनायक राऊत यांच्यासह उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्याचे पुष्पगुच्छ व मिष्टान्न देऊन स्वागत केले. यावेळी रेल्वे स्थानकावर भाजपचे संजय वाघुले, नारायण पवार, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, विक्रम भोईर, डॉ. राजेश मढवी, कृष्णा भुजबळ आदी उपस्थित होते. दरम्यान,शिवसेना ठाकरे गटाचे खा. राजन विचारे यांनीही नरेश मणेरा, मधुकर देशमुख आदी कार्यकर्त्यासह ठाणे स्थानकात येऊन वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले. यावेळी भाजप व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मात्र, वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करताना दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकोप्याचे दर्शन घडवल्याचे पाहायला मिळाले.